shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पर्यावरण जनजागरण (५८):बहुमूल्य जांभूळ...!



पर्यावरण जनजागरणाच्यादृष्टीने नक्षत्रवनाचा विचार केला तर वृषभ राशीचे नक्षत्र रोहिणी हे असून याचा आराध्यवृक्ष जांभूळ हा आहे. रोहिणी हे नक्षत्र कार्तिक महिन्यात दिसते. रोहिणी नक्षत्राचे चारही चरण वृषभ राशीत येतात. अत्यंत जलद वाढणारा जांभूळ म्हणजेच जंबु हा स्थानिक वृक्ष असून तो भारतात सर्वत्र दिसून येतो. त्यामुळे आपल्या भारत देशाला जंबुद्वीप असेही म्हणतात. 

जांभळाच्या झाडांमध्ये पाणी स्वच्छ करण्याचा गुणधर्म आहे. जांभळाचे ओंडके तळ्यामध्ये टाकण्याची रीत पूर्वी होती तसेच जलाशयाच्या सभोवती जांभळाची झाडे लावण्याची पद्धत होती. जांभूळ वृक्ष शंभर फूट उंच वाढू शकतो. तो सदाहरित आहे. वसंत ऋतुमध्ये जांभळाला मोहर येतो. जांभळाचे झाड हे भरपूर पाऊसमान असेल तरीही चांगल्या प्रकारे वाढते. जांभळाची फुले पांढऱ्या, सोनेरी रंगाची असतात व साधारण फेब्रुवारीपासून मे महिन्यापर्यंत फुलोरा असतो. मे महिन्यापासून मे जून जुलै अखेरपर्यंत जांभळाची फळे उपलब्ध असतात. #जांभळाचे चार प्रकार आहेत. १)शूद्र जम्बू : लहान आकाराचे फळ असते आणि गर अत्यंत कमी असतो २)नदीजम्बू :  हे झाड प्रमुख्याने नदीच्या किनारी आढळते  ३)भूमी जंबू : हा कमी उंचीचा वृक्ष असतो आणि वाटाण्याच्या आकारासारखे फळ असते  ४)गुलाबजम्बू : या झाडाची फळे गुलाबी आणि फळाला गुलाबाचा सुगंध असतो. बी लहान आणि गर जास्ती असतो. याला राजजम्बू असेही म्हणतात. 

जांभूळाचे पान, खोड देखील औषधी आहे. जांभूळ कफनाशक व पित्तशामक असते मात्र हे वात वाढवते. यकृताच्या सुदृढ आरोग्यासाठी जांभूळाचा  उपयोग होतो. उलटीचा त्रास असेल तर कोवळ्या पानांचा रस द्यावा. #मधुमेहाचा समूळ नाश करण्यासाठी जांभूळ उपयुक्त असते. अतिसारावर जांभळाच्या पानांचा रस, फळे, साल गुणकारी आहे. दाढ, दात, घसा, दुखत असल्यास  जांभळीची  साल पाण्यात कुटून गुळणी करणे गुणकारी असते. रक्तदाब संतुलित करण्यासाठी  जांभळाचे फळ गुणकारी आहे. विंचवाच्या दंशावर जांभळीच्या पानांचा रस लावावा. मुखरोगावर जांभूळ, बाभूळ, बोर, कडूनिंब, खैर या झाडाच्या अंतरसालीचे थंड पाणी काढून गुळण्या कराव्यात. याने दात बळकट होतात.  पोटामध्ये लोहाचा अंश गेला अथवा केस गेला तर जांभळे खाण्याने तो विरघळून जातो. 

मुरूम, गळवे, घामोळे यावर जांभळाच्या बिया उगाळून लेप लावावा. जांभळाच्या लाकडाला वाळवी लागत नाही. अशाप्रकारे जांभूळ ही वनस्पती पर्यावरण रक्षणासाठी अत्यंत उपयुक्त आहे यासाठी जांभळाच्या झाडांचे संवर्धन करणे गरजेचे आहे.
वृक्ष आणि जीवसृष्टी यांचं घनिष्ट नातं  आहे यातून सुधारणावादी मानवाने बोध घेऊन वृक्ष लागवड, वृक्ष संवर्धन आणि त्यातून पर्यावरणाचे रक्षण करणे ही राष्ट्रभक्ती आहे हे समजून आचरण करणे ही काळाची गरज आहे. 
लेखक : चंद्रकांत शहासने, पुणे
संतवाङ्मयाचे विज्ञाननिष्ठ निरुपणकार
मोबाईल क्रमांक : ९८८१३७३५८५
#कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्ट, पुणे यांच्यावतीने पर्यावरण जनजागृती  उपक्रमांतर्गत...
पर्यावरण दिन ५ जून २०२१पासून वन हुतात्मादिन ११ सप्टेंबर २०२१पर्यंत असे ९९ दिवसांचे पर्यावरण जनजागृती अभियान
close