शिर्डी शहर प्रतिनिधी :
देशांतर्गत सर्व राज्यांतील मंदिरे खुली झालेली असतांना देखील अजूनपर्यंत महाराष्ट्र शासन जाणीवपूर्वक मंदिरे खुली करण्यास परवानगी देत नाही. देशविदेशातील साईभक्तांच्या भावना पायदळी तुडवत असल्याचा आरोप करीत नियम अटीसह साई मंदिर उघडा अन्यथा तीव्र आंदोलन छेडू. यावेळी होणाऱ्या परिणामांना सरकार म्हणून तुम्हीच जबाबदार असाल, असा इशारा भाजयुवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी विश्वस्त सचिन तांबे यांनी सरकारला दिला आहे. सचिन तांबे यांनी म्हटले आहे की, पहिल्या लाटेचा जोर पूर्णतः कमी झाल्यानंतर केंद्र सरकारने भारतातील सर्व मंदिरे खुली करण्यास नियम अटींसह परवानगी दिली होती.
लोकभावनेच्या आस्थेला पायदळी तुडवत मंदिरे उघडली नाही. परिणामी भाजपाने आंदोलन छडले तरी उशिरा मंदिरे उघडली आणि आता दुसन्या लाटेत देखील ही लाट पूर्णतः ओसरली असताना जाणीवपूर्वक मंदिरे खुली करण्यास परवानगी देत नाही. देशविदेशातील साईभक्तांच्या भावना पायदळी तुडवत असल्याचा आरोप त्यांनी केला. गेल्या अनेक महिन्यांपासून मंदिरे बंद असल्याकारणाने शिर्डी व पंचक्रोशीचे अर्थकारण पूर्णतः ठप्प झालेले आहे.
त्यामुळे शिर्डीतील हॉटेल, रेस्टॉरंट, हार प्रसाद, विक्रेते, ट्रॅव्हल्सवाले, फुलांचे शेतकरी, चहा नाष्टा विक्रेते व इतर हातावर उपजिविका असणाऱ्या प्रत्येकाला अतिशय गंभीर आर्थिक परिणामांचा सामना करावा लागत असल्याने नागरिकांचा संयम सुटत आहे, कर्जाची हप्ते थकल्याने अनेक हॉटेल, घर, दुकाने सील केली जात आहेत. फायनान्सवाले तगादे लावत आहेत. परिणामी अनेक नागरिक अडचणीत आले आहेत. एमएसईबी अत्यंत निर्दयीपणे तुघलकी वसुली करत आहे. त्यांची टार्गेटपूर्तीसाठी दमदाटी, अरेरावी नागरिकांना सहन करावी लागत आहे. शहरातील जवळ जवळ १००० लाईट कनेक्शन तोडले आहेत.
शिर्डी नगरपंचायतने मंदिरे बंद असल्याकारणाने सरकारला घरपट्टी, पाणीपट्टी वेगवेगळे कर कमी करण्यासाठी प्रस्त देऊन अनेक महिने लोटली परंतु कुठलाही निर्णय या सरकारने दिलेला नाही. मंदिरे पूर्णतः बंद असल्याने या करांमध्ये विशेष बाब म्हणून सवलत द्यावी अशी मागणी संबंधित मंत्र्याकडे बैठकीत करण्यात आली आहे.
परंतु हे सरकार त्यावर देखील निर्णय करत नाही. खासगी शैक्षणिक संस्थांनी देखील फीसाठी तगादा लावल्याने अनेक पालकांनी मुलांचे शिक्षण थांबविले आहे. अशा अनेक गंभीर संकटांचा सामना न करु शकल्याने अनेकांनी आपले जीवन वेगवेगळ्या कारणांनी संपविले आहे. वास्तविक पाहता साई संस्थान प्रशासनाने अतिशय सुंदर व सुरक्षित दर्शन व्यवस्था केलेली आहे. त्यामुळे मंदिर खुले असताना एकाही भक्ताला व कर्मचाऱ्याला करोनाची बाधा झाली नाही. तरीही जाणीवपूर्वक मंदिरे खुली करत नाही. या समन्वय नसलेल्या महाविकास आघाडी सरकारचे वसुलीकडे लक्ष आहे. बार, दारू दुकाने सुरू आहेत, राजकीय कार्यक्रम सुरू आहे काही सुरळीत आहे.
तरी देखील भारतातील सर्व देवस्थाने उघडी असताना महाराष्ट्रातील साई मंदिर पूर्णपणे सुरक्षित असताना ऑनलाईन बुकिंगद्वारे व ज्यांचे लसीकरण पूर्ण झाले आहेत या नियम अटीसह का उघडत नाही? असा सवाल उपस्थित केला आहे. समन्वय नसलेले आघाडी सरकार आणखी किती दिवस लोकांच्या भावनेचा उद्रेक वाढू देणार त्यामुळे या नियम अटीसह साई मंदिर उघडा अन्यथा होणाऱ्या परिणामांना सरकार म्हणून तुम्हीच जबाबदार असाल असेही पत्रकात म्हटले आहे.


