आदिवासींचा तारा निखळला!
अमरावती:-आरोग्य केंद्र म्हणजे आपलं घर, रुग्ण म्हणजे आपल्या कुटूंबाचे सदस्य मानणाऱ्या अमरावती जिल्ह्यातील तळेगाव दशासर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य सेवक संतोषभाऊ वायकोळे वय ४५ वर्ष यांचे शनिवारी रात्री निधन झाले.सर्व सामान्य रुग्णाचा आधार तसेच आदिवासींचा तारा निखळला, संतोषभाऊ यांच्या निधनाने आरोग्य खात्यात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
हिंगोली जिल्ह्यातील कळंबनोरी येथील संतोष वायकोळे हे रहिवासी, सन २००९ मध्ये आरोग्य सेवेत ते रुजू झालेत. जन्म आणि मृत्यूच्या दरम्यान संजीवनी ठरणारी एकमेव म्हणजे आरोग्य सेवा, लोकमत रिपोर्टर म्हणून मागील दोन वर्षांपूर्वी येथील आरोग्य सेवक मनोज सरदार यांच्यामुळे या कर्तुत्ववान व्यक्तिमत्त्वाची माझी ओळख झाली. संतोषभाऊ यांची नियुक्ती थेट प्रथमच मेळघाट परिसरात झाली. कळमखार पीएचसी सेंटर अंतर्गत येणाऱ्या गावातील आदिवासी बांधवांच्या मनात आरोग्यविषयक मोठी भीती निर्माण होती साधा खोकला ताप असला तरी भुमका यांच्याकडे आदिवासी बांधव जात होते मात्र संतोषभाऊ यांनी या आदिवासींच्या मनातील ही भीती दूर करून औषध उपचारामुळे कोणताही आजार बरा होऊ शकतो हे त्यांनी पटवून दिले त्यानंतर हेच आदिवासी बांधव संतोषभाऊ यांना देवमानूस मानू लागले.
पाच वर्षे या दुर्गम भागात त्यांनी सेवा दिली त्यांच्या स्थानांतरणवेळी आदिवासींनी आपल्या अश्रूला वाट मोकळी करून दिली होती. धामणगाव तालुक्यातील तळेगाव दशासर येथे संतोषभाऊची बदली झाल्यानंतर या सच्चा माणसाने आरोग्य केन्द्र म्हणजे आपल घर तर रुग्ण म्हणजे कुटूंबातील सदस्य म्हणून आपले स्वतःचे आयुष्य जनसेवेसाठी वाहून घेतले. दैनंदिन १७ ते १८ तास सेवा देत सर्वांना आपलंसं करून घेतले. मागील दीड वर्षात या माणसाने कोरोना काळात आपल्या घरावर तुळशीपत्र ठेवले.
एखाद्या रुग्णाला सर्दी तापाची गोळी जरी पाहिजे असेल तरी संतोषभाऊ रात्री अपरात्री येऊन औषध उपचार करीत असत अलीकडच्या काळात कोरोना प्रतिबंधक लसीचे चे नियोजन त्यांच्याकडे होते एका दिवशी दोनशे ते अडीचशे ग्रामस्थांना कशी लस द्यायची यासाठी सकाळी सात वाजता पासून रात्री सात पर्यंत प्राथमिक आरोग्य केंद्रात सेवा देऊन नंतर मलेरिया व डेंग्यूमुळे फॉगिंग मशीन चे नियोजन संतोषभाऊ कडे होते. एखादा आरोग्य कर्मचारी दररोज बारा ते अठरा तास काम केल्यानंतर त्याची अवस्था काय होईल हे विचार करण्यापलीकडे आहे.
शनिवारी (दि.२१ ऑगस्ट) रात्री दवाखान्यात बसल्यानंतर त्यांना थकवा जाणवला लगेच त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू केला मात्र संतोषभाऊ ची प्राणज्योत मालवली.
संतोषभाऊ च्या पत्नी चित्राताई यांनी आज आरोग्य कर्मचाऱ्यांचे आयुष्य त्यात संतोषभाऊ चे मागील बारा वर्ष सेवेत कसे होते हे हंबरडा फोडून सांगितले त्यावेळेस पंचायत समिती सभापती महादेवराव समोसे तालुका आरोग्य अधिकारी हर्षल क्षीरसागर यांच्यासह शेकडो आरोग्य कर्मचारी ग्रामस्थ,,पत्रकार बांधव आपल्या डोळ्यातील अश्रू थांबू शकले नाही.
संतोषभाऊनी मागील बारा वर्षात आपल्या आरोग्य सेवेला अधिक महत्त्व दिले.सततच्या ड्युटी मुळे आपल्या कुटुंबाला बाहेर फिरायला नेण्यासाठी त्यांना कधीच वेळ मिळाला नाही कोरोनाच्या काळात स्वतःच्या मुलांना सहा महिने भेटता आलं नाही. केवळ आपली ड्युटी म्हणजे ड्युटी. लोकांना सध्या आरोग्यसेवेची अत्यंत गरज आहे त्यांच्या जन्म -मरणाचा प्रश्न आहे त्यामुळे आम्हा आरोग्य कर्मचार्यांना कुठे जाता येत नाही असे ते म्हणत लोकांची सेवा करू, हे महामारीचे आणि कोरोनाचे दिवस गेल्यानंतर दोन्ही लहान मुलांना वेळ देईल असे ते नेहमी म्हणत असत. चित्राताई ने मांडलेली ही व्यथा आज राज्यातील सर्वच आरोग्य कर्मचाऱ्यांची आहे अनेक पदे रिक्त आहेत एकाच आरोग्य कर्मचाऱ्यांना १८ ते २० तास ड्यूटी करावी लागते संतोषभाऊ सारख्या हजरजबाबी व्यक्तिमत्वाच कामाच्या वाढत्या बोजामुळे एक्झिट होणं ही आरोग्य खात्यासाठी मोठी धक्कादायक व दुःखदायक घटना आहे . राज्यातील आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, आरोग्य कर्मचारी ,डॉक्टर हे दोन वर्षात आपले आयुष्य कसे जगतेय याकडे राज्याच्या आरोग्य खात्याने या दुःखद घटनेपासून काही तरी शिकणे महत्त्वाचे आहे.
स्व.संतोषभाऊच्या कुटुंबियांना दुःख सहन करण्याची ईश्वर शक्ती देवो हीच प्रार्थना! संतोषभाऊ यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
मोहन राऊत लोकमत,
पत्रकार धामणगाव रेल्वे, अमरावती.
मो न ९४२३८८२८२९

