भारताचा संघ सध्या जलदगती गोलंदाजांनी ओसंडून वाहत आहे. भारतात कधी नव्हे इतके भरमसाठ असे वेगवान गोलंदाजांचे पिक आले आहे. त्यातील अनेक गुणवान खेळाडू क्रिकेटच्या तिनही प्रारूपात सामील झाले आहेत. अनेकांनी आपल्या लौकीका पेक्षाही सातत्यपूर्ण चांगली कामगिरी करून संघातील स्थान पक्के केले. तर काही जण चांगली कामगिरी करण्यासाठी सज्ज आहेत.
परंतु या पैकी एक असलेल्या उमेश यादवने स्वतःला सिध्द करूनही डावलला जात आहे. ४८ कसोटयात १४८ बळी, ३५९ धावा, १७ झेल, ४ धावबाद. ७५ एकदिवसीय सामन्यात १०६ बळी, ७९ धावा, २२ झेल, ६ धावबाद. ७ टि-२० सामन्यात ९ बळी, २ धावा, ३ झेल व १ धावबाद. १२१ आयपीएल सामन्यात ११९ बळी, १२२ धावा, २९ झेल, ८ धावबाद. ताशी १५० किलो मीटर वेग. अशी शानदार कामगिरी. भारताकडून सर्वाधिक बळी बळी घेणाऱ्या डावखुरा वेगवान गोलंदाज दस्तुर खुद्द झहीर खानने त्याला भारतीय संघात घेण्याची शिफारस केली.
तर, गॅरी सोबर्स आणि ग्लेन मॅकग्रथ यांनी त्याच्या गोलंदाजीची प्रशंसा केली. शिवाय डेल स्टेन जो खुद्द जगातील सर्वात वेगवान गोलंदाज होता, ते याचे चाहते आहेत. त्याच्या वेगवान गोलंदाजीची शैली बघून अनेक माजी क्रिकेटपटू प्रभावित झाले. जवागल श्रीनाथ नंतर भारतात कसोटीत दहा बळी घेणारा एकमेव वेगवान गोलंदाज. असा उमेश यादव आज भारताच्या संघात असूनही दुर्लक्षित आहे.
उमेश यादव आजही भारताचा सर्वात वेगवान गोलंदाज आहे. परंतु काही प्रस्थापित, नव्याने आलेल्या व येऊ पाहात असलेल्या गोलंदाजांमुळे पुर्णपणे झाकोळला आहे. एक वेळ मोहम्मद शमी, ईशांत शर्मा यांच्या संगतीने धारदार मारा करून संघात स्थान पक्के असणारा उमेश जसप्रित बुमराहाच्या आगमना नंतर क्रिकेटच्या तिनही प्रारूपांतून डावलला गेला आहे.
भारताचा संघ इंग्लंड दौऱ्यावर असून तेथील वातावरण जलदगती गोलंदाजांना पोषक आहे. तेथे प्रत्येक कसोटीत ४ वेगवान गोलंदाज खेळविले गेले. परंतु उमेश यादवला पहिल्या अकरा जणात खेळविण्याचा जराही विचार झाला नाही.ऑस्ट्रेलिया दौऱ्यात दुसऱ्या कसोटीत दुसऱ्या डावात गोलंदाजी करताना त्याच्या पायाला दुखापत झाली. पारिणामतः तो सामनाच नव्हे तर उर्वरीत दोन कसोट्यांनाही मुकला. त्याच्या जागी आलेल्या नवोदित मोहम्मद सिराजने मिळालेल्या संधीचे सोने केले. त्या बळावर त्याला भारतात इंग्लंड विरूध्द झालेल्या ४ पैकी २ कसोट्यात संधी मिळाली. त्याच मालिकेच्या शेवटच्या दोन सामन्यात उमेश संघात होता. परंतु पहिल्या अकरा जणांत त्याला स्थान मिळाले नाही.
न्यूझिलंडविरुद्ध झालेल्या वर्ल्ड टेस्ट चॅंपियनशिपच्या अंतिम सामन्याबरोबर इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या तीन कसोटयात त्याला डावलले गेले. एवढेच नव्हे तर पुढील दोन कसोटयातही तो संघाबाहेरच राहाणार हे पक्के आहे. एकशे चार कसोटया खेळलेला ईशांत शर्मा त्याचा जुना ऱ्हीदम, वेग हरवून बसला आहे तरी त्याला केवळ कर्णधार कोहलीच्या हट्टापायी दोन कसोटया खेळायला मिळाल्या. हेडिंग्ले कसोटीत बेदम मार खाऊन बळींची पाटी कोरी राहील्यानंतर त्याच्यावर जगभरातून लाखोली वाहीली गेली. त्यानंतर कुठे संघ प्रबंधनाला तो संघासाठी बोजा असल्याचे समजले.
एवढेच नाही तर बीसीसीआयने राखीव खेळाडूत असलेला प्रसिद्ध कृष्णा या नवोदित वेगवान गोलंदाजाला मुख्य संघात घेऊन उमेश यादवचे भविष्यातील आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे दरवाजे बंद झाल्याचे संकेतच दिले आहे.विदर्भाचा पहिला कसोटीपटू असलेल्या उमेशला जर अंतिम संघातून वारंवार डावलले गेले तर त्याच्या सारख्या गुणवान गोलंदाजाची प्रतिभा कोमेजली जाईल. उमेश सध्या साडे तेहतीस वर्षांचा असून त्याच्यात बरेच क्रिकेट बाकी आहे. तो सध्या फक्त कसोटी संघातच निवडला जातो, मात्र अंतिम अकरा जणात त्याला संधी मिळत नाही. तसेच वनडे व टि- २० संघातही त्याच्या साठी दरवाजे बंद झाले आहेत. त्यामुळे उमेशला कसोटी संघात कमीत कमी रोटेशन पॉलिसीनुसार तरी खेळविले पाहीजे. सध्या तरी तशी शक्यता दुरूनही दिसत नाही.
तरी संघ प्रबंधनाने उमेशला सापत्न वागणुक न देता संघातील इतर खेळाडूंप्रमाणे संधी द्यावी. उमेश यादव सारखा सदा तंदुरुस्त असलेला तगडा जलदगती गोलंदाज नाहक बळीचा बकरा ठरत असून त्याची वाताहत होऊ न देता त्याला मुख्य प्रवाहातच ठेवावे ही भारतीय क्रिकेट व्यवस्थापनास कळकळीची विनंती !
लेखक : -
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक.
इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत.
Email: dattavighave@gmail.com

