पर्यावरण जनजागरणाच्या दृष्टीने नक्षत्रवनाचा विचार केल्यास धनु राशीच्या उत्तराषाढा नक्षत्राचा पर्यायी वृक्ष कांचन हा आहे. हा वृक्ष महाराष्ट्रात सर्वत्र आढळतो. समुद्रसपाटीपासून पंधराशे मीटर उंचीपर्यंत मिश्र व कोरड्यावनांमध्ये तसेच ५०० ते २५००० मिलिमीटर पर्जन्यमानाच्या क्षेत्रात पोयट्याची जमीन, शेताचा बांध उत्तम निचरा होणाऱ्या जमिनीत हा वृक्ष येतो. या झाडाची पाने शिरा असलेली पातळ आणि दोन पानांमध्ये खाच अशा स्वरूपात गोलाकार असतात. याला जांभळ्या रंगाची मंद गंधाची फुले फेब्रुवारी ते एप्रिल या काळात येतात . जेव्हा फुले येतात तेव्हा झाडाला पाने नसतात.
फुलाच्या पाकळ्या दोन ते अडीच इंच लांबीच्या असतात.कांचनला पंधरा ते पंचवीस सेंटीमीटर लांबीच्या व वाळल्यावर तडकणाऱ्या अशा शेंगा येतात व त्यात दहा ते पंधरा गोल चपट्या चॉकलेटी रंगाच्या बिया असतात. या वृक्षाला डिंक येतो. पानांचा वापर विड्या वळण्यासाठी करतात. फुलांचा गुलकंद करतात तर सालीपासून दोर बनवतात. कांचनच्या वाळलेल्या कळ्या मुळव्याधीवर उपयुक्त आहेत. बियांपासून तेलही मिळते ते कफ व पित्त विकारात उपयोगी असते. सालीच्या काढ्याने जखमा धुतात. तसेच सालीचा काढा खोकला, तोंड येणे, त्वचा विकार, मेदवृद्धी कमी करण्यासाठी उपयुक्त आहे. ज्यांना हाडाचे रोग आहेत त्यांनी भाताची पेज, कांचन साल व आले टाकून त्याचा काढा करून द्यावा.
पशुखाद्य म्हणून कांचनचा पाला उत्तम आहे. कोवळ्या पानांपेक्षा पूर्ण वाढलेल्या पानांमध्ये प्रथिने व चोथा जास्त असतो. हिवाळ्यामध्ये पिकलेली पाने जना,वरांना द्यावी तसेच कांचनाचे झाड दर दोन वर्षांनी एकदाच एकतृतियांश इतके छाटावे यामुळे चांगला फुटवा होतो.
वृक्ष आणि जीवसृष्टी यांचं घनिष्ट नातं आहे यातून सुधारणावादी मानवाने बोध घेऊन वृक्ष लागवड, वृक्ष संवर्धन आणि त्यातून पर्यावरणाचे रक्षण करणे ही राष्ट्रभक्ती आहे हे समजून आचरण करणे ही काळाची गरज आहे.
लेखक : चंद्रकांत शहासने, पुणे
संतवांड़मयाचे विज्ञाननिष्ठनिरुपणकार
मोबाईल क्रमांक : ९८८१३७३५८५
*कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्ट पुणे यांच्यावतीने पर्यावरण जनजागृती उपक्रमांतर्गत..
*पर्यावरण दिन ५ जून २०२१पासून वन हुतात्मादिन ११ सप्टेंबर २०२१पर्यंत असे ९९ दिवसांचे पर्यावरण जनजागृती अभियान

