shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

कोणी काही म्हणो पण आगामी टि-२० विश्वचषक स्पर्धा कोहलीच्या नेतृत्वाची सत्वपरिक्षा घेणार ?


                       सध्या जागतिक क्रिकेटमध्ये धमाक्यावर धमाके फुटत असताना भारतीय क्रिकेटमध्ये मोठा बाँबस्फोट एका अग्रणी इंग्रजी वृत्तपत्राने केला. भारताचा विद्यमान कर्णधार विराट कोहली आगामी टि २० विश्वचषक स्पर्धेनंतर सफेद चेंडूच्या खेळाचे नेतृत्व त्याग करणार असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले आणि जागतिक क्रिकेटमध्ये एकच हाहाकार उडाला.

                     कोहली भारताचे वनडे, टि-२० व कसोटी या तिनही प्रारूपात नेतृत्व करत असून कसोटीत त्याच्या नेतृत्वात भारताची कामगिरी  समाधानकारक असून टि-२० व एकदिवसीय सामन्यात भारत आयसीसी रँकीगमध्ये काहीसा पिछाडीवर आहे. कोहली सन २०१४ पासून भारताच्या कसोटी तर सन २०१६ च्या उत्तरार्धात वनडे व टि २० चेही नेतृत्व करू लागला. त्याच्या नेतृत्व काळात सन २०१७ ची चँपीयन्स ट्रॉफी, सन २०१९ चा एक दिवसीय सामन्यांचा विश्वचषक, सन २०२१ मध्ये कसोटी विश्वकप खेळला गेला. आयसीसीच्या या मानाच्या स्पर्धेत भारत विजेतेपदाचा प्रबळ दावेदार असताना देखील करंडक पटकविण्यात अपयशी ठरला असल्याने कोहलीच्या नेतृत्व क्षमतेवर शंका घेतली जाऊ लागली.
                     कर्णधार कोहलीची संघ निवडीत नेहमी होणारी गफलत संघाच्या अपयशाचे प्रमुख कारण ठरली असून खेळपट्टी व वातावरण यांचा कुठलाही अंदाज न घेता त्याच्या मर्जीनुसार संघ निवड करण्याची त्याची मनमानी वृत्ती, वरिष्ठ खेळाडूंचा त्याच्याकडून कायम केला जाणारा अनादर त्याच्याच नेतृत्वाच्या आलेखाला खाली खेचण्यात अग्रणी ठरल्याने टिकाकारांच्याच नव्हे तर स्वतःच्या समर्थकांच्या नजरेतूनही त्याची किंमत काहीशी कमी झाल्या सारखी वाटते.
                       आयसीसी स्पर्धातील सततच्या अपयशामुळे कमीत कमी सफेद चेंडूच्या खेळातून त्याने पायउतार व्हावे अशी हाक क्रिकेट जगतातून घातली जात असताना अचानक एका अग्रणी इंग्रजी वृत्तपत्रातील बातमीने संपूर्ण क्रिकेट जगतात चर्चेला उधाण आले होते. मात्र या बातमीला कोणताही आधार नसल्याचे बीसीसीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लागलीच जाहीर केल्याने अफवांवर  पूर्णविराम लागला.
                        पण गेल्या दोन वर्षातील कोहलीच्या फलंदाजीचा आलेख बघितला तर तो दिवसेंदिवस खालावत जात असल्याचा दिसत असून त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये शेवटचं शतक करायलाही त्याला दोन वर्ष होत आले आहेत. शिवाय त्याचे शुन्यावर बाद होण्याचे प्रमाण या दोन वर्षातच वाढले आहे. इतकेच नाही तर आयसीसीच्या मानांकनात अनभिषिक्त सम्राट असलेला कोहली एक एक पायरी खाली सरकत असून आता तो चक्क सहाव्या क्रमांकावर घसरला आहे. तर त्याचा सहकारी रोहीत शर्मा दोन वर्षापूर्वी भारताच्या कसोटी संघाच्या आसपासही नव्हता. तोच रोहीत शर्मा आजमितीला आयसीसी कसोटी मानांकनात कोहलीच्या वर म्हणजे पाचव्या स्थानी पोहोचला आहे. त्याचबरोबर कोहलीच्या फलंदाजीतील कच्च्या दुव्यांचा विरोधी संघांनी बारकाईने अभ्यास केला असून त्याचे सध्या लवकर बाद होण्याचे ते एक प्रतिकच आहे.
                           क्रिकेटच्या तिनही प्रारूपात कर्णधारपद भूषविताना त्याच्या फलंदाजीवर मोठया प्रमाणात लोड येत आहे. परंतु कर्णधार पदापोटी मिळणारा पैसा, मान सन्मान व अधिकार यांचा मोह त्याला आवरता येत नाही. हेही त्याच्या अपयशामागचे एक प्रमुख कारण आहे.
                          इतकेच नाही तर वनडे व टि २० सामन्यात विराटच्या तुलनेत रोहीतच्या नेतृत्वाची टक्केवारी बघितली तर रोहीत शर्मा कितीतर पट त्याच्या पेक्षा वरचढ सिद्ध होतो. शिवाय आयपीएल मध्ये विराटने रोहित पेक्षा जास्त नेतृत्व केले असून त्याला एकदाही विजेतेपद मिळविता आले नाही. तर रोहित शर्माने विक्रमी पाच वेळा मुंबईला आयपीएल करंडक मिळवून दिला आहे आणि यंदा तर तो विजेतेपदाची हॅट्रीक करण्याच्या उंबरठ्यावर आहे.
                          वर उल्लेख केलेल्या इंग्रजी वृत्तपत्रातील बातमी सध्या खोटी म्हणून जरी सांगितली जात असली तरी आगामी टि-२० विश्वचषक स्पर्धेत कोहली अपयशी ठरला तर त्याच्यासाठी सफेद चेंडूच्या खेळातील ती शेवटची संधी असणार हे मात्र नक्की !
                           सध्याचा नेतृत्वाच्या स्पर्धेतील कोहलीचा निकटचा प्रतिस्पर्धी रोहीत शर्मा फलंदाजी व नेतृत्वाच्या क्षेत्रात कोहलीपेक्षा किती तरी पुढे गेला असून कोहलीला आगामी टि- २० विश्वचषक विजेतेपदासाठी रोहीत शर्मा व त्याच्या मुंबई फलटणवरच अवलंबून राहावे लागणार असल्याने यंदाही कोहलीची आयसीसी विजेतेपदाची पाटी कोरीच राहण्याची शक्यता आहे. त्या प्रसिद्ध इंग्रजी वृत्तपत्राच्या बातमीतील बराचसा भाग खरा होणार असून टि-२० चषकानंतर कोहली नेतृत्व सोडणार नसून त्याची गच्छंती होऊ शकते.

लेखक : -  
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक. 
इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत. 
Email:  dattavighave@gmail.com
close