मागील सव्वातीन महिन्यांपासून इंग्लंडच्या भरगच्च अशा कसोटी दौऱ्यावर असलेल्या भारतीय संघाने इंग्लंड विरूध्दच्या चौथ्या कसोटी सामन्यात एक सनसनाटी विजय मिळवून मालिकेत २-१ अशी अपराजित आघाडी घेतली आहे. त्यामुळे पुढील सामन्यात जरी पराभूत झाले तरी भारत मालिका हरणार नाही. शिवाय बरोबर राहिलेल्या मालिकेनंतरही मागील मालिका भारताने जिंकलेले असल्याने रबर भारताकडेच राहील.
चार सामन्यानंतर भारताची आघाडी २-१ अशी कागदोपत्री दिसत असली तरी वास्तव वेगळंच आहे. भारताने या मालिकेत कधीही निर्भेळ असा खेळ केला नाही. भारताची फलंदाजी कधीही सातत्यपूर्ण राहीली नाही. कर्णधार कोहलीच्या नेतृत्वातील धारही कधी बोथट तर कधी जास्तच तेज जाणवली. क्षेत्ररक्षणातही काही अंशी ढिलाई दिसली. सोपे सोपे झेल सुटताना आपण सर्वानी बघितले आहेच.
एक गोष्ट मात्र भारतासाठी सकारात्मक राहिली. भारताचे जलदगती गोलंदाज या मालिकेत कायम सकारात्मक राहीले. हेडींग्ले कसोटीचा इंग्लंडचा पहिला डाव वगळता भारतीय गोलंदाजांनी इंग्लिश फलंदाजांना नेहमी आपल्या तळव्या खालीच ठेवले. हो, लॉर्डस कसोटीत इंग्लंडने भारतावर पहिल्या डावात २७ तर ओव्हल कसोटीत ९९ धावांची आघाडी घेतली तरी भारताच्या गोलंदाजांनी चौथ्या डावात इंग्लिश फलंदाजी नेस्तनाबूत करत भारताला अनुक्रमे १५१ व १५७ धावांनी मोठे विजय मिळवून दिले.
भारताचे सलामीवीर के.एल राहुल व रोहीत शर्माने व्यक्तीगतरित्या मालिकेत ३०० च्या वर धावा केल्या प्रत्येकी एक एक शतकही ठोकले. एकदा शतकी, दोनदा अर्धशतकी सलामी दिली. तरीही पाच डावात ते अपयशी ठरले आहेत याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.
चेतेश्वर पुजारा आपल्याला फॉर्मात आल्याचे दिसत असले तरी चारही कसोटयांच्या पहिल्या डावात तो दोन आकडी धावसंख्या ओलांडू शकला नाही. प्रत्येक कसोटीत भारताच्या दुसऱ्या डावात त्याने धावा काढण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु पहिल्या डावात त्याच्या सारखा मातब्बर फलंदाज खेळपट्टीवर उभा राहिला नाही तर भारतीय संघ पहिल्या डावात समाधानकारक धावा काढू शकत नाही.
कर्णधार म्हणून दोन कसोटी विजय मिळवून निराट कोहलीचे नेतृत्वाचे रेकॉर्ड सुधारले असले तरी एक फलंदाज म्हणून त्याच्या फलंदाजीत नसलेले सातत्य, मोठी खेळी करण्यात येत असलेले अपयश व संपूर्ण मालिकेत त्याच त्याच पद्धतीने बाद होणे संघासाठी व त्याच्या स्वतःच्या लौकीकाच्या दृष्टीने नक्कीच चिंताजनकच म्हणावे लागेल.
उपकर्णधार अजिंक्य राहाणेचे फलंदाजीतील अपयश सर्वांच्या नजरेत सलत असले तरी संघ प्रबंधन त्याच्याशी सापत्न वागणुक करत असल्याचे सकृत दर्शनी दिसते. लॉर्डस कसोटी राहाणेने संकट समयी पुजारा सोबत केलेल्या शतकी भागादारी व त्याने केलेल्या ६१ धावांमुळे जिंकले आहे हे विसरून चालणार नाही. तो अपयशी होत असताना मुख्य कोच रवी शास्त्री, बॅटींग कोच विक्रम राठोड व कर्णधार कोहलीने त्याचा आत्मविश्वास वाढविणे गरजेचे असताना हे सर्व जण त्याचे खच्चीकरणच करत असल्याचे दिसते. राहाणे अनेक दिवसांपासून कसोटीत पाचव्या क्रमांकावरच फलंदाजी करत आहे. त्याच्या संकटसमयी त्याला त्याच क्रमाकांवर खेळवून पाठबळ देणे गरजेचे असताना ओव्हल कसोटीत त्याच्या ऐवजी रवींद्र जडेजाला खेळवल्याने त्याच्या मानसिकतेवर विपरीत परीणाम झाला व तो १४ व शुन्य धावांवरच बाद झाला. राहाणेसारख्या वरिष्ठ खेळाडूस योग्य सन्मान न देणे हेच त्याच्या अपयशाचे कारण आहे. हे अनेक माजी क्रिकेटपटूंनीही अधोरेखीत केले आहे.

