shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

"ज्यो रूटच्या नेतृत्वावर गंडांतर येणार ?"

ज्यो रूटच्या नेतृत्वावर गंडांतर येणार ?

                     इंग्लंडचा कसोटी क्रिकेट संघ सन १९८८ नंतर मोठया संकटात सापडला आहे. त्यावेळी विंडीज विरूद्ध इंग्लंडला सततच्या पराभवा नंतर सहा सामन्यांच्या मालिकेत चार कर्णधार बदलायची वेळ आली होती. तर आता इंग्लंड दौऱ्यावर असलेल्या भारतीय संघाने पाच कसोटींच्या मालिकेत दोन सामन्यानंतर १-० अशी घेतली आहे. या मालिकेतील पहीला कसोटी सामना पावसामुळे अनिर्णित राहीला. सामन्याच्या शेवटच्या दिवशी पावसाने खेळ होऊ शकला नाही म्हणून एक हमखास होणारा इंग्लंडचा पराभव वाचला.  लॉर्डस कसोटी तर चौथ्या दिवसापर्यंत वर्चस्व असलेला सामना इंग्लंडला गमवावा लागल्याने संपूर्ण इंग्लंडमध्ये इंग्लिश कर्णधार ज्यो रुटच्या नावाने खडे फोडले जात आहे.


                      ज्यो रूट वैयक्तिकरित्या सध्या एक फलंदाज म्हणून तुफान फॉर्मात असून भारताविरूद्ध पहिल्या कसोटीत ६४ व १०९ व लॉर्डस कसोटीत नाबाद १८० व २० धावा त्याने फटकविल्या आहेत. मात्र एक कर्णधार म्हणून त्याची कुठलीही छाप पडलेली दिसत नाही.  त्याचं अतिबचावात्मक व कातडी बचावात्मक धोरण इंग्लंडला पराभवाच्या खाईत ढकलत आहे. तसेच दुसऱ्या कसोटीत इंग्लिश गोलंदाज व भारतीय फलंदाज बुमराहा व शमी यांच्यात झालेल्या वादंगात त्याची असलेली निष्क्रीयताही अनेक प्रश्न निर्माण करणारी होती. 
                     मायदेशात सन २०२० पासून ७ कसोटयात त्याच्या नेतृत्वात इंग्लंडला केवळ एकच सामना जिंकता आला असून सन २०२० मध्ये मायदेशात पाकिस्तान विरूद्ध पहिला कसोटी इंग्लंडने जिंकला होता तर दोन सामने पाकिस्तान अनिर्णित ठेवण्यात यशस्वी झाले होते. तर याच सत्रात जून महिन्यात न्यूझिलंडने दोन सामन्यांच्या मालिकेत १-० असा विजय मिळविला होता. त्याच मालिकेतील पहिल्या कसोटी पावसामुळे न्यूझिलंडचा विजय हुकला होता. शिवाय त्यापूर्वी भारतात पहिला सामना जिंकल्यानंतर मालिका ३-१ अशी गमावण्याची नामुष्की इंग्लंडवर आली ती सुध्दा रुटच्याच नेतृत्वात !
                      ज्यो रूटचं नेतृत्व बिलकुल प्रेरणादायी ठरताना दिसत नाही. शिवाय त्याचे सहकारी खेळाडूंवरही नियंत्रण नसल्याचे जाणवते. त्याच्या संघातला एकही फलंदाज त्याला मदत करताना दिसत नाही आणि हेच फलंदाजांचे अपयश इंग्लंडच्या अधोगतीचे कारण आहे. शिवाय संघातील महत्त्वाचा खेळाडू बेन स्टोक्सही त्याचे पटत नसल्याने संघ बाहेर आहे असे सुत्रांकडून समजते. बेन स्टोक्सने संघातून अनिश्चित काळासाठी अंग काढून घेतले आहे. तसेच जोफ्रा आर्चर, ख्रिस वोक्स, ख्रिस ब्रॉड जखमी असल्याने त्याच्या अडचणीत भरच पडली आहे. टिपीकल इंग्लिश स्वभाव असलेला रूट काहीसा मतलबी खेळ करतो व संघासाठी लढत नसल्याचा आरोप ब्रिटीश प्रसार माध्यमे व सोशल मिडीयावर होत आहेत.
                         भारताविरूध्दच्या पराभवाने सध्या तरी ज्यो रूट संपूर्ण इंग्लंड मध्ये खलनायक बनला असून भारताविरूध्द येत्या २५ ऑगष्ट पासून लिड्सवर होणाऱ्या तिसऱ्या कसोटीत त्याचे नेतृत्व कसे ठरते यावरच त्याचे पुढील कर्णधारपदाचे गणित अवलंबून आहे.
                        आजमितीला इंग्लंडचा संघ एकदिवसीय व टि २० या प्रकारात आयसीसी मानांकनात अव्वल स्थानावर आहे. त्याचबरोबर वनडेचे ते विश्वविजेते तर टि-२० उपविश्वविजेते आहेत. परंतु या दोन्ही संघांचा कर्णधार ज्यो रूट नसून ओएन मॉर्गन आहे. रूटच्या कसोटी कर्णधारपदाच्या कारकिर्दीत इंग्लंडची कामगिरी ढासळत चालली आहे. त्याचाच एक भाग म्हणजे पहिल्या कसोटी विश्व अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यास पात्र ठरण्यात इंग्लिश संघ अपयशी ठरला. इंग्लिश क्रिकेट बोर्डाचा पूर्व इतिहास बघता इतके अपयशी ठरल्यानंतरही ते कोणत्याही कर्णधाराला जास्त वेळ कर्णधारपदावर राहू देत नाही. शिवाय टि-२० विश्वचषकानंतर इंग्लंडचा संघ मानाच्या
 " अॅशेस " मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार असून अशा पराभूत मानसिकतेचा कर्णधार ऑस्ट्रेलियाला पाठविणे इंग्लंडला परवडणारे नाही. कारण इंग्लंडमध्येच झालेल्या अॅशेस मालिकेत रुटच्या काही चुकीच्या निर्णयांमुळे इंग्लंडला त्या मालिकेत सदृढ परिस्थिती नंतरही दोन -दोन अशा बरोबरीवर समाधान मानावे लागले होते.
                      त्यामुळे भारताविरूध्दची राहीलेली  मालिका रूटसाठी मोठे आव्हान ठरणार आहे. जर हेडींग्ले कसोटीत इंग्लंडचा पराभव झाला तर भारताविरूध्दच्या पुढील दोन कसोटयात आपल्याला रूट कर्णधार म्हणून दिसणार नाही.

लेखक : -  
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक. 
इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत. 
Email:  dattavighave@gmail.com
close