shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पर्यावरण जनजागरण(९५)"हिरडा "Terminalia chebula



पर्यावरण जनजागरणाचा नक्षत्रवनाच्या दृष्टीने विचार केल्यास कुंभ राशीच्या पूर्वा भाद्रपदा नक्षत्राचा पर्यायी वृक्ष हिरडा आहे.   


नास्ति यस्य गृहे माता तस्य माता हरीतकी ।। असे हिरड्याचे महत्त्व आहे.

हे झाड ५० ते ७५ फुटांपर्यंत वाढते. समुद्रसपाटीपासून पंधराशे मीटर उंचीपर्यंत व दाट वनातील महाबळेश्वर, कोयना तसेच मध्य प्रदेशातील नदीचा किनारा अशा प्रकारच्या ठिकाणी चांगल्या निचरा होणाऱ्या जमिनीत, भरपूर सूर्यप्रकाश मिळणाऱ्या ठिकाणी ४६ सेंटीग्रेड पर्यंतच्या तापमानाच्या प्रदेशात हा वृक्ष चांगला वाढतो. तसेच पाण्याचा ताण असेल तरी हा वृक्ष सहन करू शकतो.

या झाडाची जुनी पाने डिसेंबर ते मार्च काळात गळून पडतात व नवीन पालवी तांबूस रंगाची लव असलेली येते. पाने ७.६ ते १७.८ सेंटीमीटर लांबीची व ३.८ ते ८.९ सेंटीमीटर रुंदीची असतात.हिरड्याची फुले मार्च-एप्रिलमध्ये येतात. ही उग्र वासाची पांढरी पिवळी असतात.

औषधी म्हणून हिजड्याची फळे उपयुक्त असून नोव्हेंबर ते जानेवारी या कालावधीत येतात. फळे साधारण २.५ ते ३.३३ सें.मीटर लांब व ३.८ ते ८.९ सें.मिटर रुंदीची मध्यभागी फुगीर व ५ शिरा स्पष्ट दिसणारी  पिवळट तपकिरी रंगाची गोलसर असतात.

हिरड्याचे प्रमुख तीन प्रकार आहेत
१)हिरड्याचे फळ पक्व होण्यापूर्वी म्हणजे त्यात बी निर्माण होण्यापूर्वी काही फळे झाडावरून पडतात त्याला बाळहरडा असे म्हणतात 
२) हिरड्याचे फळ जे मोठे होते पण अपरिपक्व अवस्थेत वाढलेले असते त्याला  चांभारी हिरडा असे म्हणतात . यामध्ये टॅनीन असते. याचा उपयोग कातडी रंगवण्यासाठी होतो 
३) जे फळ पूर्ण परिपक्व होते त्याला सुरवारी हिरडा म्हणतात. हे पाण्यात टाकले कि बुडते. वजनाला २० ग्रॅमपर्यंत असते. हे औषधी फळ होय.

हिजड्याचा आकार व रंग यावरून हिरड्याच्या अजून सात जाती आहेत 
विजया : या जातीची फळे तुंबडी सारखी गोल असतात व सर्व प्रकारच्या रोगावर उत्तम असतात. 
पूतना : जातीचा हिरडा मोठा व पातळ असून तो लेप देण्यासाठी वापरतात.
अमृता : यातील बी बारीक,मांसल व भरलेली, रेचन देण्यास उपयुक्त असते.
रोहिणी : हे साधारण गोल फळ व्रणरोपक म्हणून वापरतात.
अभया: या हिरड्यावर पाच उभ्या रेषा ठळक असतात. हा नेत्र रोगावर वापरतात. 
जीवंती : याचा रंग सोन्यासारखा पिवळा असतो व सर्व रोगावर उपयुक्त असतो.
चेतकी : याला पाच धारा असतात व चूर्ण करण्यास उपयुक्त असून हा हिरडा भाजून खातात.

हिरड्याचे औषधी म्हणून दात, हिरड्या, प्लिहा, खोकला ,आवाज बसणे, उचकी श्वासन, गर्भाशयासाठी बलदायी तसेच पचनसंस्थेत रेचक असे गुणधर्म आहेत. गर्भवती स्त्रीने हिरडा खाऊ नये. त्रिफळा चूर्ण हे उपयुक्त औषध बनवण्यासाठी ३ भाग हिरडा, ७ भाग बेहडा व १२आवळा  असे प्रमाण असते. हिरड्याच्या फुलांपासून उत्तम मध मिळतो. यामुळे या झाडावर मधमाशांचे प्रमाण खूप असते जे पर्यावरण रक्षणासाठी फारच उपकारक असते. 

वृक्ष आणि जीवसृष्टी यांचं घनिष्ट नातं आहे यातून सुधारणावादी मानवाने बोध घेऊन वृक्ष लागवड, वृक्ष संवर्धन आणि त्यातून पर्यावरणाचे रक्षण करणे ही राष्ट्रभक्ती आहे हे समजून आचरण करणे ही काळाची गरज आहे. 

लेखक : चंद्रकांत शहासने, पुणे
संतवांड़मयाचे विज्ञाननिष्ठनिरुपणकार
मोबाईल क्रमांक : ९८८१३७३५८५

*कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्ट पुणे यांच्यावतीने पर्यावरण जनजागृती  उपक्रमांतर्गत..
*पर्यावरण दिन ५ जून २०२१पासून वन हुतात्मादिन ११ सप्टेंबर २०२१पर्यंत असे ९९ दिवसांचे पर्यावरण जनजागृती अभियानांतर्गत पर्यावरण विचार या ग्रंथांतील प्रकाशित लेख.








_____
close