पर्यावरण जनजागरण (७२) बेल:-
Eagle marmelos
पर्यावरण जनजागरणाचा नक्षत्रवनाच्यादृष्टीने विचार केल्यास कन्या राशीच्या चित्रा नक्षत्राचा आराध्यवृक्ष बेल हा आहे. चित्रा हे नक्षत्र मोत्यासारखे दिसते. चित्रा नक्षत्र चैत्र महिन्यात रात्रभर आकाशात स्वाती नक्षत्राच्या बाजूला दिसते. बेल वृक्षाला लक्ष्मीफल, सदाफळ असेही म्हणतात.
बेलाची फळे अत्यंत टणक असतात. हा वृक्ष औषधी असून घातक रेडिएशन/ लहरी थोपवण्यासाठी याचा वापर केला जातो. अणुभट्टीच्या सभोवती जे आवरण केले जाते ते बेलाच्या लाकडांचे केलेले असते. बेलाची साल पिवळ्या रंगाची असते तर लाकूड हे पिवळे,पांढरे आणि कठीण असते. जसे लाकूड सुकत जाते तसे ते फाटत जाते व त्यातून सुगंध येतो. बेलाची पाने त्रीदलात म्हणजे तीन असतात. मधले पान इतर दोन पानांपेक्षा मोठे असते.
बेलाची फुले हिरवट पांढऱ्या रंगाची चार पाच पाकळ्या असलेली साधारण मे महिन्यामध्ये फुलतात. याच वेळेला या वृक्षाला नवीन पालवी फुटते. बेलाचे फळ हे अत्यंत टणक हिरव्या रंगाचे आणि पिकले की पिवळ्या रंगाचे असते. यामध्ये लाल-पिवळ्या रंगाचा गर असतो आणि भरपूर बिया व तेल असते. बेलफळ हे तुरट गोड आणि पचायला जड असते. अपचन, हागरट डीसेंट्री यावर बेलाचा गर उपयुक्त आहे. या गराचे सरबत देखील होते. उन्हाळ्यातील उष्णता बाधू नये म्हणून, खोकला, दमा यावर उपयोगी ठरते. तसेच बेलाच्या पानांचा रस हा दमा, खोकला, पडसे, रक्तातील शर्करेचे प्रमाण कमी करणे यासाठी उपयोगी ठरतो.
बेलाचे मूळ, साल, पाने, पिकलेली फळे याच्यापासून दशमूल काढा तयार करतात. हृदयाची धडधड होणे, मानसिक संतुलन बिघडणे, शरीरातून, घामातून दुर्गंधी येणे यासाठी हा काढा वापरतात. शरीरात येणारी सूज प्रामुख्याने बरगड्यांच्या सूजेवर बेलाच्या पानांचा शेक दिल्याने फायदा होतो.
वृक्ष आणि जीवसृष्टी यांचं घनिष्ट नातं आहे यातून सुधारणावादी मानवाने बोध घेऊन वृक्ष लागवड, वृक्ष संवर्धन आणि त्यातून पर्यावरणाचे रक्षण करणे ही राष्ट्रभक्ती आहे हे समजून आचरण करणे ही काळाची गरज आहे.
लेखक : चंद्रकांत शहासने, पुणे
संतवांड़मयाचे विज्ञाननिष्ठनिरुपणकार
मोबाईल क्रमांक : ९८८१३७३५८५
*कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्ट पुणे यांच्यावतीने पर्यावरण जनजागृती उपक्रमांतर्गत..
*पर्यावरण दिन ५ जून २०२१पासून वन हुतात्मादिन ११ सप्टेंबर २०२१पर्यंत असे ९९ दिवसांचे पर्यावरण जनजागृती अभियान

