shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पाचव्या दिवशी नेमके कोण जिंकणार ?


                       
भारत व इंग्लंड यांच्यातील चौथी कसोटी पाचव्या दिवसापर्यंत जाईल असं पहिल्या दिवसाचा भारताचा खेळ पाहिल्या नंतर कोणालाही वाटलं नसेल. परंतु प्रत्यक्ष पाचव्या दिवसाच्या सुरुवातीला भारताचा संघ विजयासाठी बेस्ट फेव्हरीट मानला जात आहे. क्रिकेट त्याच्या ऐतिहासिक अनिश्चितेमुळे लोकप्रिय आहेच, परंतु या सामन्याच्या प्रत्येक दिवशी खेळाने आपले विविध रंग उधळून कधी प्रेक्षकांच्या काळजाचे ठोके चुकवले तर कधी मंत्रमुग्धही केले !
  

                      
या सामन्याच्या तिसऱ्या दिवसअखेर भारताने आपली परिस्थिती नियंत्रणात आणली होती. मात्र चौथ्या दिवसाच्या भल्या सकाळीच संघाला मोठा झटका बसला. भारताचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री शिक्षक दिनाच्या दिवशीच कोरोना बाधीत असल्याचे सिध्द झाले व त्यांच्या सोबत सातत्याने असणारे गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरूण, क्षेत्ररक्षण प्रशिक्षक एस. श्रीधरन व फिजिओ डॉ. नितिन पटेल यांना सुरक्षेचा उपाय म्हणून आयसोलेट करण्यात आले.
                         
चौथ्या दिवसाच्या खेळाची सुरुवात भारतासाठी निराशजनकच झाली. या कसोटीत अजिंक्य राहाणेऐवजी पाचव्या क्रमांकावर संधी मिळालेला रवींद्र जडेजा फलंदाजीत प्रमोशन मिळाल्याचा फायदा उठवू शकला नाही. त्याने या सामन्यात केलेल्या १० व १७ धावा त्याच्या यशस्वीतेचे प्रमाण सिध्द करतात. तर फलंदाजांसाठी पोषक बनलेल्या खेळपट्टीवर कर्णधार कोहली शतकांचा दुष्काळ संपविल असे वाटत असताना या मालिकेतील त्याच्या नित्यनियमाप्रमाणे स्टंप्सच्या मागे झेल देऊन परतला. या मालिकेत प्रत्येक वेळी तो त्याच त्याच पध्दतीने बाद होत असल्याने संघाची चिंता वाढत आहे.
                            
ओव्हलच्या खेळपट्टीवर सर्वच फलंदाज हात धुवून घेत असताना उपकर्णधार अजिंक्य राहाणेचे शुन्यावर बाद होणे अतिशय दुःख देणारा क्षण होता. पहिल्या डावातही तो केवळ १४ धावाच काढू शकला होता. त्याच्या ऐवजी जडेजाला पाचव्या क्रमाकांवर पाठविणे राहाणेला वाईट वाटले आहे. हे त्याच्या खेळावरून स्पष्ट जाणवत होते. राहाणेसारख्या वरिष्ठ खेळाडूची संघात हेळसांड होत आहे हे मात्र नक्की ! 
                             
आपली अवघी चौथी कसोटी खेळत असलेला गोलंदाज शार्दूल ठाकूर फलंदाजीतही कमाल करत असल्याने दोन्ही डावात भारताच्या डावाला आकार मिळाला. पहिल्या डावात त्याच्या झुंजार ५७ धावांमुळेच तर भारताचे आव्हान अजूनही जिवंत आहे. हीच धावांची झडी त्याने दुसऱ्या डावातही कायम ठेवत ६० धावांची महत्वपूर्ण खेळी केली. शिवाय पहिल्या डावात इंग्लंडचा टॉप स्कोअरर ओली पोपचा बळीही त्यानेच मिळविला होता. शार्दूलला या कसोटीतील पहिल्या डावातील वादळी खेळामुळे समर्थकांकडून " लॉर्ड " ही उपाधी मिळाली असून त्याच्या पुढील कारकिर्दीला फुलवण्यास ती बुस्टरचे काम करेल.
                               
वाहत्या गंगेत हात धुवून घेणार नाही तो वारकरी कसला ? रिषभ पंतनेही आपल्या बॅटचा दाखविला हिसका. त्याची ५० धावांची खेळी संघाला मजबूती देण्यास उपयोगी ठरली. तर शेपटातील उमेश यादव व जसप्रित बुमराहाच्या २५-२५ धावा संघासाठी लाभदायक ठरल्या. या डावात भारताच्या ४ वेगवान गोलंदाजांनी ११२ धावांची रास भारताच्या धावांत ओतली हे देखील विशेषच म्हणावे लागेल.
                                
३६८ धावांचे मोठे लक्ष घेऊन उतरलेला इंग्लिश संघ कुठल्याही दबावात दिसला नसून दिवसअखेर त्यांचे सलामीवीर शाबूत होते. ७७ धावांची आश्वासक सुरूवात शेवटच्या दिवशी त्यांना विजयाकडे नेण्यास मदत करू शकते.
                               
ओव्हलचे मैदान फलंदाजांसाठी नंदनवन ठरत असताना भारताच्या गोलंदाजांना आज बळी मिळविण्यास खडतर प्रयत्न करावे लागणार असून खेळपट्टी करून फिरकी गोलंदाजांना काहीसा लाभ मिळत असून रवींद्र जडेजा एकटाच फिरकी गोलंदाज भारताकडे असल्याने त्याच्यावर ताण पडू शकतो. रवीचंद्रन आश्विनला संघातून डावलणे किती योग्य होते हे सामन्याच्या निकालानंतर स्पष्ट होणार आहे.
                               
सामना अंतिम टप्प्यात असल्याने विजयाचे पारडे नेमके कोणाकडे झुकेल हे स्पष्टपणे कोणीही सांगू शकत नव्हते. मात्र कसोटी क्रिकेटच्या याच गुणामुळे कसोटीचे मानाचे स्थान अजूनही अबाधीत आहे.

         लेखक : -  
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक. 
इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत. 
Email:  dattavighave@gmail.com
close