shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पर्यावरण जनजागरण (२७) जैसे भ्रमर परागु नेती !!


जैसे भ्रमर परागु नेती |
परी कमळदळे नेणती |
तैसी परी आहे सेविती |
इये ग्रंथी ||  १/५९ ज्ञानेश्वरी

ऐसे हळुवारपण जरि येईल|
एऱ्हवि आघवी गोठि होईल।
तरीच हे उपयोगा जाईल |
मुकिया बहिरयाची || ६/२६ ज्ञानेश्वरी 

पर्यावरणाचे रक्षण म्हणजे चैतन्यशक्तीची निर्मिती होय. ही चैतन्यशक्ती म्हणजे उत्पत्ती, स्थिती, आणि लय याचा आविष्कारच होय. आता हे रक्षण कसे करायचे? 

ज्ञानेश्वर माऊली असं सांगते की  जैसे भ्रमर परागु नेती..याचा अर्थ असा की, जसा भ्रमर म्हणजे भुंगा कमळातील परागकण अलगद उचलून नेतो. तिथे तो कुठल्याही प्रकारची घाई करत नाही. अत्यंत काळजीपूर्वक, हळूवारपणे, कमलदल कुठेही दुखावले जाणार नाही, त्याला इजा पोहोचणार नाही असं हळुवारपणे उचलून त्याचा आस्वाद घेत असतो. आपल्याला पर्यावरणीय समाजहित साधताना असंच वागायला हवं. कुठे घाई घाई करून जसे की, कोणीतरी खड्डे खणले, तिथे जाऊन आपण घाईघाईने झाडे लावली, माती ढकलली, पाणी ओतले आणि निघून गेले. तिथेच खाल्लं, कचरा केला, निघून गेले. घरबांधणीसाठी आजूबाजूची झाडं तोडली, कचरा, दूषित पाणी नदीत सोडून दिले, प्लास्टिकचा वापर केला. म्हणजे स्वार्थापोटी आपण आपल्याला पाहिजे तसे बेधुंदपणे वागलो. यात सामाजिक बांधिलकीचा हळुवारपणा, संवेदना कुठेच दिसत नाहीत. माऊली सांगते की असं वागू नका. आपल्या वागणुकीमध्ये, आचरणातून हळुवारपणा दिसला पाहिजे. तसं नाही केलं तर 
ऐसे हळुवारपण जरि येईल| तरिचि हें उपयोगा जाईल| एऱ्हवीं आघवी गोठी होईल | मुकीया बहिरेयाची || 
मुक्याने बोलले आणि बहिऱ्यांने ऐकले असंच होईल. जे पर्यावरण संतुलन कार्य करायचं आहे, ते होणारच नाही. तेव्हा पर्यावरणाच्या रक्षणासाठी कामे करताना अल्पांशानेही निसर्गाचे रूप, जडणघडण, समतोल खराब होणार नाही अशी काळजी घ्यावी. जशी काळजी भ्रमर पराग उचलताना करताना कमलदलाची घेत असतो.

वृक्ष आणि जीवसृष्टी यांचं घनिष्ट नातं  आहे यातून सुधारणावादी मानवाने बोध घेऊन वृक्ष लागवड, वृक्ष संवर्धन आणि त्यातून पर्यावरणाचे रक्षण करणे ही राष्ट्रभक्ती आहे हे समजून आचरण करणे ही काळाची गरज आहे. 

लेखक : चंद्रकांत शहासने, पुणे
संतवाङ्मयाचे विज्ञाननिष्ठ निरुपणकार
मोबाईल क्रमांक : ९८८१३७३५८५
close