( पुस्तक परीक्षण - प्रा . पंढरी बनसोडे , कवी / लेखक / साहित्यिक , मो :- ८३९ ०३६३२६५ )
नुकताच नवनाथ रणखांबे यांचा " जीवन संघर्ष " हा कविता संग्रह वाचण्यात आला खूप छान शब्दांकन , रेखाटन मानवी समाजाचे चित्रण करणारा दलित , वंचित समाजातल्या लोकांचे दुःख मांडणारा कवी नवनाथ रणखांबे यांनी अत्यंत गरिबीतून , अथक परिश्रमातून समाजातल्या लोकांचे प्रश्न मांडत आयुष्य जगले आहे . " जीवन संघर्ष " दलित चळवळीला उर्जा देणारा खूप संवेदनशील असा कवितासंग्रह पहिलाच जरी असला तरी विविध साहित्यसंमेलनातून त्यांची ' कविता ' गावा- गावात पोहचली आहे. माणसाला जीवनात संघर्षा शिवाय काही प्राप्त होत नाही . जगण्याचा , पोटाचा , भूकेचा प्रश्न महत्त्वाचा कवीला वाटत राहतो . या काव्यसंग्रहातील खूप कविता प्रेरणा देणाऱ्या असून नवकवींसाठी मार्गदर्शक ठरतील यात शंका नाही .
१ ) ' माय तुला मी पाहिलंय ........
या कवितेत ग्रामीण जीवन दिसून येते कवी आपल्या मायेला म्हणतो की ,
गरिबीलाच लाज वाटली गरिबीची
जीवनाला उपासमारी होती जगण्याची
सोबतीला हिंमत रित्या हातांची ....
................... माझ्या स्मृतीने
त्या हिंमतीला माय त्याला मी पाहिलंय
त्याला मी पाहिलंय ......
त्याला मी पाहिलंय ........
२ ) ' माजेऱ्या पाऊस .......
या कवितेत कवी पाऊसाची ' दशा ' आणि ' दिशा ' स्पष्ट करतो . खूप पडतोस कधी ओला कधी सुखा दुष्काळ नशिबाला येतो . बळीराजांची वेदना प्रकटते
कवी म्हणतो ----
जिथे गरज, तिथे नाहीस,
जिथे नको, तिथे आहेस ,
तुझी हानी, सहन होत नाय ,
सोसल्या शिवाय, पर्याय नाय ,
३ ) ' बा नं शिकवलं '
' बा ' माझा ओरडला
लेका आजपासून तुझी
शिक्षण हिच ' आई '
करियर हाच ' बा '
मुंबई हिच ' पांढरी '
परत आला माघारी
तर तंगडं तोडीन .........
वरील कवितेत शिक्षणातूनच खरा विकास होतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शिका , संघटित व्हा आणि संघर्ष करा हा मूलमंत्र दिला होता . हे अधोरेखित करणारी भावस्पर्शी कविता आहे .
४ ) ' भटकंती पोटाची अधोगती देशाची .....
या कवितेत वंचित , शोषित समाजाची दयनीय परिस्थितीवर पुढीलप्रमाणे कवी प्रकाश टाकते .....
अजूनही आहे बाजारबुणग्यांची....
सामाजिक भटकंती पोटाची ,
पिढया न् पिढया वंचना त्यागाची .....
पोटाच्या जीवन संघर्षाची ,
नाही शिक्षण , नाही रोजगार
स्वातंत्र्य मिळता सात दशक
अजूनही आहे वंचित ........
५ ) " जीवन संघर्ष " या कवितेत जीवन जगताना येणारा संघर्ष त्यातून लढण्याचे बळ महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरच आपले उर्जा स्थान आहेत .
कवी म्हणतो,
जीवन संघर्ष .....
वेदनांचे हुंकार ....
वेदनांचे आक्रोश ......
कवितेने कागदावर .....
आता उमटवायचा .......
६ ) ' माणूस पण विसरला .....
या कवितेत माणसं खूप शिकली , मोठी झाली परंतू
माणूस पण पुरती विसरत चालली यांवर कविता ' मार्मिक भाष्य ' करते .....
कवी म्हणतो,
माणसा तू माणसातला
माणूस पण विसरला ||
भगवा , हिरवा
निळा , पिवळा
धर्म जात पंथ वाटला |
७ ) ' डॉ . आंबेडकर .....
या कवितेत महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जीवन प्रवास अत्यंत क्लेशदायी जातियतेचे चटके
बसून त्यांना खूप कठोर र्निभीड प्रज्ञावंत बनवितो .....
कवी म्हणतो ,
बाबा या दुनियेचा स्वाभिमान
जागृत केलात .......
पिढया न् पिढयाचं शापित जीणं
लाथाडलत .........
शिका ! संघटित व्हा !! संघर्ष करा !!!
संन्मार्ग दिलात ......
८ ) ' बापाचं नाव लावायचं टाळलंस '
या कवितेत खूपच ' भावस्पर्शी संवाद '
आपणास अनुभवांस मिळतात.
कवी म्हणतो ,
तुझ्या काळजाने काळजातच काळजाला
मज तू जाळलस आपल्या पोराला बापाच
नाव लावायचं टाळलस .......
नाव देईन माझे त्याला
मोठा करिन मी त्याला
जमले तर उमजून घे
धुरा तुझी समजून घे .
असा संवेदनशील कवी नवनाथ रणखांबे यांच्या पुढील साहित्यिक वाटचालीस खूप शुभेच्छा !
पुस्तक -: जीवन संघर्ष
कवी -: नवनाथ रणखांबे
प्रकाशन -: शारदा प्रकाशन ठाणे
स्वागत मूल्य -: ८० ₹
प्रास्ताविक -: प्रा. डॉ. शहाजी कांबळे
शब्दांकन - : प्रा . पंढरी बनसोडे ,
लातूर. कवी / लेखक /साहित्यिक

