shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

कोहलीचा हेकेखोरपणा भारताला भोवला..!


क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ असला तरी या खेळाचा खेळखंडोबा करणारा जर एखाद्या संघाचा म्होरक्या असला तर त्या संघाची वाट लागायला जराही वेळ लागणार नाही. अगदी अशीच गत सध्या इंग्लंड दौऱ्यावर असलेल्या भारतीय संघाची झाली आहे. ज्या भारतीय संघाची नऊ दिवसा पूर्वी जगभर स्तुती केली जात होती. त्याच संघाचा आज फुटबॉल झाला आहे. जगभरातील भारताचे हितचिंतकच कर्णधार कोहलीच्या नावाने लाखोली वाहत आहे.

नॉटिंगहॅमच्या पहिल्या कसोटीत पावसाच्या व्यत्ययामुळे विजय हुकला. तर ऐतिहासिक अशा लॉर्डसवर एक दैदिप्यमान विजय भारताला मिळाला होता. त्यानंतर जगभरातील सर्वच क्रिकेट शौकीकांनी भारतीय संघाला डोक्यावर घेतले. परंतु २५ ऑगष्टला हेडींग्ले स्थित लिडसच्या मैदानावर आज भारतीय फलंदाजीचे वाभाडे निघाले. भारताचा डाव अवघ्या ७८ धावात गारद झाला. शिवाय मागील दोन कसोटयात भारतीय गोलंदाजांपुढे साक्षात लोटांगण घेणारे इंग्लिश सलामीवीर ढाण्या वाघासारखे खेळले व चित्त्यासारखे भासणाऱ्या भारतीय गोलंदाजांना शेळपटासारखे बदडून पहिल्या दिवसअखेर सामना आपल्या कवेत घेतला.

लॉर्डस कसोटीतील विजयानंतर सर्वच क्रिकेट चाहत्यांनी पुढील तीनही कसोट्यांसाठी भारताला फेव्हरीट धरले होते. परंतु त्या पराभवाने भयंकर अपमानीत झालेल्या इंग्लंडने भारतावर सुड उगविण्याची एकही संधी सोडली नाही. त्यात अग्रेसर होता लॉर्डस कसोटीत डिवचला गेलेला जगातील सर्वोत्तम वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन ! जीमीने आज भारतीय फलंदाजीचे कंबरडे मोडताना राहुल, पुजारा व कोहलीला बकरा बनवले तर रोहीतच्या बॅटच्या मुसक्या आवळल्या होत्या. तर बुमराहा व शमीची हिरोगिरी औट घटकेची होती हे सिध्द झाले.

न्यूझिलंडविरुद्धच्या डब्ल्यूटीसी फायनलपासून बॅट व बॉल या दोन्ही क्षेत्रात सातत्याने अपयशी ठरलेल्या रवींद्र जडेजाला पाठीशी घालणारा कर्णधार कोहली या अधोगतीचा खरा सुत्रधार आहे. कर्णधार म्हणून त्याचे अपयश संघाला खाईत ढकलत असून या मालिकेतील आतापर्यंतच्या चार डावात ०, ४३, २२ व ७ अशा एकूण ७२ धावाच त्याच्या बॅटमधून निघाल्या आहे. त्याच्या अतिआक्रमक वागण्याने भारताला लॉर्डस कसोटीत विजय मिळाला खरा परंतु त्या पराभवाने दुखावलेल्या इंग्लिश खेळाडूंनी केलेला पराभव भारताला खुणावू पाहणारा मालिका विजय हिरावला जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

                            कोहली स्वतःही धड फलंदाजी करत नाही तर संघ निवड करतानाही मोठी मनमानी करत आहे. फॉर्मात असलेला आजमितीचा जगातला सर्वोत्तम फिरकी गोलंदाज रविचंद्रन आश्विनला संघाबाहेर बसवले तर जडेजा सारखा सुमार फिरकीपटू संघात खेळत असून तीन कसोट्यात त्याला एकही बळी मिळाला नाही. ईशांत शर्मा या आपल्या दिल्लीच्या मित्राला झुकते माप देताना फॉर्मात असलेला अष्टपैलू खेळाडू शार्दूल ठाकूर संघाबाहेर आहे. तर जोमात असलेला सुर्यकुमार यादव ड्रेसिंग रुममध्ये हात चोळत बसला आहे.
                          
परिस्थिती नुसार संघ निवडण्याची जराही अक्कल इतक्या कसोट्यात नेतृत्व करत असलेल्या कोहलीला अजूनही येऊ नये यासारखे दुर्देव कोणतेच असू नये. भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार असलेल्या कोहलीला इतर खेळाडूंच्या सरस कामगिरीमुळेच हा सन्मान मिळाला आहे. त्याची अशी कोणतीही विशेष कारागिरी त्यामध्ये नाही. 
                         
ऑस्ट्रेलियात  एडिलेड कसोटीत भारता डाव निच्चांकी ३६ धावात गुंडाळला गेला तेंव्हा हेच कोहली महाशय कर्णधार होते तर इंग्लंडविरुद्धची दुसरी निच्चांकी धावसंख्या ७८ या ग्रेट भारतीय कर्णधाराच्याच नेतृत्वात झाली आहे. एकाच वर्षात दोनदा कसोटीत भारताला शंभरीच्या आत बाद होण्यात सहभागी असलेला तो भारताचा एकमेव झुंजार कर्णधार आहे.
                            
भारताचा डाव एकाएकी गुंडाळला जातो व भारताचे गोलंदाज दिवस अखेर एकही बळी मिळवू शकत नाही यामध्ये कोहलीच्या चुकलेल्या रणनितीचाच भाग असून खेळाडूंना योग्य प्रकारे संधी न देणे व चांगल्या प्रकारे न हाताळणे हेच त्याच्या अपयशाचे कारण आहे व राहील. परंतु आलेल्या अनुभवातून शिकेल तो कोहली कसला ? सध्या तरी भारतीय क्रिकेटची धुरा त्याच्या हाती सुरक्षित दिसत नसून पाच वेळा मुंबई इंडियन्सला आयपीएल जिंकून देणाऱ्या रोहीत शर्माचे खांदे भारताची धुरा वाहण्यात मजबूत दिसतात.
लेखक : -  
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक. 
इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत. 
Email:  dattavighave@gmail.com
close