shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

महाराष्ट्रातील तरुण बिथरतोय..?


      तरुणाई म्हटलं की तरुण रक्त, चपळ पणा, जोश अशा उपमा दिल्या जातात. याच सळसळत्या रक्ताचा, ताकदीचा आणि जोशाचा उपयोग राष्ट्र निर्मितीसाठी आणि राष्ट्राच्या हितासाठी व्हावा असं स्वामी विवेकानंद आणि त्यांच्या सारख्या अनेक महापुरुषांना वाटायचं. तरुणांची जिद्द, चिकाटी आणि मेहनत याच्या जोरावर एखादं राष्ट्र कसं महासत्ता होऊ शकतं याची उदाहरणं जगात अनेक आहेत. भारतातही तरुणांची संख्या लोकसंख्येतील इतर वयोगटाच्या तुलनेत जास्त आहे, आणि म्हणूनच कदाचित भारत हा महासत्ता होऊ घातलेला देश आहे म्हणून सतत म्हटलं जातं. परंतु सद्य परिस्थिती लक्षात घेता व भारतातील तरुणाईचं निरीक्षण करता या वाक्यामध्ये साशंकता वाटू लागते.

       भारतातील आणि त्यातही महाराष्ट्रातील पूर्वीची परिस्थिती आणि पूर्वीची सुसंस्कृत पिढी हि जगाचं लक्ष वेधनारी पिढी होती, त्यांचा अभ्यास, त्यांचं वाचन, त्यांची काम करण्याची तीव्र इच्छा आणि या सर्वांहून अधिक महत्त्वाचे म्हणजे त्या पिढीचा शांत व सैयमी स्वभाव या सर्वांमुळे ती पिढी जगभरात चर्चेचा विषय ठारायची. आजचीही देशातील आणि महाराष्ट्रातील पिढी देशात आणि जगात चर्चेचा विषय ठरते आहे परंतु वेगळ्याच कारणाने.

       जस जसे जग पुढे जात आहे, जस जशी प्रगती होत आहे तस तसा तरुण काहीतरी वेगळ्याच वळणावर जाताना दिसू लागला आहे. प्रामुख्यानं महाराष्ट्रातील तरुण वर्ग आता पूर्णपणे वेगळ्या स्वभावाचा निर्माण झाल्याचं चित्र काहीसं दिसत आहे. अति आक्रमक स्वभाव, हेकेखोर वृत्ती, कमी सहनशीलता, प्रक्षोभकता, व्यसनाधीनता, टगेगिरी, टावाळखोरी आणि गुंडगिरी असा एकूण तरुण झाल्याचं पाहायला मिळतंय. तरुण हा मुळातच गरम रक्ताचा असतो, परंतु त्याचं हे गरम रक्त आता उकळायला लागलंय कि काय असं वाटू लागलं आहे.

       सध्याच्या सोशल मिडियाच्या काळात प्रसिद्ध होणं खूप सोपं आणि तितकंच आवघडाही झालं आहे. सोशल मीडियावर काहीतरी लक्षवेधक टाकलं कि आपण झटपट प्रसिद्ध होऊ याची खात्रीच जणू महाराष्ट्राच्या तरुणाईला झाली आहे. आणि कदाचित याच खात्रीतून मग वेगवेगळ्या प्रकारचे प्रक्षोभक डायलॉग मारत, हातात हत्यारं वैगरे बाळगत हे तरुण चित्रफीत (व्हिडिओ) बनवून सोशल मीडियावर व्हायरल करतात, आणि प्रसिद्धीच्या मागावर जातात. परंतु त्यांचा हा प्रसिद्धी साठीचा असलेलं खटाटोप पुढे त्यांचा स्वभावच होऊन बसतोय. आणि कदाचित याच स्वभावातून मग अति आक्रमकता त्यांच्यात येऊन हे तरुण भांडणं, माणाऱ्यांसारखी कृत्य निर्धास्त पणे करतात. त्यांची भीती इतकी नाहीशी झालेली असते की त्यांना आता भांडणात हत्यारं, लाठ्या-काठ्या, दांडे-दंडुके वापरायला काहीच वाटत नाही. आणि अशातच मग कोणाचा जीव जातो किंवा कोणी कायमचा अपंग होतो.

      आई-वडिलांनी पुरविलेल्या लाडाला खुली सूट समजून आजचा तरुण मनाला वाटेल तसा वागतोय आणि कुठेतरी वेगळ्याच वळणावर जातोय हे निश्चित. गळ्यात जाड-जुड सोन्याची साखळी, हातभर अंगठ्या, तोंडात घुटका, फाटका आवाज करणारी मोटारसायकल आणि सोबत त्याच्याच सारखी चार पाच तरुण मुलं यामध्ये आजच्या पिढीला सर्वस्व वाटू लागले आहे. प्रेम प्रकरणं, त्यातून निर्माण होणारी ईर्षा आणि त्या इर्षेतून काहीतरी अनुचित प्रकार घडणं हे या तरुणाईचं समीकरण होऊन बसलंय. कोणीतरी पुढारी नावाचा 'नकली नेता' याना भेटतो त्यांचे शौक पुरवतो आणि स्वतःचं पाठबळ यांच्या जीवावर दाखवतो, आणि मग हे तरुण त्या 'नकली' नेत्यासाठी भांडणापासून ते अगदी कुणाचा जीव घेण्यापर्यंत काहीही करतात. दलाली पासून दंगली पर्यंत आजच्या तरुणांचा पाय रोवला गेला आहे. जो नेता दंगल कर म्हणून सांगतो तो त्यानंतर जेल मध्ये सोडवायला देखील येत नाही याचं भान हि तरुणाई विसरतेय. 

      क्षणिक सुखासाठी आणि सोशल मीडिया सारख्या आभासी जगातील प्रसिद्धी साठी देशासह महाराष्ट्रातील तरुण बिथरतोय हे नक्कीच. तरुणांची वाढती गैर कृत्ये आणि तारुणांवरील वाढत्या पोलीस कारवाया हे सर्व पाहून लक्षात घेतलं पाहिजे की तरुणाला आता समज देणं गरजेचं आहे. शरीरातील ताकद, गर्मी, जोश आणि स्फूर्ती हि चांगल्या कामासाठी वापरली पाहिजे, कुण्या नकली नेत्यासाठी किंवा आभासी जगासाठी न जगता स्वतःसाठी, कुटुंबासाठी आणि देशासाठी तरुणाने जगले पाहिजे हे तरुणाने आता लक्षात घेतले पाहिजे. आणि असे जर झाले नाही तर हा तरुण पुढे जाऊन मोठ्या विध्वंसाला कारण ठरू शकतो. परिस्थिती हातात आहे तोवर यांना समज देणे गरजेचे आहे अन्यथा पुढील काळात तरुणाई साठी मोठ्या प्रमाणावर समुपदेशन केंद्रे सुरु करावी लागतील. त्यातही त्या समुपदेशनाचा त्यांच्यावर परिणाम होईल की नाही हेही सांगणे अवघड आहे.

तरुणांनो जागे व्हा! आभासी जगातून बाहेर येऊन स्वतःला बरबाद होण्यापासून वाचवा!

प्रा. अक्षय कमलाकर तेलोरे
(ग्रंथपाल) श्रीरामपूर.
९७६५९७२१०८
close