shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पर्यावरण जनजागरण (७७)* *सीतेचा अशोक Saraca asoca.


पर्यावरण जनजागरणाच्यादृष्टीने नक्षत्रवनाचा विचार केल्यास वृश्चिक राशीतील अनुराधा नक्षत्राचा आराध्य वृक्ष सीतेचाअशोक हा आहे. समुद्रसपाटीपासून पंधराशे मीटर उंचीपर्यंतच्या रेताड जमिनीवर हा वृक्ष आढळतो. सीतेचा अशोक हा वृक्ष २५ ते ३५ फूट उंच आणि सदाहरित असा असतो. बंगाल, ओरिसा, विशाखापट्टणम, पश्चिम घाटातील सदाहरित आणि निमसदाहरित वनामध्ये सीतेचाअशोक विपूल प्रमाणात आढळतो.

हे झाड दिसायला खूप सुंदर असते त्यामुळे सुशोभीकरणासाठी त्याचा वापर केला जातो. अशोक वृक्ष मधुर, शीत, सुगंधी, शरीराची कांती तजेलदार करणारा आणि त्वचारोग, रक्तरोग नाहीसा करणारा आहे. 
या वृक्षाची पाने आंब्याच्या पानासारखी पाच ते साडेसात सेंटीमीटर लांबीची आणि अडीच ते पावणेचार सें.मी. रुंद अशी असतात. कोवळी पाने लालसर तर पूर्ण वाढ झालेली पाने हिरवीगार असतात.  एका डहाळीला आठ ते बारा पाने असतात.अशोकाची साल काळपट चॉकलेटी आणि लाकूड लालसर चॉकलेटी असते. 

वृक्षाला येणारी फुले गुच्छाने येतात आणि एका फुलात तीन ते नऊ पुंकेसर असतात. ती प्रथम नारंगी असतात आणि नंतर लाल होतात. फुले सुगंधी असतात व जानेवारी ते एप्रिल महिन्यात येतात. अशोकाच्या शेंगा सात ते पंचवीस सेंटीमीटर लांबीच्या साडेचार सें.मी. रुंद असतात. यामध्ये दोन ते आठ चॉकलेटी रंगाच्या बिया असतात. शेंगा ऑगस्टमध्ये सुकतात व झाडावरती तडकून बी बाहेर पडते.

सीतेचाअशोक या वनस्पतीचे औषधी गुणधर्म कफ व पित्तनाशक प्रकारचे आहेत.  याची साल कडू असते.
सालीमध्ये मेटॉब्सिलिन, लोह हे द्रव्य भरपूर प्रमाणात असते.गर्भाशयाच्या समस्यांवर गर्भाशय शैथिल्य, वेदना, तांबडे, पांढरेस्त्राव या आजारांवर अशोकारिष्ट हे औषध अत्यंत उपयुक्त असे आहे.
वृक्ष आणि जीवसृष्टी यांचं घनिष्ट नातं  आहे. यातून सुधारणावादी मानवाने बोध घेऊन वृक्ष लागवड, वृक्ष संवर्धन आणि त्यातून पर्यावरणाचे रक्षण करणे ही राष्ट्रभक्ती आहे हे समजून आचरण करणे ही काळाची गरज आहे. 

लेखक : चंद्रकांत शहासने, पुणे
संतवांड़मयाचे विज्ञाननिष्ठनिरुपणकार
मोबाईल क्रमांक : ९८८१३७३५८५

*कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्ट पुणे यांच्यावतीने पर्यावरण जनजागृती  उपक्रमांतर्गत..!
*पर्यावरण दिन ५ जून २०२१पासून वन हुतात्मादिन ११ सप्टेंबर २०२१पर्यंत असे ९९ दिवसांचे पर्यावरण जनजागृती अभियान.
close