शिर्डी एक्सप्रेस प्रतिनिधी
आयपीएल -१३ चे कोरोना संसर्गामुळे खंडीत असलेले पर्व संयुक्त अरब अमिरातीमध्ये १९ सप्टेंबरला गणेश विसर्जनाच्या दिवशी सुरू झाले. दुबईच्या दुबई इंटरनॅशनल स्टेडियमवर आयपीएलमधील दोन कट्टर प्रतिद्वंद्वी मुंबई इंडियन्स व चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात झालेल्या उत्कंठावर्धक लढतीत चेन्नईने मुंबईवर बाजी मारली. त्याचबरोबर आयपीएलच्या मागील नऊ वर्षापासूनच्या शुभारंभाच्या लढतीत पराभूत होण्याची आपली अदभूत परंपराही मुंबईने राखली.
मुंबई इंडियन्सचा महाविक्रमी कर्णधार रोहीत शर्मा तंदुरुस्ती अभावी या सामन्यात खेळला नाही तर अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याया देखील या सामन्यात न खेळल्याने मुंबईला मोठा फटका बसला. वेस्ट इंडिजचा कर्णधार किरॉन पोलॉर्डने या सामन्यात मुंबईची धुरा सांभाळली. परंतु मजबूत स्थिती असतानाही पोलॉर्डला चेन्नईला नियंत्रणात ठेवता न येणे हे मुंबईच्या पराभवाचे ठळक वैशिष्टये ठरले.
नाणेफेक जिंकून चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला खरा पण मुंबईकडून खेळणारे न्युझिलंडचे जलदगती गोलंदाज ट्रेंट बोल्ट व अँडम मिल्नेने भन्नाट मारा करताना फॅफ ड्यूफ्लेसिस, मोईन अली, सुरेश रैना, एम.एस धोनी यांना झटपट बाद केले तर मिल्नेच्या चेंडूवर भरवशाचा फलंदाज अंबाती रायडू मनगटावर वेगवान चेंडू आदळल्याने जखमी होऊन " रिटायर्ड हर्ट " तंबूत परतला. आर्मगार्ड न लावणे रायडूला चांगलेच महागात पडले. त्याची दुखापत जर गंभीर असली तर चालू स्पर्धेसाठी चेन्नईला तो मोठा आघात ठरू शकतो.
चेन्नईची फलंदाजी भयानक संकटात असताना महाराष्ट्राचा ऋतुराज गायकवाड एका बाजूने धीर गंभीरपणे खेळला व ८८ धावांची षटकार चौकारांची झंझावाती खेळी खेळला. या खेळी दरम्यान त्याने रवींद्र जडेजा व ड्वेन ब्राव्हो बरोबर महत्वपूर्ण भागिदाऱ्या केल्याने चेन्नईला समाधानकारक धावसंख्या उभी करता आली. शिवाय जडेजा व ब्राव्होनेही षटकार चौकारांची आतिषबाजी करत चेन्नईसाठी महत्वाचे योगदान दिले.
मुंबईकडून डावाच्या सुरुवातीला सुरुवातीला पकडून गोलंदाजी करणारे बोल्ट, बुमराहा, मिल्ने शेवटच्या टप्प्यात भरकटल्याने चेन्नईने विजय मिळविण्या इतकी समाधानकारक धावसंख्या उभारली.
रोहीत शर्माच्या अनुपस्थितीत मुंबईच्या डावाची सुरुवात गचाळ झाली क्वींटन डिकॉक, अनमोल प्रितसिंग, सुर्यकुमार यादव, ईशान किशन झटपट परतल्याने मुंबईला मोठा आघात बसला तर हंगामी कर्णधार किरॉन पोलॉर्डही कर्णधाराला साजेशी खेळी करण्यात कमी पडल्याने मुंबईला आपल्या लक्षापर्यंत पोहोचता आले नाही.
मुंबईकडून हार्दिक पांड्याच्या जागेवर खेळणाऱ्या सौरव तिवारीने नाबाद ५० धावांची खेळी करत आपल्या परीने मुंबईच्या विजयासाठी जोरदार प्रयत्न केले. तर त्याने अॅडम मिल्ने सोबत सातव्या गडयासाठी ४० धावांची भागीदारीही केली. मात्र मिल्नेच्या बाद होण्याने मुंबईच्या विजयाच्या उरल्यासुरल्या आशाही संपल्या. चेन्नईकडून ड्वेन ब्राव्हो सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. ब्राव्होला तीन, दिपक चहारला दोन तर शार्दूल ठाकूर, जोश हेझलवूड यांना एक बळी मिळाला व एक फलंदाज धावबाद झाला. शार्दूल ठाकूरने आपला गोल्डन आर्म पुन्हा एकदा सिद्ध करताना सुर्यकुमार यादव सारखा प्रमुख खेळाडू बाद करून मुंबईच्या शिडातली हवाच काढून घेतली.
वीस धावांनी जिंकलेल्या या सामन्यामुळे चेन्नईचे आठ सामन्यात सहा विजयांसह बारा गुण झाले असून गुणतालिकेत अव्वल स्थान गाठले आहे. तर हा पराभव मुंबई इंडियन्सला चांगलाच त्रासदायक ठरणार असल्याने आठ सामन्यातील त्यांचा हा चौथा पराभव असून केवळ ८ गुण त्यांच्या खात्यात जमा झाले आहेत. उर्वरीत सहा सामन्यात त्यांना आपल्या लौकीकाला साजेसा खेळ करावा लागणार आहे. पुढच्या सामन्यात नियमित कर्णधार रोहीत शर्मा व हार्दिक पांड्या संघात येणार असल्याने मुंबईला बळ मिळणार आहे. त्यामुळे मुंबई प्ले ऑफ मध्ये पोहोचण्याचे आपले उद्दीष्ट साध्य करू शकते.
लेखक : -
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक.
इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत.
Email: dattavighave@gmail.com

