shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पहिल्या कसोटीत पावसाची खलनायकी भूमिका..!!



                 भारत व इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेला बुधवारी इंग्लंडमधील नॉटिंगहॅम येथे सुरुवात झाली. मुळात पावसाच्या सावटातच हि कसोटी होणार हे पहिल्यापासून सर्वांनाच ठाऊक होते.  ढगाळ व पावसाळी वातावरणाचा अंदाज घेत दोन्ही संघांनी ४-४ जलदगती गोलंदाज संघात घेऊन खेळपट्टी व हवामानाचा लाभ घेण्याचं ठरविलं. भारताने आपल्या संघात रविंद्र जडेजाच्या रूपात एकमेव फिरकीपटू संघात घेतला, तो केवळ फलंदाजीच्या जोरावर. तर इंग्लंडने एकाही फिरकी गोलंदाजाला आपल्या संघात स्थान दिले नाही. शिवाय कामचलाऊ फिरकी गोलंदाज कर्णधार ज्यो रूटने एकही षटक टाकले नाही.

                     सामन्याच्या तिनही दिवशी शेवटच्या सत्रातील खेळ पाऊस, अपुरा सुर्यप्रकाश व खराब हवामानाने प्रभावित केला आहे. खेळात वारंवार व्यत्ययामुळे ना फलंदाजांना स्थिर होता आले ना धड गोलंदाजांना आपली लय साधता आली. तरीही दोन्ही संघांनी आपले  पहिले डाव पूर्ण केले आहेत तर इंग्लंडने आपला दुसरा डाव सुरू केला आहे. मात्र पावसाने आपली खलनायकाची भूमिका व्यवस्थित पार पाडल्याने त्याचा सामन्याच्या निकालावर देखील परिणाम होऊ शकतो आणि त्याचा सर्वात मोठा फटका भारताला बसण्याची शक्यता आहे.

                     भारताच्या वेगवान गोलंदाजांनी आपले कर्तव्य ईमाने इतबारे पार पाडल्यानंतर प्रमुख फलंदाजांनी आपल्या लायकीप्रमाणे खेळ न केल्याने खराब चांगल्या सुरुवातीनंतरही भारताचा डाव अडचणीत आल्या होता. दहा वर्षांच्या प्रदिर्घ कालखंडा नंतर भारतीय सलामीवीरांनी सेना देशात (९७ धावांची) सलामी दिली. मात्र त्यानंतर चेतेश्वर पुजाराने गेल्या अनेक सामन्यातील अपयशाची परंपरा कायम ठेवली. पुढच्या डावात जर तो पूर्ण क्षमतेने खेळला नाही तर दुसऱ्या कसोटीत कदाचित तो आपल्याला खेळताना दिसणार नाही तर त्याच्या ऐवजी सुर्यकुमार यादव कसोटी पदार्पण करू शकतो.

                        कर्णधार कोहली जगातील अग्रगण्य खेळाडूंत गणला जातो मात्र गेल्या १२ सामन्यातील ४ शुन्य त्याच्या अपयशाचे दर्शन घडवितात. तोच जर अपयशी ठरत असेल तर इतर फलंदाजांना बोलण्याचा नैतिक अधिकार तो गमावून बसतो. तेंव्हा त्याने सर्वप्रथम आपल्या स्वतःच्या खेळात सुधारणा करणे गरजेचे आहे.

                        उपकर्णधार अजिंक्य राहाणेचे खेळात नसलेले सातत्य त्याला टिकेचे धनी बनवत आहे. या सामन्यात एक अनावश्यक धाव घेण्याची त्याची घाई संघाला संकटात टाकून गेली. परिणामतः त्यावर सर्व प्रसिध्दी माध्यमे तुटून पडली. धावबाद होणं हा क्रिकेट मधील अपघाताचा प्रकार आहे. तरी राहाणे सारख्या अनुभवी फलंदाजाने सभोवताली लक्ष ठेवणे गरजेचे आहे. वर्ल्ड टेस्ट चॅंपियनशिपच्या पहिल्या पर्वात भारताकडून सर्वाधिक ११४९ धावा त्यानेच काढल्या आहेत हे तथाकथीत क्रिकेट पंडितांनी विसरू नये. शिवाय ऑस्ट्रेलिया २-० अशी त्याने नेतृत्व केलेल्या तीन सामन्यांची मालिका त्याने भारताला जिंकून दिली आहे. त्यामुळे त्याच्या क्षमतेचा सर्वांनी आदर करणे गरजेचे आहे.

                         लोकेश राहुलने तब्बल दोन वर्षानंतर कसोटी खेळताना दोनशेच्यावर चेंडू खेळून ८४ धावा करून भारताच्या डावाला आकार दिला. बऱ्याच दिवसांपासून कसोटी खेळत असल्यामुळे त्याचे साथी फलंदाजांबरोबर सामंजस्य काही वेळा नसल्याचे जाणवले. रोहीत, पंत, जडेजा त्याच्या चुकांमुळे धावबाद होता होता वाचले तर अजिंक्य राहाणे धावबाद झाला. शिवाय चांगल्या खेळीचे शतकात रूपांतर करण्यात तो कमी पडला.
                      
                 आश्विन सारख्या अव्वल फिरकी गोलंदाजाला वगळून रविंद्र जडेजाला संघात घेतल्याने प्रश्नचिन्ह उभे राहीले होते. परंतु जडेजाने आपल्या झुंजार ५६ धावांनी सर्व प्रश्नांची उत्तरे दिली.रिषभ पंत कोरोनातून अद्याप पूर्णपणे सावरला नसल्याचे जाणवते. तर शार्दूल ठाकूरने सावधगिरीने फलंदाजी करणे गरजेचे आहे. बुमराहा, शमी, सिराजने शेवटी आपल्या बॅटनेही चमत्कार दाखविताना इंग्लंडवर ९५ धावांची आघाडी मिळविण्यात चांगल्या पैकी हातभार लावला.

                        इंग्लंडकडून केवळ दुसरीच कसोटी खेळणाऱ्या ओली रॉबिन्सनने पाच बळी घेऊन प्रभावित केले तर जिमी अँडरसनने कोहलीसह भारताच्या चार प्रमुख खेळाडूंना बाद करून आपला जुना दम अजूनही कायम असल्याचे दाखवून देत कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजात तिसऱ्या स्थानी झेप घेतली.सामन्याचे दोन दिवस अजून बाकी आहेत परंतु पाऊस आपली खलनायकी भूमिका कशी रंगवितो यावरच या सामन्याचे भवितव्य अवलंबून आहे.
लेखक : -  
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक. 
इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत. 
Email:  dattavighave@gmail.com
close