लातूर । प्रतिनिधी :- देशाला स्वातंत्र्य मिळून बहात्तरी उलटून गेली तरी इथल्या वंचित, पिडीत, उपेक्षित, दुर्लक्षित भटक्या-विमुक्त समूहांचे प्रश्न अद्यापही सुटलेले नाहीत. अजूनही गावात घर नाही, रहायला जागा नाही, शेत-शिवार नाही, कागदपञांअभावी शासनाच्या कुठल्याच योजनांचा लाभ घेता येत नाही.
अशा प्रकारची अवस्था भटक्या-विमुक्त समूहांची झालेली आजही आपणास पहायला मिळते. या समूहाचे प्रश्न का सुटत नाहीत हाही एक यक्ष प्रश्न बनला आहे. त्यामुळे भटक्या विमुक्तांना मुलभूत हक्क व सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्या, यासाठी भटक्या विमुक्तांतर्फे संघर्ष वाहिनी व वडार समाज संघ ,महाराष्ट्र राज्य तर्फे राज्यभर निवेदन देण्यात आले.
आज (ता. ३) तहसील लातूर कार्यालय येथे तहसीलदार लातूर यांना वडार समाज संघ तर्फे निवेदन सादर करण्यात आले. यात भटक्या विमुक्त जाती जमातींच्या नागरिकांना कागदपत्रे मिळण्यासाठी संबंधित निवासस्थानी कॅम्प लावून सर्व प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते भटक्या-विमुक्त समूहाचे अभ्यासक तथा वडार समाज संघ, महाराष्ट्र राज्य संघटनेच्या वतीने अध्यक्ष प्रा.श्रीकांत मुद्दे यांच्या मार्फत तालुका दंडाधिकारी साहेबांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
भटके विमुक्त जाती जमाती ह्या आपले बिऱ्हाड पाठीवर ठेऊन रोजगार व पोटाची खळगी भरण्यासाठी सतत भटकंती करीत असतात. त्यामुळे वयोवृद्ध पासून तर कोवळ्या बालकांपर्यंत कोणाचेच जन्म, मृत्यू, जात प्रमाणपञ दाखला, रहिवासी यांची योग्य ठिकाणी नोंद होत नाही. पोटाची खळगी भरण्यासाठी सततची भटकंती होत असल्याने मिळेल तिथे राहणे, मिळेल ती जमीन कसने, हेच पिढ्यानपिढ्या होत आहे. मात्र, आज भटक्या विमुक्त जाती जमातीमधील मुले -मुली मुख्य प्रवाहात येण्यासाठी धडपड करीत आहे, घरकुल योजनेचा लाभ मिळावा यासाठी प्रयत्न करीत आहे. मात्र त्यांची कागदोपत्री कुठेच नोंद नसल्याने कोणतेच कागदपत्रे उपलब्ध होत नसल्याने ही मंडळी आजही त्रस्त आहेत.
महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यातील, तालुक्यातील भटक्या विमुक्त जाती जमातींच्या वस्त्या आजही गावकुसाबाहेर आहेत. यात प्रामुख्याने गोपाळ, बेलदार, भरवाड, पारधी, पांगुळ, वडार, लोहार, घिसाडी, नंदीबैलवाले, सिकलगर, गोंधळी, नाथजोगी, गोसावी, गवळी, बंजारा, वंजारी, भोई, ओतारी, यासारख्या इतर अनेक जातींच्या वस्त्या आणि तांडा आहेत. मात्र सरकारी योजना यांच्या पर्यंत पोहचतच नाही.
महाराष्ट्रभरात प्रशासनाने एकाच ठिकाणी एकाच वेळेस भटक्या विमुक्त जाती जमातींच्या नागरिकांना रहिवासी दाखला, राशनकार्ड, आधारकार्ड, निवडणूक कार्ड, जातीचे प्रमाणपत्र, घराचे पट्टे, शेत जमिनीचे पट्टे, वनजमीन हक्क दावे निपटारा, निराधार, एकल महिलांना पेन्शन व प्रमाणपत्र योजना उपलब्ध करून देण्यात यावे. अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते भटक्या-विमुक्त समूहाचे अभ्यासक तथा वडार समाज संघ, महाराष्ट्र राज्य संघटनेच्या वतीने अध्यक्ष प्रा.श्रीकांत मुद्दे यांनी तालुका दंडाधिकारी साहेब, तहसील कार्यालय यांच्या मार्फत मा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब यांना निवेदन दिले आहे.
तसेच हे सर्व प्रमाणपत्र, हक्क, अधिकार स्थानिक पातळीवर जिल्हा प्रशासनाने तातडीने उपलब्ध करुन देण्यात यावे, अशी मागणी वडार समाज संघ,महाराष्ट्र राज्य संघटनेच्या वतीने करण्यात आले. याप्रसंगी शहराध्यक्ष रमाकांत मुद्दे, अनिल भांडेकर, गोविंद मुद्दे, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख सचिन वाडीकर, श्रीहरी सूर्यवंशी ,रोहित कंदलगावकर, बालाजी भांडेकर, अहमदपूर तालुकाध्यक्ष अंकुश तांदूळे, उदगीर तालुकाध्यक्ष अशोक शेल्हाळे, औसा तालुकाध्यक्ष भिमाशंकर बंडगर, कार्याध्यक्ष आकाश सूर्यवंशी आदी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

