shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

ज्ञानेश्वरीतील जलचक्र संहिता..!!

मी सूर्याचेनि वेषें ! तपे तैं हें शोषे!

पाठी इंद्र होउनी वर्षे ! तैं पुढती भरे !! ९-२९६ ज्ञानेश्वरी


पर्यावरण हा विषय विज्ञाननिष्ठ असा महत्त्वाचा असून ज्ञानेश्वरीच्या नवव्या अध्यायात ओवी क्रमांक २९६ मध्ये पर्यावरण विज्ञानातील अत्यंत महत्त्वाचे जे जलचक्र आहे त्याबाबत माऊलीने निवेदन केलेले आहे. 



हे जलचक्राचे निवेदन असले तरी मानवजातीला त्याच्या उत्पत्ती, स्थिती आणि लयाचे व्यवस्थापन शास्त्रदेखील यातूनच सांगितले आहे. 


सूर्य म्हणजे सर्वशक्तींचे ऊर्जास्थान आहे. सूर्योदयाबरोबर नवचैतन्याची निर्मिती होते. आपल्याला ड जीवनसत्व सूर्यापासूनच मिळत असते. ज्यातून आपली हाडे अत्यंत मजबूत होतात. रक्ताभिसरण अत्यंत सक्षम होते आणि आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते व आपला जीवनाचा प्रवास हा अत्यंत सुखदायी होतो.

आता जलचक्राच्या संदर्भात काय होते? तर माऊलींनी असे म्हटले आहे की पाणी हे जीवन आहे. विहीरीत, नद्या-नाले, जलाशये, समुद्र, सरोवरे ही पाण्याची ठिकाणे आहेत. यांतील पाण्याची वाफ सूर्याच्या उष्णतेने  होते.पाण्याची वाफ नभोमंडळामध्ये शोषली जाते. आणि इंद्र रुपाने, इंद्र म्हणजे वरूण आणि वरूण म्हणजे ढग-पाणी अशा पद्धतीने ते पुन्हा धरतीवरती येते. त्याला आपण वर्षाऋतू म्हणतो. ही सगळी निसर्गाची किमया! केवळ चैतन्यशक्तीचे सामर्थ्य आहे .ही चैतन्यशक्ती निर्माण करणे, त्याच्यासाठी पोषक वातावरण निर्माण करणे, या चैतन्यशक्तीचे संरक्षण करणे या सगळ्या बाबी पर्यावरण रक्षणामध्ये येतात. झाडे, फुले, पाने, पाणी, नद्या, समुद्र, जलाशये ही सर्व या सृष्टीच्या पर्यावरण रक्षणातील आयुधे आहेत आणि त्यांच्या माध्यमातून सूर्य देवता पुन्हा पुन्हा पाण्याची वाफ आणि वाफेचे पाणी करत जीवसृष्टीला जीवदान देत असते 

याअर्थी....

ज्ञानेश्वर माऊली आपल्याला या ठिकाणी अजून एक संदेश असा देतात की हे सर्व कर्ता करविता मीच आहे. म्हणजे पाण्याची निर्मिती मीच करतो, पाण्याची वाफ करून नद्या-नाले कोरडे मीच करतो.पुन्हा वाफेचे पाणी करून जीवसृष्टीची निर्मिती मीच करतो. मानवाने स्वतःमध्ये हे कर्तृत्व, ही चैतन्यशक्ती अवलोकन केली तर मानवाला नक्कीच समजेल की प्रत्येक चांगल्या वाईट कर्माचा निर्माता आपण स्वतःच आहोत. आपण स्वतः काहीही करू शकतो.

पर्यावरण तत्व आज जे विनाशाकडे चालले आहे ते पुन्हा सुस्थितीत आणण्याचे  सामर्थ्य  माझ्यातच म्हणजे मानवातच आहे.


वृक्ष आणि जीवसृष्टी यांचं घनिष्ट नातं  आहे. यातून सुधारणावादी मानवाने बोध घेऊन वृक्ष लागवड, वृक्ष संवर्धन आणि त्यातून पर्यावरणाचे रक्षण करणे ही राष्ट्रभक्ती आहे हे समजून आचरण करणे ही काळाची गरज आहे. 


लेखक : चंद्रकांत शहासने, पुणे

संतवांड़मयाचे विज्ञाननिष्ठनिरुपणकार

मोबाईल क्रमांक : ९८८१३७३५८५


कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्ट पुणे यांच्यावतीने पर्यावरण जनजागृती  उपक्रमांतर्गत..

पर्यावरण दिन ५ जून २०२१पासून वन हुतात्मादिन ११ सप्टेंबर २०२१पर्यंत असे ९९ दिवसांचे पर्यावरण जनजागृती अभियान

close