प्रकाश मुंडे | बीड जिल्हा प्रतिनिधी :-
केज तालुक्यातील नाव्होली येथे एका विवाहितेने सासरच्या शारीरिक व मानसिक जाचास कंटाळून राहत्या घरात साडीने गळफास घेऊन आत्महत्या केल्या प्रकरणी अटक असलेले तिचा नवरा, दिर व सासरा यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे.
या बाबतची माहिती अशी की, नाव्होली ता. केज येथील विवाहिता कल्पना दत्तात्रेय उर्फ भुजंग झाडे हिने सासरच्या जाच जुलूमाला कंटाळून दि. १८ रोजी मंगळवारी पहाटे २:०० वा. च्या सुमारास घरातील लोखंडी अडूला साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली होती.
या प्रकरणी तिचा नवरा दत्तात्रेय उर्फ भुजंग माणिक झाडे, सासरा माणिक विठ्ठल झाडे व दिर गोरख उर्फ पोपट माणिक झाडे या तिघांच्या विरुद्ध गु.र.नं. ३९६/२०२१ भा.दं.वि. ३०६, ४९८(अ), ३२३ व ३४ नुसार गुन्हा दाखल करून तिघांना अटक केली आहे. त्यांना न्यायालयापुढे हजर केले असता त्यांना दि.२१ ऑगस्ट पर्यंत दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
पुढील तपास जेष्ठ पोलीस उपनिरीक्षक दादासाहेब सिद्धे हे करीत आहेत.

