मुंबई - पुणे द्रुतगती कळंबोली उड्डाणपुलाखाली भटक्या मुलांसाठी तसेच झोपडपट्टीतील लहान मुलांकरिता मुक्त शिक्षण जून महिन्यापासून सुरु केले आहे. सर्व मुले हि शाळाबाह्य आहेत. आपले सामाजिक दायित्व म्हणून विदर्भाची कन्या अनिताताई कोलते यांनी
एकूण १२० मुले व मुलींची शाळा मुंबई - पुणे द्रुतगती कळंबोली उड्डाणपुलाखाली सुरु केली. १ ते १४ वयोगटातील हि सर्व मुले असून डोंबाऱ्याचा खेळ करून आई वडिलांचा उदरनिर्वाह करतात, भीक मागणे भंगार जमा करणे, तसेच मिळेल ते काम करणे तसेच काही मुले हि ढोलक विकून परिवाराचा उदरनिर्वाह करतात. त्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणे गरजेचे आहे,असा विचार अनिताताई कोलते यांच्या मनामध्ये आला आणि त्यांनी तात्काळ मुक्त शिक्षण युनिट १ व मुक्त शिक्षण युनिट २ असे सुरु केले. या दोन्ही युनिटमध्ये एकूण १२० मुले व मुली आहेत.या मुलांना सकाळी ८ ते ११ या कालावधीमध्ये शिकवले जात आहे, सोबतच रोज सकाळी दूध वाटप बिस्कीट वाटप नाश्ता देण्यात येतो.
मुलाचा सर्वांगीण विकास होण्यासाठी मुलांना शैक्षणिक साहित्य म्हणजेच पाटी, नोटबुक, पेन्सिल, कंपास, पाण्याची बॉटल, शालेय दप्तर आदी इतर साहित्य व गणवेश मुलांना देण्यात आलेत तसेच खेळण्याकरिता मुलामुलींना बुद्धिबळ, कॅरम, ल्युडो, बॅटबॉल, दोरउडी, सापशिडी आदी साहित्य देण्यात येत. दररोज मुलं मुलींना मूल्य शिक्षण, मराठी, इंग्रजी, गणित, गाणे-गोष्टी,स्वच्छता आदी विविध विषय शिकवले जातात. समाजातील काही दानशूर व्यक्ती आपली मुलांचे वाढदिवस या मुलांसमवेत साजरे करतात तसेच अनेक सांस्कृतिक कार्यक्रम करण्यात येतात. या मुलांमध्ये शिक्षण घेण्याची आवड व जिज्ञासा वृत्ती अनुभवण्यात आली. सररोज राष्ट्रगीत म्हटले जाते समाजातील अनेक दानशूर व्यक्तींचे या उपक्रमासाठी योगदान आहे.
श्री.छगन उसरे, श्री. रोहिदास सूर्यवंशी, श्री.विठ्ठलराव कोलते, सौ.अंजलीताई इनामदार, श्री.लोकेश शिव, सौ. सुनिताताई नगराळे, श्रीमती प्रतिभाताई भोळे व इतर दानशूर व्यक्तींचे योगदान लाभले आहे. सध्या सौ. अनिताताई कोलते या बाहेर नोकरी करून हा उपक्रम राबवित आहेत. या उपक्रमामध्ये त्यांची १३ वर्षांची मुलगी कु.अभिषा कोलते देखील सहकार्य करीत आहे.
मुंबईमध्ये जवळपास हर्बर लाईन, सेंट्रल लाईन, आणि वेस्टर्न लाईनमध्ये ५० मुक्त शिक्षण उपक्रम या वर्षात सुरु करण्याचा मानस अनिताताई कोलते यांचा आहे. तरी मुलांच्या शैक्षणिक विकासासाठी समाजातील दानशूर व्यक्तींनी जमेल तशी मदत करण्यासाठी ८८५६९४८८२४ या क्रमांकावर आवाहन अनिताताई कोलते यांनी केला आहे.

