प्रकाश मुंडे | बीड जिल्हा प्रतिनिधी:-
केज तालुक्यातील साळेगाव येथे राज्य परिवनहन महामंडळाच्या सर्व मध्यम व लांब पल्ल्याच्या गाड्यांना थांबा देण्यात आला आहे.
केज तालुक्यातील साळेगाव हे मध्यवर्ती ठिकाण असून येथील जनावरांचा मोठा आठवडी बाजार भरतो. त्यामुळे जिल्हा आणि जिल्ह्या बाहेरील व्यापारी, शेतकरी येथे व्यापासाठी येत असतात. तसेच सातेफळ, हदगाव, डोका, शेलगाव गांजी, बोबडेवाडी सारूकवाडी, मांगवडगाव, लाखा येथील प्रवाशांचे ते मध्यवर्ती ठिकाण आहे. साळेगाव हे सुमारे पाच हजार लोकवस्तीचे गाव असून सरकारी व खाजगी कामांसाठी येथून पुणे, औरंगाबाद, पंढरपूर, बार्शी, माजलगाव, बीड, कोल्हापूर कडे जाणारे नियमित प्रवाशी ये-जा करीत असतात. म्हणून येथील नागरिकांनी प्रवाशांच्या सेवेसाठी सर्व गाड्यांना थांबा देण्याची मागणी केज मतदार संघाच्या आमदार नमिताताई मुंदडा यांच्याकडे केली होती.
त्याची दखल धारूर आगाराचे आगार व्यवस्थापक स्वामी यांनी घेतली. त्या नुसार दि. २६ ऑगस्ट रोजी पत्र क्र.रा.प./आ.प्र.क. /धारुर/२०२१ /३५५ पत्राद्वारे साळेगाव येथे सर्व मध्यम व लांब पल्ल्याच्या गाड्यांना अरक्षणासह थांबा दिला आहे.
यामुळे आता या थांब्यातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन एसटी महामंडळ व सामाजिक कार्यकर्त्यांनी केले आहे.

