समस्त भारतीय क्रिकेट रसिकांच्या स्वप्नांचा चुराडा करत इंग्लंडने हेडींग्ले कसोटीत अवघ्या सव्वातीन दिवसात एक डाव व ७६ धावांनी पराभव करत मालिका बरोबरीत आणली. मागील तीन वर्षातील भारताचा हा कसोटीतील सर्वात मोठा पराभव. तसेच सर्वात धक्कादायक बाब म्हणजे वर्ल्ड टेस्ट चॅंपीयनशीपच्या दुसऱ्या पर्वातील गुणतालिकेत लॉर्डस कसोटीतील विजयानंतर अग्रस्थानी पोहचलेला भारतीय संघ चक्क तिसऱ्या स्थानावर फेकला गेला असून अग्रक्रमांकावर पोहोचला आहे भारताचा कट्टर दुश्मन पाकिस्तान ! अग्रक्रमावरील पाकिस्तानचे दोन सामन्यानंतर एक विजय व एक पराजय असून त्यांचे बारा गुण आहेत. परंतु त्यांची विजयाची टक्केवारी पन्नास टक्के इतकी आहे.
दुसऱ्या स्थानावरील वेस्ट इंडिजचीही अशीच आकडेवारी असून त्यांची धावगती पाकपेक्षा कमी आहे. तर तिसऱ्या स्थानावर घसरलेल्या भारताचे तीन सामन्यात प्रत्येकी एक विजय, पराजय व अनिर्णित अशी कामगिरी आहे. भारताचे १४ गुण असून विजयाची टक्केवारी ३८.८ इतकी असल्याने भारत तिसऱ्या स्थानावर आला आहे. म्हणजे भारत व इंग्लंडच्या लढाईत पाकिस्तानचा लाभ झाला. त्यामुळे " तुला ना मला टाक कुत्र्याला " हि सुपरिचित मराठी म्हण आठवली व ती येथे चपखल बसलीही !
इंग्लंडविरूध्दच्या तिसऱ्या सामन्यात पहिल्याच दिवशी कर्णधार कोहलीच्या प्रथम फलंदाजी करण्याच्या चुकलेल्या निर्णयानंतर सामन्याचा निकाल तेंव्हाच स्पष्ट झाला होता. त्यानंतर इंग्लंडच्या फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांचे ओरबडलेले चलके बघून भारतीय क्रिकेटरसिकांचे मने रक्तबंबाळ झाले होते. इंग्लिश फलंदाजांनी लाचार भारतीय क्षेत्ररक्षकांना मैदानाच्या सभोवार सैरभैर पिंगविले तेंव्हा नेहमी आक्रमक असणारा कर्णधार कोहली दात व नखे काढलेल्या हताश सिंहासारखा भासत होता. इंग्लंडने आत्मविश्वास खचलेल्या भारतीय संघावर ३५४ धावांची दम घुसमटवणारी आघाडी घेतली तेंव्हा भारत डावानेच सामना गमावणार हे स्पष्ट झाले होते.
परंतु सामन्याच्या तिसऱ्या दिवशी सलामीवीर रोहीत शर्मा व फॉर्मात नसलेल्या कोहली व चेतेश्वर पुजाराने त्यांच्या जुन्या लौकिकाला साजेसा खेळ केल्याने भारतीय समर्थकांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. परंतु सामन्याच्या चौथ्या दिवशी चेतेश्वर पुजारा आदल्या रात्रीच्या नाबाद ९१ धावांवर चेंडूची दिशा समजू न शकल्याने पायचितच्या जाळ्यात अडकला आणि तिथेच भारतीयांच्या आशेला सुरुंग लागला.
२ बाद २१५ धावांवरून सुरू झालेला भारताचा डाव दिवसाचे दोन तासांचे पहिले सत्र संपण्याच्या आत संपुष्टात आला. अवघ्या ६३ धावात ८ मातब्बर भारतीय फलंदाज बाद झाल्याने सन २००१ साली सौरव गांगुलीने ऑस्ट्रेलियाविरूद्ध कोलकाता कसोटीत मिळविलेल्या चमत्कारीक विजयाच्या पुनरावृत्तीची शक्यताही क्षणात मावळली.
कर्णधार कोहलीही कालच्या नाबाद ४५ धावात केवळ १० धावांची भर घालून परतला. या मालिकेत त्याने खेळलेल्या पाचही डावात तो एकाच पध्दतीने बाद झाल्याने त्याचे फलंदाजी करण्याचे तंत्र किती सदोष आहे हे सर्व क्रिकेट खेळणाऱ्या संघाना माहिती झाल्याने त्याचे सचिन तेंडुलकरचे सर्व विक्रम मोडण्याचे स्वप्न स्वप्नच राहण्याचे स्पष्ट झाले असून येत्या काही दिवसात त्याच्या कर्णधार पदावरही गंडांतर येऊ शकते.
उपकर्णधार अजिंक्य राहाणे १०, कोहलीचा लाडका रवींद्र जडेजा ३० वगळता इतरांना काहीच करता न आल्याने भारताला एक नामुष्कीजन्य पराभव पत्करावा लागला. ऑस्ट्रेलियात धुमाकूळ घालणाऱ्या रिषभ पंतच्या इंग्लिश गोलंदाजांनी मुसक्या आवळल्याने भारताची मोठी पंचाईत झाली. तर लॉर्डसला शमी- बुमराहाने केलेली खेळी फ्ल्यूक सिद्ध झाली. तसेच ईशांत शर्माचा खेळविण्याचा प्रयोग पुरा फसला.
अनुभवी व जोमात असलेल्या रवीचंद्रन आश्विनला विनाकारण संघाबाहेर बसवण्याचा फटका भारताला बसला असून मालिकेतील उर्वरीत दोन कसोट्या जिंकून मालिका खिशात घालायची असेल तर भारताला आश्विनसह शार्दूल ठाकूर व सुर्यकुमार यादवला संघात घ्यावेच लागेल. त्याचबरोबर कर्णधार कोहलीनेही विश्रांती घेवून शंभर टक्के यशाची सरासरी असलेल्या अजिंक्य राहाणेकडे किमान दोन कसोट्यांसाठी नेतृत्व द्यावे व भारताच्या विजयाचा आनंद ड्रेसिंग रूममध्ये बसून घ्यावा. अन्यथा त्याच तिकीटावर तोच खेळ व्हायचा व भारताऐवजी इंग्लंडच मालिका खिशात घालायचा.
लेखक : -
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक.
इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत.
Email: dattavighave@gmail.com

