पाथर्डी तालुक्यातील प्रसिद्ध साहित्यिक डॉ. कैलास दौंड यांनी लिहिलेल्या 'जाणिवांची फुले' या बालकथासंग्रहाचे प्रकाशन बीड जिल्ह्यातील शांतीवन संस्थेतील अनाथ मुलांच्या हस्ते संपन्न झाले. ५ सप्टेंबर रोजी झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शांतीवनचे संस्थापक दीपककाका नागरगोजे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून कवी लक्ष्मण खेडकर उपस्थित होते.
'जाणिवांची फुले' हा बालकथासंग्रह नांदेडच्या इसाप प्रकाशनाने प्रकाशित केलेला असुन त्यात नाविन्यपूर्ण सोळा बालकथांचा समावेश आहे. किशोर मासिकाचे संपादक किरण केंद्रे यांची पाठराखण या पुस्तकाला लाभलेली आहे. यातील बहुतेक कथा किशोर मासिकातून पूर्वप्रकाशित आहेत. नव्या कल्पनांनी युक्त बालकथासंग्रह किशोरवयीन वाचकांना आवडेल असाच आहे.
डॉ. कैलास दौंड यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना अवतीभोवतीच्या निसर्ग, घटना, प्रसंग याकडे डोळसपणे पाहण्याची सवय लावण्याची ठेवणे गरजेचे असते. सांगून ' आई मी पुस्तक होईन? 'ही कविता म्हणून दाखवली.
शांतीवन संस्थेत संपन्न झालेल्या या कार्यक्रमाचे प्रास्ताविक दीपककाका नागरगोजे यांनी केले. विद्यार्थ्यांनी उपस्थितांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला. काही विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. कवी लक्ष्मण खेडकर यांनी मनोगत व्यक्त करतांना डॉ. कैलास दौंड इयत्ता आठवीच्या वर्गाला असलेल्या 'गोधडी' कवितेची ओळख करून दिली. शेवटी विद्यार्थ्यांनी आभार मानले.

