पर्यावरणाचे संतुलन म्हणजे आत्मपरिक्षण. म्हणजेच पंचमहाभुतांचे संतुलन होय. जसे की प्राणापासून मन तयार होते आणि मनापासून सत्य असत्य निर्माण होते.
हाच मुद्दा संत नरहरी सोनारांनी आपल्या अभंगातून समाजाला संदेश रूपाने शिकविलेला आहे. जर आपले जीवन सुखी करायचे असेल तर मन आणि बुद्धी यांचा विचार करत विवेकबुद्धीने कोणतीही कृती करा. तीचे फळ चांगलेच मिळेल. जसे की कपडा कापण्यासाठी कातरीचा उपयोग करतो. तिला दोन पाती असतात आणि त्यातून अनावश्यक ते कापड कापले जाते किंवा कापड कापून त्याचा सोयीनुसार वापर केला जातो.
आपल्या प्राणशक्तीमध्ये मन आणि बुद्धी ही दोन पाती असून यामध्ये आपण करीत असलेल्या कर्माचे फळ काय असेल याचा विचार करायचा. मनात आले म्हणून केले असे न करता मी एखाद्या ठिकाणी दगड मारला तर काय होईल? मी उघड्यावर कचरा टाकला तर काय होईल? त्यातून कुजणाऱ्या अन्नघटकांमुळे अनेक जंतू तयार होऊन त्याचा समाजाला कसा त्रास होईल. तेव्हा ते बाहेर न टाकता योग्य ठिकाणी खत करण्यासाठी टाकावे हे बुद्धी सांगते आणि मग माणूस खराब झालेले अन्न पदार्थ, कचरा एका ठिकाणी टाकून त्याचे खत बनवून राष्ट्रीय संपत्तीत भर टाकतो. माझ्याकडे रेडिओ आहे.
सकाळी सकाळी मोठ्या आवाजात मी तो वाजवला तर त्यामुळे अनेकांची झोप मोड होऊ शकते हे विचारात घेणे हे बुद्धीचे सामर्थ्य आहे. पहाटे पहाटे कर्कश्श आवाजात रेडिओ वाजवणे ही मनाची चंचलता आहे. मन सांगते की खूप मौज मजा करा, झोपा काढा, तत्वज्ञानाचा अभ्यास करू नका, कशाला उगाच डोक्याला ताप! पण विद्यार्थी मन विचार करते की, मी असा वागलो तर मी परीक्षेत नापास होणार आहे आणि माझी ज्ञानगंगा कुंठित होणार आहे.
मी समाजात जगण्यास नालायक ठरेन. तेव्हा मला अभ्यास करायलाच पाहिजे हे बुद्धीचे सामर्थ्य आहे. जेव्हा माणूस मन आणि बुद्धी याचा विचार करून कृती करतो तेव्हा ती कृती चांगली होते. रामनामासमान! राम म्हणजे चांगल्या गोष्टीचा, कृतीचा विचार करणे होय. तेव्हा वृक्ष आणि जीवसृष्टी यांचं घनिष्ट नातं आहे. यातून सुधारणावादी मानवाने बोध घेऊन वृक्ष लागवड, वृक्ष संवर्धन आणि त्यातून पर्यावरणाचे रक्षण करणे ही राष्ट्रभक्ती आहे हे समजून आचरण करणे ही काळाची गरज आहे.
लेखक : चंद्रकांत शहासने, पुणे
संतवांड़मयाचे विज्ञाननिष्ठनिरुपणकार
मोबाईल क्रमांक : ९८८१३७३५८५
कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्ट पुणे यांच्यावतीने पर्यावरण जनजागृती उपक्रमांतर्गत..
पर्यावरण दिन ५ जून २०२१पासून वन हुतात्मादिन ११ सप्टेंबर २०२१पर्यंत असे ९९ दिवसांचे पर्यावरण जनजागृती अभियान

