पर्यावरण जनजागरणाचादृष्टीने नक्षत्रवनाचा विचार केला असता सिंह राशीच्या मघा नक्षत्राचा आराध्यवृक्ष वड आहे. (Ficus benghalensis) हा आहे.
वड हा वृक्ष खूप मोठा असतो. हा वृक्ष अमर आहे. याला सूर्यप्रकाशाची गरज असते. मोठमोठ्या पारंब्यांच्या साह्याने हा वृक्ष स्वतःला नवीन नवीन आधार तयार करतो. त्यामुळे हा कधीही नष्ट होत नाही. कलकत्त्याच्या वनस्पती उद्यानात दोनशे वर्षाचा वटवृक्ष आहे आणि त्याचा परीघ ४५५ मीटर आहे आणि खोडाची वेढी १७ मीटर आहे.
वड हा वृक्ष समुद्रसपाटीपासून बाराशे मीटर उंचीपर्यंत कुठेही येतो. हा सदाहरित आहे. वडाला लहान लहान आकाराची खूप फळे मार्च एप्रिल महिन्यात येतात. आणि पक्ष्यांचे, माकडांचे ते खाद्य आहे. अर्धवट खाल्लेली फळे झाडाखाली पडली की ती फळे खाण्यासाठी अन्य प्राणी झाडाखाली जमा होतात. अशाप्रकारे वडाच्या झाडावर आणि वडाच्या खाली पशुपक्षी, प्राणी यांचा अधिवास मोठ्या प्रमाणावर असतो. या झाडाची सावली भरगच्च व शांत असते.
वडाचा वृक्ष ५०० मिलिमीटर ते ४००० मिलिमीटर पावसाच्या प्रदेशात सर्वत्र आढळतो.
वड हा औषधी वृक्ष आहे. वडाची पाच सहा कोवळी पाने किंवा पारंब्या २० ग्रॅम मसुराबरोबर वाटून त्याचा लेप करून तो चेहऱ्यावर लावावा. त्वचा तजेलदार होते. वडाच्या पारंब्याचे तेल लावल्यास टकलावर केस येतात. पारंब्यांनी दात घासल्यास दातातील किडे मरतात. पायोरिया नाहीसा होतो. पानावर तूप लावून सुजेवर बांधल्यास आराम मिळतो. सतत पाण्यात काम करणाऱ्यांचे हातापायाच्या बोटांना चिखल्या होतात यावर वडाचा चिक लावल्यास त्या बऱ्या होतात. दुर्गंधी येत असलेली जखम वडाच्या सालीच्या काढ्याने धुवावी व वडाचा चीक जखमेवर लावावा.
मूत्र मार्गामध्ये त्रास होत असेल तर वडाच्या पिकलेल्या पानाचा काढा करून सकाळ संध्याकाळ ताजा प्यावा. वीर्यदोष, उष्णता, धातु पातळ होणे, इंद्रिय शिथीलता या आजारांमध्ये खडीसाखर मिश्रित काढा उपयुक्त ठरतो. वडाचे अंकुर हा गर्भधारणेसाठी अत्यंत उपयुक्त निसर्गोपचार आहे.
पर्यावरण संतुलनासाठी वडाचे झाड अत्यंत लाखमोलाचे आहे.
वृक्ष आणि जीवसृष्टी यांचं घनिष्ट नातं आहे यातून सुधारणावादी मानवाने बोध घेऊन वृक्ष लागवड, वृक्ष संवर्धन आणि त्यातून पर्यावरणाचे रक्षण करणे ही राष्ट्रभक्ती आहे हे समजून आचरण करणे ही काळाची गरज आहे.
लेखक : चंद्रकांत शहासने, पुणे
संतवांड़मयाचे विज्ञाननिष्ठनिरुपणकार
मोबाईल क्रमांक : ९८८१३७३५८५
*कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्ट पुणे यांच्यावतीने पर्यावरण जनजागृती उपक्रमांतर्गत..
*पर्यावरण दिन ५ जून २०२१पासून वन हुतात्मादिन ११ सप्टेंबर २०२१पर्यंत असे ९९ दिवसांचे पर्यावरण जनजागृती अभियान

