प्रतिनिधी : आसावरी वायकर
अ .नगर : (दि .१९) : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुण्यतिथी दिनानिमित्त अहमदनगर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने त्यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. यावेळी स्व.अण्णाभाऊ यांनी समाज सुधारणेसाठी त्याचबरोबर दलित चळवळ व कामगार चळवळीसाठी दिलेल्या योगदानच्या आठवणींना उजाळा देण्यात आला.
लालटाकी येथील स्व. अण्णाभाऊ यांच्या पुतळ्याला काँग्रेस एससी विभागाचे प्रदेश समन्वयक नामदेवराव चांदणे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. स्व. लहुजी वस्ताद यांच्या पुतळ्याला देखील यावेळी पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. ब्लॉक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मनोज गुंदेचा, शहर जिल्हा उपाध्यक्ष अनंतराव गारदे, विद्यार्थी काँग्रेसचे शहर जिल्हा प्रभारी अनीस चुडीवाला, काँग्रेस एससी विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष नाथाभाऊ अल्हाट, प्रशांत भिंगारदिवे, संतोष जगताप, विजय पाथरे आदी यावेळी उपस्थित होते.
यावेळी बोलताना एससी काँग्रेस विभागाचे प्रदेश समन्वयक नामदेवराव चांदणे म्हणाले की, स्वातंत्र्य चळवळीच्या काळामध्ये जातीयवादामुळे अण्णाभाऊ साठे यांना दुर्दैवाने शिक्षणापासून वंचित राहावे लागले होते. केवळ दीड दिवस शाळेत गेलेल्या अण्णाभाऊंचे लिखाण समाजमनाच्या डोळ्यांमध्ये अंजन घालणारे आहे. त्यांनी एक दोन नव्हे तर तब्बल पस्तीस कादंबऱ्या लिहिल्या. त्यांची फकीरा कादंबरी आज अनेक विद्यापीठांमध्ये विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी आहे. हाच खऱ्या अर्थाने अण्णाभाऊंच्या प्रतिभेचा गौरव आहे.
एससी काँग्रेस विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष नाथाभाऊ अल्हाट म्हणाले की, अण्णा भाऊंनी कला पथकाच्या माध्यमातून समाजामध्ये जनजागृतीचे काम केले. त्यांनी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यास अनुसरून दलित चळवळीसाठी काम केले. दलित बांधव, कामगारांच्या वेदनांना वाचा फोडण्यासाठी त्यांनी त्यांच्या लेखणीचा प्रभावीपणे उपयोग केला. शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरणभाऊ काळे यांच्या मार्गदर्शनाखाली नगर शहरामध्ये अण्णाभाऊंचे विचार समाजाच्या सर्व घटकांपर्यंत पोहोचण्यासाठी आगामी काळात एसी काँग्रेस विभागाच्या वतीने काम केले जाणार असल्याचे यावेळी अल्हाट यांनी सांगितले.


