shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

ओव्हल कसोटीच्या तिसऱ्या दिवसअखेर झाकली मुठ सव्वा लाखाची !



                      कसोटी क्रिकेट हे सर्वात जुने व पारंपारीक क्रिकेट आहे. १४४ वर्षांचा इतिहास असलेल्या कसोटी क्रिकेटमध्ये अनेक अविस्मरणीय व चमत्कारीक प्रसंग घडले आहेत. तसेच अजूनही थांबले नाहीत. भारत व इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांची मालिका आता अंतिम टप्प्यात आली असून १- १ बरोबरीत आहे. तरी हा लेख लिहीला जाईपर्यंत चौथ्या कसोटीचा तिसऱ्या दिवसाचा खेळ अंधुक प्रकाशामुळे थांबला तेंव्हा कोणताही संघ शंभर टक्के वरचढ नव्हता. तेंव्हा मराठीतील एक सुप्रसिद्ध म्हण आठवली व ती येथे चपखल बसलीही ! ओव्हल कसोटीच्या तिसऱ्या दिवसअखेर झाकली मुठ सव्वा लाखाची !

                       
हेडींग्लची तिसरी कसोटी जिंकून इंग्लंडचा संघ भक्कम मानसिकतेने ओव्हल कसोटीत उतरला. शार्दूल ठाकूरच्या वादळी खेळीनंतरही इंग्लिश गोलंदाजांनी भारताला १९१ धावात गुंडाळले व प्रत्युत्तरात ९९ धावांचा पुढावा मिळविला. सामन्याच्या दुसऱ्याच दिवशी भारताला दुसरा डाव सुरू करावा लागला. परंतु सलामीवीर रोहीत शर्मा व लोकेश राहुलने पराभूत मानसिकता बाजूला ठेवून सकारात्मक खेळ करत दिवस अखेर नाबाद परतले.
                       
कसोटी सामन्याचा तिसरा दिवस हा त्या सामन्याचा निर्णायक दिवस असतो. या दिवसाच्या खेळाच्या आधारे सामन्याचा निकाल काय लागणार हे स्पष्ट व्हायला लागतं. इंग्लंडमधील सर्वात जुने कसोटी केंद्र असलेल्या ओव्हलच्या खेळपट्टीचं वैशिष्टये म्हणजे येथील खेळपट्टी दिवसागणिक फलंदाजांना धार्जिणी होत जाते. सामन्याच्या पहिल्या दिवशी तेरा बळी पडले. दुसऱ्या दिवशी ७ जण बाद झाले. तर तिसऱ्या दिवसात मोठया मेहनतीनंतर इंग्लिश गोलंदाज केवळ तीन भारतीय फलंदाज बाद करू शकले. तेही राहुल ४६, रोहीत १२७ व पुजारा ६१ हे चांगले खेळल्यानंतर. शिवाय कर्णधार कोहली २२ व रवींद्र जडेजा ९ धावांवर दिवसअखेर नाबाद होते. यावरून खेळपट्टीने आपले रंग कसे बदलले हे लक्षात येते.
                       
तिसऱ्या दिवसाची सुरुवात रोहीत व राहुलने आश्वासकरित्या करून धावफलक हलता ठेवला. ८३ धावांची सलामी दिल्यावर राहुल या मालिकेत बाद झालेल्या भारताच्या इतर फलंदाजांप्रमाणेच अँडरसनच्या गोलंदाजीवर यष्टीरक्षकाकडे झेल देऊन परतला. मात्र त्याचा जोडीदार रोहीत शर्माने सर्व टिकाकारांची बत्तीशी त्यांच्याच घशात घालताना खणखणीत शतक ठोकले व जगाच्या पाठीवर कुठेही चांगल्या प्रकारे खेळू शकतो हे प्रात्यक्षिकासह सिद्ध करून दाखविले. त्याच्या आठपैकी हे पहिलं परदेशातील शतक ठरलं. तसेच षटकार मारून साजरे केलेले हे त्याचे तिसरे शतक ठरले.
                      
चेतेश्वर पुजारानेही आपला पूर्वीचा चेंडूला बोथट करण्याचा खेळ बाजूला ठेऊन आक्रमकपणा धारण केला होता. त्याने तर टि२० त खेळतात तसे जोरदार फटकेही लगावले. एक वेळ तर आक्रमक खेळण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या रोहीत शर्मालाही त्याने झाकोळून टाकले होते. परंतु इंग्लंडने घेतलेल्या दुसऱ्या नवीन चेंडूवर पहिला चेंडू ओळखण्यात रोहीत चुकला व वोक्सच्या हाती झेल देऊन परतला. तर त्याच षटकात शेवटच्या चेंडूवर पुजाराही चकला व मोईनकडे झेल देऊन बाद झाला. रोहीतला द्विशतक तर पुजाराला शतक खुणावत होते. परंतु रॉबिन्सनने दोघांचेही स्वप्न भंगवले.
                         
अपुऱ्या प्रकाशामुळे १४ षटकांचा खेळ बाकी होता. त्या राहीलेल्या षटकात कोहली -जडेलाला धावा वाढविण्याची मोठी संधी होती. कारण आज इंग्लिश गोलंदाजांना मोठया प्रमाणात घाम गाळावा लागला व बळीही तीनच मिळाल्याने ते शारिरीक व मानसिक दृष्टया थकलेले होते. परंतु नियतीच्या मनात वेगळेच होते.आता चौथ्या दिवशी इंग्रज खेळाडू ताजेतवाने होऊन येतील तेंव्हा खेळपट्टी पहिल्या सत्रात जलदगती गोलंदाजांना सहाय्य करू शकेल. तसेच त्यांनी घेतलेला दुसऱ्या नवीन चेंडूवर केवळ दहा षटकांचाच खेळ झाल्याने इंग्लिश गोलंदाज या दुग्धशर्करा योगाचा फायदा उठवू शकतात.

                          
 पहिल्या डावात इंग्लंडने मिळविलेली ९९ धावांची आघाडी वगळता भारत १७१ धावांनी पुढे असून भारताचे ७ खेळाडू शाबूत आहे. पण भारतीय खेळाडूंचा या दौऱ्यातील मागील लौकीक बघता इंग्लिश गोलंदाज त्यांच्यावर मात करण्याची शक्यताही डावलता येत नाही. त्यामुळे हा सामनाच नव्हे तर मालिका सुध्दा अजूनही दोन्ही संघांसाठी खुली आहे. म्हणूनच पुन्हा एका म्हणावेसे वाटते. ओव्हल कसोटीच्या तिसऱ्या दिवसअखेर झाकली मुठ सव्वा लाखाची !

लेखक : -  
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक. 
इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत. 
Email:  dattavighave@gmail.com
close