बिद्रे हत्या प्रकरण: कुंदन भंडारीकडून पोलिसांची दिशाभूल..!
विनया मेढेकर । पनवेल :
सहायक पोलिस निरीक्षक अश्विनी बिद्रे यांच्या हत्येनंतर कुंदन भंडारी याने पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी आपला मोबाईल नंबर पोर्ट करून घेतला होता ; मात्र या हत्याकांडातील साक्षीदार टाटा इंडिकॉमचे नोडल अधिकारी बेबी जॉन यांच्या सरतपासणी दरम्यान विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांनी कुंदन भंडारी हा मोबाईल १ फेब्रुवारी २००६ पासून वापरत होता. हे कागदपत्रासह न्यायालयात सिद्ध केले. त्यामुळे कुंदन भंडारी हा अश्विनी बिद्रे यांची हत्या झाली, त्या दिवशी व इतर दिवशी त्या भागात नव्हता हे दाखविण्याचा आरोपींच्या वकिलांचा प्रयत्न फसला.
अश्विनी यांची हत्या ११ एप्रिल २०१६ रोजी संध्याकाळी झाली होती . त्यानंतर तीन दिवस कुंदन भंडारी याचे लोकेशन मिरा रोड भागात होते . याबाबतचे पुरावे असताना आरोपींचे वकील अॅड . विशाल भानुशाली यांनी भंडारी याने ५ मे २०१६ रोजी मोबाईल घेतला आणि तो ९ मे २०१६ रोजी तो सुरू झाला, असे कागदपत्र न्यायालयात सादर केले होते याला विषेश सरकारी वकिल प्रदिप घरत यांनी विरोध केला. या प्रकरणात बेबी जाॅन यांची पुन्हा सरतपासणी घेण्याची विनंती पनवेल सत्र न्यायाधीश माधुरी आंनद यांना केली, ती न्यायालयाने मान्य केल्यानंतर शुक्रवारी सरतपासणी झाली .कुंदन भंडारी हा २००६ पासुन टाटा इंडिकाॅमचा मोबाईल वापरत होता. अश्विनी बिद्रेची हत्या झाल्यावर त्यानी सीम पोर्ट केले.
पुढील सुनावणी २७ ऑगस्टला होणार आहे .
खटला पुढे ढकलण्याचा प्रयत्न,बिंद्रे याचे पती राजु गोरेंचा आरोप
वेगवेगळे तांत्रिक मुद्दे उपस्थित करुन खटला पुढे चालू नये म्हणून अडथळे आणुन खटला पुढे कसा ढकलता येईल असा प्रयत्न सुरु आहे, असा आरोप अश्विनी बिंद्रे याचे पती राजु गोरे यांनी केला आहे.

