पर्यावरणरक्षणाच्या दृष्टीने नक्षत्रवनाचा विचार केल्यास मेष राशीतील तिसरे नक्षत्र कृतिका असून त्याचा आराध्य वृक्ष औदुंबर (Ficus racemosa)आहे. औदुंबर म्हणजे उंबर. कृतिका नक्षत्र मे महिन्यामध्ये दिसते. या नक्षत्राला इंग्रजीमध्ये इटा टाउरी असे म्हणतात. उंबराच्या झाडाची अनेक नावे आहेत. यज्ञांग, क्षीरवृक्ष ,औदुंबर. विशेष म्हणजे या झाडाच्याजवळ पाण्याचा स्रोत असतो. औदूंबर भरपूर पावसाच्या प्रदेशात वाढतो.
औदुंबराच्या वाढीस सूर्यप्रकाश देखील भरपूर लागतो. झाडाची फळे शरीरातील उष्णता कमी करतात. उंबर शितल, मधुर, रूक्ष, तुरट असून, कफ, पित्त, अतिसार, योनीरोगात उपकारी ठरतो.
उंबराची फळे जवळजवळ वर्षभर असतात त्यामुळे या वृक्षावर पक्ष्यांचे भरपूर वास्तव्य असते. तसेच झाडाची सावली अत्यंत शीतल असल्याने प्राण्यांचेदेखील वास्तव्य असते. उंबराच्या फळांमध्ये टॅनीन, मेण, रबर, सिलिका व फॉस्फरीक ऍसिड असते. शरीरावर आलेली सूज आणि वेदना घालवण्यासाठी उंबराच्या चिकाचा लेप लावतात. उंबराची पिकलेली फळे ही पोटातील कृमी नष्ट करतात. फळांच्या रसाने उचकी बंद होते. उंबराचे पान हे काविळीवर, विंचूदंशावर औषध आहे.
प्रजोत्पादन कार्यामध्ये उंबराचा काढा तसेच उंबराचा चीक हा उपयुक्त आहे. नाकातोंडातून अथवा लघवीतून रक्त येत असेल तर त्यावर उंबराची फळे आणि साल उपयुक्त ठरतात. हवेत गारवा आणि प्रसन्नता यासाठी उंबर, औदूंबर वृक्ष ओळखला जातो. या वृक्षाखाली दत्तगुरूंचे वास्तव्य असते म्हणून या वृक्षाचे अजून विशेष महत्त्व आहे.
वृक्ष आणि जीवसृष्टी यांचं घनिष्ट नातं आहे यातून सुधारणावादी मानवाने बोध घेऊन वृक्ष लागवड, वृक्ष संवर्धन आणि त्यातून पर्यावरणाचे रक्षण करणे ही राष्ट्रभक्ती आहे हे समजून आचरण करणे ही काळाची गरज आहे.
लेखक : चंद्रकांत शहासने, पुणे
संतवांड़मयाचे विज्ञाननिष्ठनिरुपणकार
मोबाईल क्रमांक : ९८८१३७३५८५
संदर्भ : ले.सुभाष बडवे यांच्या नक्षत्रवन ग्रंथाच्या आधारे साभार
कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्ट पुणे यांच्यावतीने पर्यावरण जनजागृती उपक्रमांतर्गत...पर्यावरण दिन ५ जून २०२१पासून वन हुतात्मादिन ११ सप्टेंबर २०२१पर्यंत असे ९९ दिवसांचे पर्यावरण जनजागृती अभियान

