राग आणि माणूस एकाच नाण्याच्या दोन बाजू. राग यायला वेळ व कारण लागत नाही. राग कधीही येऊ शकतो.रागावर नियंत्रण ठेवणे ही एक फार अवघड बाब. रागावर नियंत्रण ठेवण्यात मोठमोठे तपस्वी अपयशी ठरले आहेत. तर मग सामान्य माणसाची काय बिशाद ? आणि मग भर मैदानात हजारो प्रेक्षकांसमोर जर एखादया क्रिकेटपटूला राग आल्यावर काय महाप्रसंग उद्भवतो हे आपण अनेकदा बघितले आहेत. मग रागाच्या भरात त्या खेळाडूच्या खेळाचं कसं वाटोळं झालं त्याचबरोबर त्याचा संघ कसा खाईत गेला याचे अनेक उदाहरणे आपल्याला माहीती असतीलच. परंतु असे काही कलंदर खेळाडूही आहेत की ज्यांनी भर मैदानात अचानक उद्भवलेल्या अतिप्रसंगानंतर स्वतःवर व रागावर काबू ठेऊन अजरामर खेळी तर केलीच शिवाय संघाला सदृढ स्थितीत नेताना स्वतःलाही विक्रमांच्या पुस्तकात मानाचे स्थान मिळवून दिले आहेत. अशाच काही खेळाडूंनी रागावर मिळविलेल्या नियंत्रणाच्या यशाची गाथा व कथा ऐकताना प्रत्येक जण हेलावून जातो.
भारत व इंग्लंड यांच्यात ४ ते ८ ऑगष्ट दरम्यान क्रिकेटची मक्का समजल्या जाणाऱ्या लॉर्डसवर एक खतरनाक सामना खेळला गेला. त्यात भारताने ऐतिहासिक विजय मिळविला हे आपणा सर्वांना ठाऊकच आहे. परंतु या विजया पेक्षा सर्वात जास्त लक्षात राहील ती या दोन संघातील खेळाडूंमध्ये झालेली बाऊंसर्सची जुगलबंदी ! या घटनेपूर्वी घडलेली घटना अशी की, नॉटींगहॅमच्या पहिल्या कसोटीत भारताचा जसप्रित बुमराहा २८ धावांची एक दमदार खेळी खेळला. या खेळी दरम्यान इंग्लिश गोलंदाजांनी बुमराहावर उसळत्या चेंडूंचा भडीमार केला. त्यात अग्रेसर होता जिमी अँडरसन ! बुमराहाने ही गोष्ट पक्की ध्यानात ठेवली व लॉर्डस कसोटीत जीमी अँडरसन फलंदाजीला आल्यानंतर त्याला उसळत्या चेंडूने जर्जर करून सोडले. त्यानंतर इंग्लिश गोलंदाजांनी बुमराहावर सुड घेण्याचे ठरविले.
भारताचा दुसरा डाव सुरू झाल्यावर बुमराहा दहाव्या क्रमांकावर खेळायला आला आणि सगळेच इंग्लिश वेगवान गोलंदाज त्याच्यावर तुटून पडले. त्याच्यावर उसळत्या चेंडूंचा वर्षावच केला. या हल्ल्याने बुुमराहा बिथरला नाही तर त्याचा खेळ आणखीच वधारला ! बुमराहानेे मोहम्मद शमीसह नाबाद ८९ धावांची झंझावाती भागीदारी करून इंग्लिश गोलंदाजांच्या शिडातली हवाच काढून घेतली. शमीने नाबाद ५६ व बुमराहाने नाबाद ३६ धावांची खेळी साकारून भारताला विजयाच्या समीप नेले. इंग्लंडचा दुसरा डाव सुरू झाल्यावर बुमराहाने आणखीच त्वेषाने खतरनाक मारा करून इंग्लिश फलंदाजीचे कंबरडेच मोडून टाकत तीन महत्वपूर्ण बळी घेतले व भारताला एक अशक्यप्राय विजय मिळवून दिला.
या पेक्षाही खतरनाक प्रकार घडला तो युवराजसिंग सोबत. युवराजसिंग बाबत घडलेला प्रसंग भारतीयच नव्हे तर जगातील कोणताही क्रिकेटरसिक विसरणे अशक्यच ! सन २००७ ची पहिली टि २० विश्वचषक क्रिकेट स्पर्धा दक्षिण आफ्रिकेत खेळली गेली. या स्पर्धेतील भारत व इंग्लंड यांच्यातील सामन्यात भारताची फलंदाजी सुरू असताना युवराजसिंग फलंदाजीला येण्यापूर्वी भारताची अवस्था बेताचीच होती. १८ व्या षटकाच्या अखेरीस युवराजसिंग व इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू अँड्र्यू फ्लिंटॉप यांच्यात शाब्दीक चकमक झाली. या प्रसंगानंतर युवराज चांगलाच भडकला पण यावेळी त्याने आपला सारा राग इंग्लिश गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडवर काढला. त्याच्या त्या षटकात सलग ६ षटकार ठोकत युवराजने थेट विश्वविक्रमच साकारला. युवराजने १६ चेंडूतील त्या खेळीत ५८ धावांची खेळी सजविताना आजही अबाधीत असलेलं टि २० तील केवळ १२ चेंडूतील सर्वात वेगवान अर्धशतक ठोकलं. त्याचबरोबर भारताला एक अविस्मरणीय विजय तर मिळवून दिलाच शिवाय देशाला विजेतेपद मिळवण्यात सिंहाचा वाटा उचलला. रागाच्या पाऱ्यावर नियंत्रण ठेवण्यात दुसऱ्या स्थानी आहे आणखी एक भारतीय खेळाडूच, आणि तो आहे हरभजनसिंग.सन २०१० ची आशिया चषक स्पर्धा. भारत व पाकीस्तान अंतिम फेरीत विजेतेपदासाठी झुंजत होते. विजय पाकिस्तानच्या आवाक्यात आला असताना पाकिस्तानचा जलदगती गोलंदाज शोएब अख्तर हरभजनसिंगला चिडवत होता. अशा प्रसंगी तापट स्वभावाच्या हरभजनने आपला आक्रमक बाणा बाहेर काढत रागाच्या भरात ११ चेंडूत नाबाद १५ धावा करतानाच पाकी गोलंदाज समजून चेंडूवर हल्लाबोल करत सलग दोन षटकार मारून भारताला विजेतेपद मिळवून दिले. सन २०१० च्या ढाका कसोटीत बांगलादेशचा सलामीवीर तमीम इकबाल फलंदाजी करत असताना भारताचा वेगवान गोलंदाज झहीर खान त्याला सतत डिवचत होता, त्यामुळे तमीमला अतिशय राग आला. परंतु त्याने आपला संयम राखत झुंजार खेळ करता १५१ धावा केल्या.
लेंडल सिमन्स हा विंडीजचा सलामीवीर.सन २०१६ च्या टि २० विश्वचषक स्पर्धेत भारताबरोबर झालेल्या अंतिम सामन्यात अतिशय रागात आला होता. तो फलंदाजी करत असताना भारतीय खेळाडू त्याला डिवचून सतावत होते. अशा बिकट प्रसंगी लेंडलने रागावर ताबा ठेवून ५१ चेंडूत ८१ धावा करत विंडीजला थेट विजेतेपदच मिळवून दिले. सन २०१८ च्या उन्हाळ्यात श्रीलंकेत निधास ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात भारताने दिनेश कार्तिकच्या ८ चेंडूतील नाबाद २९ धावांच्या खेळीमुळे विजेतेपद मिळविले.परंतु ही रागमिश्रीत खेळी साकारताना दिनेश कर्णधार रोहित शर्मावर भयंकर रागावला होता. त्याचं कारण असं की रोहितने दिनेश ऐवजी नवख्या विजय शंकरला अगोदर फलंदाजीस पाठविले होते.
लेखक : -
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक.
इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत.
Email: dattavighave@gmail.com

