shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पर्यावरण जनजागरण (६९) पिंपरी/पायरी /प्लक्ष (  Focus tsiela )

 

पर्यावरण जनजागरणाच्या दृष्टीने नक्षत्रवनाचा विचार केला असता सिंह राशीचे नक्षत्र उत्तराफाल्गुनीचा आराध्यवृक्ष पिंपरी/ पायरी / प्लक्ष  हा आहे.

पिंपरीचा वृक्ष मोठा असतो. झाड सरळ वाढते. वृक्ष सर्व प्रकारच्या जमिनीत व हवामानात सरासरी पाचशे ते 4 हजार मिलिमीटर पर्जन्यमानाच्या प्रदेशात येतो. नांदुरकीच्या पानापेक्षा मोठी पाने असतात. पिंपरीला उन्हाळ्यामध्ये  वडाच्या झाडासारखी व भरपूर फळे येतात व पक्षांना ही फळे फार आवडतात .पक्षी फळे खाल्ल्यानंतर पक्ष्यांच्या विष्ठेतून या वृक्षाच्या बीजाचा प्रसार होतो व हे झाड  रूजते.अशाप्रकारे एखाद्या दुसऱ्या झाडावर बी पडले तर त्या झाडावर पिंपरीचे झाड वेगाने वाढून मुळच्या झाडाला व्यापून टाकते. पिंपरीच्या खोडाच्या सालीचा रंग पिवळट पांढरा असतो. याला पारंब्या येत नाहीत.  झाडाची सावली गर्द असते. पिंपरीला उन्हाळ्यात फळे येतात. गर्द सावलीमुळे रस्त्याच्या कडेला लावण्यासाठी हे जाड उत्तम आहे. याचा चारा मेंढ्यांसाठी उपयुक्त असतो.

पिंपरीच्या झाडाचे औषधी गुणधर्म : साल व फळे यांचा औषधी वापर होतो. हे गुणाने शीत, तुरट, व्रणनाशक, पित्त, कफ,रक्तदोष नाशक आहे. खवड्यावर पिंपरीचा चीक लावल्यास खवडे बरे होतात. मनाला शांती देणारे हे झाड आहे. सालीच्या गुळण्या केल्यास तोंडाचे विकार नाहीसे होतात. रक्‍तशुद्धीसाठी पिंपरीचा पाला, फळे साल यांचा वापर करतात.

पिंपरीच्या झाडाचे डांब काढून ते जुन, जुलै महिन्यात जमिनीत लावल्यास महिनाभरात त्याला पालवी फुटून नवीन वृक्ष तयार होतो. 
वृक्ष आणि जीवसृष्टी यांचं घनिष्ट नातं  आहे यातून सुधारणावादी मानवाने बोध घेऊन वृक्ष लागवड, वृक्ष संवर्धन आणि त्यातून पर्यावरणाचे रक्षण करणे ही राष्ट्रभक्ती आहे हे समजून आचरण करणे ही काळाची गरज आहे. 

लेखक : चंद्रकांत शहासने, पुणे
संतवांड़मयाचे विज्ञाननिष्ठ निरुपणकार
मोबाईल क्रमांक : ९८८१३७३५८५

कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्ट पुणे यांच्यावतीने पर्यावरण जनजागृती  उपक्रमांतर्गत..
पर्यावरण दिन ५ जून २०२१पासून वन हुतात्मादिन ११ सप्टेंबर २०२१पर्यंत असे ९९ दिवसांचे पर्यावरण जनजागृती अभियान
close