पर्यावरण जनजागरण (१०४) औषधी वृक्ष : आवळा..!!
हा वृक्ष मराठीत आवळा, हिंदीमध्ये आमला, संस्कृतमध्ये अमलकी, धात्री व इंग्रजीत Embelic myrobalan या नावाने ओळखला जातो.
आवळ्याची मुळे, साल, पाने, फळे व बिया यांचा वापर औषधांमध्ये केला जातो. आपण नित्यनेमाने त्रिफळा चूर्ण तसेच च्यवनप्राश, आवळकाठी खातो. यामध्ये आवळा हा मुख्य घटक असतो. शरीराची जळजळ, दाह होणे, ओकारी येणे, शौचास साफ न होणे, हृदय रोग, पांडुरोग, मूत्रदाह, शरीरातील घामाचे प्रमाण कमी होणे, रक्तशुद्धी करणे, केसांचे विकार, त्वचा सतेज बनविणे अशा विविध प्रकारांमध्ये आवळ्याचा वापर फायदेशीर ठरतो. आवळा पित्तनाशक आहे व बुद्धिवर्धक आहे. आवळ्याच्या सालीचा रस हळद व मधासोबत घेणे परम्यामध्ये लाभदायक ठरते.
कायाकल्प करण्यासाठी आवळा उपयुक्त आहे. आवळा कितीही उकळवला तरी त्यातील जीवनसत्वे नष्ट होत नाहीत. आवळ्याच्या झाडावर वीज पडत नाही त्यामुळे घरोघरी आवळा वृक्ष लावणे खूपच लाभदायक ठरते. आवळ्याचे परागीभवन मधमाशांद्वारे होते त्यामुळे अन्य वृक्षांच्या फलधारणा प्रक्रियेत आवळ्याच्या वृक्षाचे महत्व आहे. आवळा वनस्पती अत्यंतिक उपयोगाची असून त्याची ओळख करून घेतल्यास मानवाचे आरोग्य आणि निसर्गाचे पर्यावरण रक्षण सहज शक्य आहे. यासाठी आरोग्य/पर्यावरण साक्षरता मोहिमेत आपला सहभाग नोंदवा व आपल्या मित्रांना पर्यावरण साक्षरतेचा संदेश पोहोचवा.
*कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्ट पुणे यांच्या विद्यमाने पर्यावरण जनजागरण मोहिमेंतर्गत प्रसारित. लेखक : चंद्रकांत शहासने, निसर्गोपचारक. पुणे.
मोबाईल क्रमांक : ९८८१३७३५८५

