पर्यावरण जनजागरणाच्या दृष्टीने नक्षत्रवनाचा विचार केल्यास कन्या राशीतील हस्तनक्षत्राचा आराध्य वृक्ष जाई हा आहे.
हस्त नक्षत्राचा आकार पंजा सारखा असतो आणि याचे चार चरण कन्या राशीत येतात.
जाई हा वृक्ष/वेल जाती, प्रियवंदा , मालती, चमेली या नावाने ओळखला जातो. जाईचे वेलीसारखे वाढणारे हे एक झुडूप असते आणि ते आधारासाठी मोठ्या झाडांवर चढते. वेल खूप मजबूत असतात. प्रामुख्याने जाईची फुले सुगंधासाठी प्रसिद्ध आहेत. पश्चिमघाटामध्ये जाईचे वेल नैसर्गिकरीत्या वाढलेले दिसून येतात. जाईची फुले पाच पाकळ्यांची पांढऱ्या रंगाची किंवा फिकट गुलाबी, जांभळ्या रंगाची सुगंधी असतात. याचा डेख एक इंचापर्यंत लांब असतो. फुलांमध्ये सॅलीसिटीक ॲसिड असते.
जाईची मुळे, पाने आणि फुले यांचा औषधी वापर केला जातो. दाताच्या हिरड्या घट्ट आणि बळकट होण्यासाठी जाईची पाने चावावीत, त्याच्या गुळण्या केल्यामुळे तोंडाचे रोग बरे होतात. जाईची फुले थंड असतात. डोळ्यावर बांधावी. डोळे शांत होतात. फुलाच्या सुगंधाने मन प्रसन्न होते. फुलांचा वास नियमितपणे घेतल्यास श्वसन मार्ग मोकळा होतो. फुलांचे तेलही निघते. जाईचा वेल गोल गुंडाळी करून पावसाळ्यामध्ये जमिनीमध्ये लावल्यास त्याला पाने फुटतात नि वेळ वाढू लागतो .मात्र हा वेळ वाढवण्यासाठी आधाराची गरज लागते. जाईची फुले वातावरण प्रसन्न करतात.
वृक्ष आणि जीवसृष्टी यांचं घनिष्ट नातं आहे. यातून सुधारणावादी मानवाने बोध घेऊन वृक्ष लागवड, वृक्ष संवर्धन आणि त्यातून पर्यावरणाचे रक्षण करणे ही राष्ट्रभक्ती आहे हे समजून आचरण करणे ही काळाची गरज आहे.
लेखक : चंद्रकांत शहासने, पुणे
संतवांड़मयाचे विज्ञाननिष्ठ निरुपणकार
मोबाईल क्रमांक ९८८१३७३५८५
कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्ट पुणे यांच्यावतीने पर्यावरण जनजागृती उपक्रमांतर्गत
पर्यावरण दिन ५ जून २०२१पासून वन हुतात्मादिन ११ सप्टेंबर २०२१पर्यंत असे ९९ दिवसांचे पर्यावरण जनजागृती अभियान

