shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पर्यावरण जनजागरण(५४) : बहुगुणी अडुळसा...!!


 पर्यावरण संतुलनाच्या दृष्टीने नक्षत्रवनाचा विचार करता मेष राशीच्या पहिल्या अश्विनी नक्षत्राचा आराध्य वृक्ष अडुळसा(Adhatoda vasica) आहे. 
कुचला या वृक्षाला हा पर्याय आहे. कुचला वृक्षाप्रमाणे अडुळसा कडू आहे. मात्र या झाडाची उंची  १०ते १५ फूट एवढीच असते. 

चवीला आणि गंधाला कडवट असतो. आपल्या देशात समुद्रसपाटीपासून पंधराशे मीटर उंचीपर्यंतच्या प्रदेशात हे झुडूपवजा झाड आढळते. याची पाने साधारण वीस सेंटीमीटर लांबीची टोकाला निमुळती असतात. यावर लव असते. अडूळशाची पाने आणि सेंद्रियगूळ याचा काढा खोकल्यावर सरसकट घेतला जातो. अडुळसाला वसा/वासा असेही म्हणतात.

याची फुले पांढऱ्या रंगाची आणि उमलल्यावर लांबून सिंहाच्या जबड्यासारखी दिसतात म्हणून याला संस्कृतमध्ये सिंहास्य असेही म्हणतात. या सफेद रंगाच्या फुलांमध्ये भरपूर प्रमाणात मध असतो. हा मग चोखून खाता येतो. खोकल्यावर फारच उपयुक्त, गुणाकारी आहे. अडुळशाचे दोन प्रकार आहेत. पांढऱ्या फुलाचा आणि लाल फुलाचा. लाल फुलाच्या अडुळशाची पाने गडद हिरवी असतात आणि फांद्यांवर लाल रंगाच्या गाठी असतात, तुलनेने कडूपणा कमी असतो. काळा कफनाशक आणि उष्ण आहे.

रक्तपित्तावर अडुळसा हे अत्यंत उपयुक्त औषध आहे. पांढऱ्या फुलांचा अडुळसा सरसकट आढळून येतो. अडुळशाची पाने पाण्यात टाकली असता जंतूंचा नाश करतात. पाणी खराब होत नाही. अडुळशाच्या पानावर फळे ठेवली असता ती सडत नाहीत. लोकरीच्या कपड्यात अडुळसा ठेवल्यास लोकरीला कसर लागत नाही. श्वसनेंद्रियांच्या आरोग्यासाठी अडूळसा उपयुक्त आहे. जुना खोकला, टीबी, श्वासाची घुसमट यासाठी अडुळसा उपयुक्त आहे.
पर्यावरणीय संतुलनाच्या दृष्टीने अडुळसा ही एक अत्यंत उपयुक्त वनस्पती आहे.


वृक्ष आणि जीवसृष्टी यांचं घनिष्ट नातं  आहे यातून सुधारणावादी मानवाने बोध घेऊन वृक्ष लागवड, वृक्ष संवर्धन आणि त्यातून पर्यावरणाचे रक्षण करणे ही राष्ट्रभक्ती आहे हे समजून आचरण करणे ही काळाची गरज आहे. 
चित्र आंतरजालावरून साभार 
लेखक : चंद्रकांत शहासने, पुणे
संतवाङ्मयाचे विज्ञाननिष्ठ निरुपणकार
मोबाईल क्रमांक : ९८८१३७३५८५
कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्ट पुणे यांच्यावतीने पर्यावरण जनजागृती  उपक्रमांतर्गत पर्यावरण दिन ५ जून २०२१पासून वन हुतात्मादिन ११ सप्टेंबर २०२१पर्यंत असे ९९ दिवसांचे पर्यावरण जनजागृती अभियान
संदर्भ : ले. सुभाष बडवे यांच्या नक्षत्रवन ग्रंथाच्या आधारे साभार.
close