आरसीबीची विजयी मालिका सुरू ;कोहलीच्या अडचणी वाढणार ?
बुधवारी रात्री दुबई इंटरनॅशनल स्टेडीयमवर दोन रॉयल संघात सामना झाला. परंतु नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करणाऱ्या राजस्थान रॉयल्स संघाला जोरदार सुरूवातीनंतरही यशस्वी जयस्वाल व एर्विन लुईसच्या धडाकेबाज खेळानंतरही दिडशेचा आकडाही पार न करता आल्याने रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरला राजस्थान रॉयल्सवर एक रॉयल विजय मिळविता आला.
दहा षटकात ९१ व नंतरच्या दहा षटकात ५८ धावा अशी दोलायमान फलंदाजी केलेल्या राजस्थानला या पराभवाने आपले प्ले ऑफ मधील स्थान मिळविण्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत, तर युएईत सलग दुसरा विजय मिळविणाऱ्या आरसीबीचे ११ सामन्यात ७ विजयांसह १४ गुण झाले असून गुणतालिकेतील त्यांच्या आसनावर त्याचा कुठलाच परिणाम न झाल्याने त्यांचा तिसरा क्रमांक अबाधीत आहे. मात्र हा पराभव राजस्थानला सहाव्या स्थानावरून सातव्या क्रमांकावर घेऊन गेला आहे.
सामन्याच्या सुरुवातीला राजस्थाने सलामीवीर एर्विन लुईस व यशस्वी जयस्वाल यांचा हल्ला इतका भिषण होता की, त्यांच्या घणाघाती हल्ल्यात पाच चेंडू हरविले. तर आरसीबीचा कर्णधार विराट कोहलीला त्याच प्रमुख फिरकी गोलंदाज यजुवेंद्र चहल व शाहबाज अहमद यांना ही जोडी तंबूत परते पर्यंत गोलंदाजी देण्याचे धारिष्ट्रय झाले नाही. परंतु शाहबाजने एकाच षटकात दोन बळी मिळवून सामन्याचे पारडे फिरविले तर चहलने चतुराईभरी गोलंदाजी करताना राजस्थानच्या फलंदाजांच्या नाडया आवळल्या आणि शेवटी हर्षल पटेलने एकाच षटकात तीन बळी मिळविले खरे मात्र या सत्रातील सलग दुसरी हॅट्रीक घेण्याची त्याची संधी या वेळेस हुकली. सध्या सर्वाधिक बळींची पर्पल कॅप हर्षलच्याच शिरावर विराजमान आहे.
प्रत्युत्तरात ग्लेन मॅक्सवेलच्या ३० चेंडूतील अर्धशतकी खेळीमुळे आरसीबीला झटपट विजय मिळवून आपली धावगतीही सरस करता आली. प्ले ऑफमध्ये पोहोचण्याची आरसीबीची आशा उज्वल दिसत असली व कर्णधार कोहलीची फलंदाजीही बऱ्यापैकी होत असली तरी भारतीय संघाचा कर्णधार म्हणून त्याने सहकारी खेळाडूंशी केलेल्या गैरवर्तनाची दखल बीसीसीआयने घेतल्याच्या बातम्या सध्या सर्वच प्रसार व सोशल माध्यमांवर झळकत असून बीसीसीआय कडक पावले उचलणार असल्याचे संकेत मिळू लागले आहेत.
इंग्लंड दौऱ्यावर भारताचा संघ असताना संघातील खेळाडूंशी कोहलीचे मतभेद झाल्याचे आपल्या वाचनात आले होतेच, परंतु नेमके कोणत्या खेळाडूंशी व कधी याचा तपशील सामान्य रसिकांपर्यंत पोहोचला नव्हता. परंतु संघातील वरिष्ठ खेळाडू उपकर्णधार अजिंक्य राहाणे, चेतेश्वर पुजारा व रवीचंद्रन आश्विन यांनी बीसीसीआयच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना भेटून कोहलीच्या गैरवर्तनाचा संपूर्ण अहवालच सादर केला आहे.
इंग्लंड दौऱ्यात भारतीय संघाच्या ड्रेसिंग रूमधील वातावरण आल्हाददायक नव्हते. खेळाडूंमध्ये मतभेद मोठया प्रमाणावर वाढले होते. ते सर्व खराब वातावरण पूर्व पदावर आणण्यासाठी बीसीसीआयला आगामी टि२० वर्ल्ड कपसाठी माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला खास मेंटॉर म्हणून नेमण्याची वेळ आली. जेणे करून विश्वचषक जिंकण्याच्या मोहिमेदरम्यान खेळाडू व कर्णधार यांच्यात कुठलेही वादविवाद होऊ नये.
या वादाला सुरूवात झाली ती वर्ल्ड टेस्ट चॅॅंपियनशिपच्या न्युझिलंडविरूद्धच्या अंतिम सामन्यातील पराभवा नंतर कोहलीने राहाणे, पुजारा, आश्विन व इतर खेळाडूंविषयी बीसीसीआयकडे तक्रार केली. त्यानंतर राहाणेने बीसीसीआयचे सचिव जयेश शहा यांच्याकडे कोहलीच्या वर्तनाविषयी तक्रार नोंदवून आपले मन मोकळे केले होते.
नेमका याच कालावधीत कोहलीची फलंदाजीही फेल जात असल्यामुळे तो स्वतःचे अपयश बाजूला ठेवून इतर खेळाडूंच्या चुकाच चव्हाट्यावर आणायचा. हे बाकीच्या खेळाडूंना आवडत नव्हते. त्या खेळाडूंचे म्हणणे होते की, कोहलीचा खराब फॉर्मच त्याच्या चुकीच्या निर्णयांचे कारण होते. चा दरम्यान बोर्डाने अनेक प्रयत्न करूनही म्हणावे इतके यश मिळाले नाही.
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत कोहलीने संघाचा प्रमुख फिरकी गोलंदाज रवीचंद्रन आश्विनला एकाही कसोटीत न खेळवून आग विझविण्याऐवजी शिलगवण्याचेच काम केले. मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री हे देखील आश्विनला खेळविण्याच्या मुडमध्ये असताना कोहलीने त्याच्या ऐवजी त्या मालिकेत सातत्याने अपयशी ठरलेल्या रवींद्र जडेजाला संधी दिल्याने प्रकरण आणखीच बिकट झाले.
अखेर बीसीसीआयने कोहलीला सफेद चेंडूच्या खेळाच्या नेतृत्वातून मुक्त करण्याचा निर्णय घेतला. परंतु कोहलीने यावर कडी करत बीसीसीआयचा निर्णय यायच्या आतच आगामी टि२० वर्ल्ड कप नंतर टि२० च्या संघाचे नेतृत्व सोडण्याचा निर्णय घेतला. मात्र यानंतरही बीसीसीआय त्याला वनडे संघाच्या कर्णधार पदातूनही मुक्त करू शकते.
लेखक : -
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक.
इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत.
Email: dattavighave@gmail.com

