shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

दूर्लक्षीत स्वातंत्र्य लढ्याचा आज स्मृतिदिन... सव्वीस्तर वाचा..! सविनय कायदेभंग १९३० ..... चिरनेरचा जंगल सत्याग्रह...!!


२५ सप्टेंबर १९३०
१९३० साली ब्रिटिश राजसत्तेविरूद्ध सविनय कायदेभंगाचा लढा पुकारण्यात आला होता. या लढ्यात सध्याच्या रायगड जिल्ह्यातील व पुर्वीच्या कुलाबा जिल्ह्यातील पनवेल, उरण तालुक्यातील देशभक्तांनी जो सक्रिय सहभाग नोंदविला त्याची माहिती आज आपण घेणार आहोत.

कुलाबा जिल्हा जंगल सत्याग्रहासाठी सिद्ध झाला होता. पनवेल तालुक्यातील आपटा गावचे रहिवासी वकील नानासाहेब बेडेकर आणि पनवेलचे आप्पासाहेब वेदक यांनी जंगल सत्याग्रह करण्यासाठी योजनेची आखणी केली. पनवेलच्या टेनिस कोर्टावर कोर्टाच्या मैदानावर पहिली सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेमध्ये चिरनेर, कल्हे, आंबेवाडी या ठिकाणी सत्याग्रह करण्याचे जाहीर करण्यात आले व त्यानुसार सत्याग्रहींची नोंदणी करण्याचे काम झाल चालू झाले. 

 यातील पहिला सत्याग्रह करण्यासाठी कुलाबा जिल्हा सत्याग्रह समितीची बैठक अलिबाग येथे भरली होती व या बैठकीत पनवेल तालुक्याचे प्रतिनिधी म्हणून नानासाहेब बेडेकर वकील हे उपस्थित होते. ज्या पद्धतीने मिठाचा सत्याग्रह करण्यात आला तशाच पद्धतीने जंगलचा सत्याग्रह करावा व तो प्रभावी ठरावा अशा प्रकारचे धोरण अवलंबिण्यात आले होते. या सत्याग्रहातील संघर्षाची जबाबदारी नानासाहेब बेडेकर यांनी स्वीकारली होती. नानासाहेब ही बैठक आटोपून पनवेल येथे सत्याग्रही समितीच्या कचेरीत आले.चिरनेर, कल्ले, आंबेवाडी या ठिकाणी सत्याग्रह करण्याबाबत विचार विनीमय करून  सत्याग्रहींची नोंदणी करण्याचे काम चालू झाले.  बैठकीत बापूसाहेब खरे यांनी स्वयंसेवक दलाची स्थापना केली. अशाप्रकारे पहिला जंगल सत्याग्रह ह कल्हे येते करण्यात आला.

 या सत्याग्रहाला सरकारतर्फे फारसा विरोध झाला नाही.  सरकारने विरोध केला नाही यामुळे सत्याग्रहींचा आत्मविश्वास वाढला.यानंतरचा जंगल सत्याग्रह चिरनेर येथे करण्याचे ठरले. सत्याग्रह करण्यासाठी परिसरातील गोवठणे, आवरे, पाले ,पिरकोन, वशेणी, पुनाडे, पाणदिवे, कोप्रोली, खोपटे, कळंबुसरे, चिरनेर, भोम, विंधणे, टाकी, धाकटी जुई, बोरखार, दिघोडे या गावात फिरून प्रचार करण्यात आला. सत्याग्रहींची नोंद करण्यात आली. विशेष म्हणजे प्रत्येक गावातून सत्याग्रहाला पाठिंबा मिळाला व सत्याग्रहामध्ये भाग घेण्यासाठी गावकरी तयार झाले.

चिरनेरच्या जंगल सत्याग्रहाची आखणी करण्यासाठी चिरनेर ते अक्कादेवी या वाटेवरील राम मंदिरात अंताजी महादेव पोवळे यांच्या अध्यक्षतेखाली सभा घेण्यात आली होती. सभेला मार्गदर्शन करण्यासाठी चिरनेरचे  देशभक्त स.के पोवळे, मेघनाथ बा. पोवळे, जयराम स. वाणी, कोप्रोली गावचे जनार्दन काशिनाथ पोटे, मोठ्या जुईचे विष्णुपंत रहाळकर तसेच पनवेलहून तालुका सत्याग्रह समितीचे कार्यकर्ते वसंत केशव वेदक, नानासाहेब बेडेकर वकील, केशव गणेश गुप्ते, नारायण धोंडू खरे, शंकर नारायण पांडव, महादेव गणेश मानकामे हे आले होते. या याव्यतिरिक्त चिरनेर मधील लक्ष्मण चावजी नारंगीकर, बारक्या अंबाजी चिर्लेकर, गजानन बाळाजी चिर्लेकर, धनाजी जोमा म्हात्रे, माया कानू पाटील, तुकाराम विठू मोकल, बारक्या गवत्या फोफेरकर , दाणा नागा गोंधळी अशा स्थानिक कार्यकर्त्यांसह दीडशे मंडळी जमली होती. 

चिरनेर येथे सत्याग्रह करण्यासाठी करळ हे ठिकाण निवडण्यात आले. पनवेल पासून चिरनेर हे गाव २० किलोमीटर अंतरावर आहे आणि तेथून जवळच तीन मैलांवर खोपट्याची खाडी आहे. गावाच्या पूर्व दिशेस दक्षिणोत्तर डोंगर रांगा आहेत आणि या डोंगररांगांमध्ये विविध प्रकारची वनसंपत्ती, सागाची झाडे असलेले घनदाट जंगल होते. हा भूभाग चिरनेर गावापासून सातशे मीटर अंतरावर डोंगर असलेला असा असून तेथील डोंगरावर अकादेवीचे पुरातन छोटेखानी मंदिर आहे. या डोंगराला अकादेवीचा डोंगर असे म्हणतात. याच अक्कादेवीच्या डोंगरावर वडाच्या झाडाखाली सत्याग्रहींनि जमावे असे ठरले. उंच उंच वाढलेल्या सागाच्या जंगलात शिरून सागाची झाडे तोडून सत्याग्रह करायचा अशी रूपरेषा ठरली. 

जंगल सत्याग्रह अकादेवीच्या डोंगरात होणार याची बातमी ब्रिटिश राजसत्तेला अगोदरच मिळाली होती. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून ब्रिटिशांनी पोलीस यंत्रणा कसून राबविली होती. गावागावात दहशत पसरविण्याचे काम चालू केले होते. फॉरेस्ट खात्याचे कर्मचारी जंगलात लाकुडफाट्यासाठी फिरणाऱ्या आदिवासी ,आगरी बाया-बापड्यांना लाकडे तोडण्यापासून परावृत्त करत होते. कोयते, कुऱ्हाडी अशी शेती अवजारे जप्त करत होते. बळजोरीने मारहाण करत होते. गाईगुरांना जंगलात फिरायला मज्जाव करण्यात आला होता व गाईगुरे पकडून ती कोंडवाड्यात डांबण्याचे प्रकारही वाढले होते. याबाबत गावात तलाठ्याकडे व पोलीस पाटलाकडे तक्रारी होत होत्या. सत्याग्रही समितीच्या मंडळींनी या विरोधात राजसत्तेकडे आपले म्हणणे मांडून सौजन्याचे धोरण स्वीकारावे म्हणून मध्यस्थी केली होती. पण राजसत्ता नमती घेण्यास तयारच नव्हती.

दुसरीकडे गावागावातून सत्याग्रहाचे वातावरण तयार होत होते. पावसाळ्याचे दिवस होते. सर्वत्र पाऊस आणि चिखलाच्या पाऊलवाटा यातून रस्ता काढीत रात्री-अपरात्री गावातील मंदिरांतून बैठका होत होत्या. सत्याग्रह कसा करायचा याबाबत मार्गदर्शन केले जात होते.प्रभातफेऱ्या निघत होत्या.

 सत्याग्रहीमध्ये शिस्त आणि एकवाक्यता दिसावी यासाठी कोप्रोली गावच्या देशभक्त जनार्दन काशिनाथ पोटे यांनी पन्नास सत्याग्रहींसाठी सदरा, पायजमा, टोपी, पट्टा, बिल्ला असा गणवेश स्वखर्चाने शिवून दिला होता.
हिराजी शाहीर व पोटे यांनी राष्ट्रीय गीते रचली . स्वातंत्र्याची भजने गावोगावी गायली जाऊ लागली.

 चिरनेरच्या जंगलात सत्याग्रह करण्यासाठी प्रथमतः पाचशे सत्याग्रहींचा समूह चिरनेरच्या गणपतीच्या देवळातून अकादेवीच्या डोंगराकडे जाण्यासाठी, देशभक्त बाबुराव आपटे यांच्या नेतृत्वाखाली  निघाला. 
जंगल आमचे असून,
 सरकार बसले टपून...
 झाडे तोडण्याची बंदी आम्हाला
 मोठं नवल वाटते आम्हाला...

 हे गाणे बोलत सत्याग्रही डोंगर चढू लागले. वनखात्याच्या अधिकाऱ्यांनी सात-आठ बंदूकधारी पोलिसांच्या मदतीने सत्याग्रहींवर दहशत बसवण्यासाठी प्रयत्न केले.

अकादेवीच्या डोंगरावरील सपाट माळरानावर वडाच्या झाडाखाली सत्याग्रही एकत्र आले तेव्हा पोलीस आणि फॉरेस्ट गार्ड यांच्यासमोरच देशभक्त बाबुराव आपटे यांनी सभा सुरू केली. 'जंगलच्या कायद्यामुळे जनतेवर कसा अन्याय होतो आहे, जनतेची पिळवणूक कशी होत आहे, हे सर्व थांबविणे आवश्यक आहे'.

त्यासाठी आपण सर्वजण शांततेने कायदा मोडू या'!
चला !! हा कायदा मोडून काढण्यासाठी येथील झाडोरा आपल्या कुंपणासाठी तोडून आपला हक्क बजावू या! 
असे बोलताच बिगुल वाजले. सर्व बाजूने सत्याग्रही जंगलात शिरले आणि त्यांनी झाडेझुडपे तोडण्यास सुरुवात केली. लगेचच पोलिसांनी हस्तक्षेप करीत धरपकड केली. बंदुकीचा धाक दाखविला आणि सत्याग्रहींना जंगलाबाहेर काढले. काही सत्याग्रहींना पकडून ठेवले. देशभक्त बाबुराव आपटे यांना पकडले. थोड्यावेळाने पकडलेल्या सत्याग्रहींना सोडून दिले.  सोडलेले सत्याग्रही पुन्हा जंगलात घुसले. पोलिसांची संख्या कमी होती आणि सत्याग्रही जास्त होते त्यामुळे पोलिसांची तारांबळ उडाली. सत्याग्रहींसमोर पोलीस हतबल झाले . त्यामुळे सत्याग्रहींचा उत्साह वाढला. अशाप्रकारे जंगल सत्याग्रहाचा पहिला दिवस यशस्वी ठरला. सत्याग्रहाच्या पहिल्या दिवशी सत्याग्रहींमध्ये केशव गणेश गुप्ते यांची मुलगी विमलाताई ही काही महिलांसह सहभागी झाली होती.

गाईंचा सत्याग्रह: चिरनेरच्या जंगल सत्याग्रहातील विशेष म्हणजे सत्याग्रहींनी  आपला  जंगलात गुरे चारण्याचा हक्क सिद्ध करण्यासाठी अकादेवीच्या डोंगरावर  दुसरा सत्याग्रह गायी चारून केला. हा सत्याग्रह करण्यासाठी प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या सोबत गाय आणली होती. गाईंना फुलांच्या माळा घालून कपाळावर गुलाल लावला होता. मिरवणुकीने गाई वडाखाली तेथे त्यांची पूजा करण्यात आली यावेळीही सत्याग्रहाचे नेतृत्व बाबुराव आपटे यांनी केले होते. सत्याग्रहींसमोर भाषण देताना ते म्हणाले की,
 *'सरकारने आपल्या गाईगुरांना चाऱ्यापासून वंचित ठेवलेले आहे हे अत्यंत दुःखदायक आहे. तेव्हा आपण जंगलातील चारा गाईगुरांना मुक्त करून देऊ. आता आपण आपल्या गाई चरण्यासाठी जंगलात सोडणार आहोत'.

 असे बोलताच सर्व सत्याग्रहींनी सोबत आणलेल्या गायींना मोकळे केले व रानात चरायला सोडले. या दिवशी देखील पोलीस बंदोबस्त मर्यादितच होता. गायी रानात दूरवर पोहोचल्या. पोलिसांना काहीच करता आले नाही. पोलिसांनी देशभक्त बाबुराव आपटे यांना अटक केली व थोड्यावेळात त्यांना मुक्त केले.

अशाप्रकारे एकापाठोपाठ दोन जंगल सत्याग्रह यशस्वी झाले. मात्र या दोन्ही वेळी सरकारचे तसे काही नुकसान झाले नाही म्हणून सरकारने  जास्त विरोध करण्याचा प्रयत्न केला नाही.यापुढील सत्याग्रह अजून ताकदीने करावा यासाठी सत्याग्रह समितीच्या नेत्यांनी विचार विनिमय केला व जंगलात शिरून झाडे तोडावी असे एक गुप्त बुलेटीन प्रसारित केले. याची खबर राजसत्तेला लागली तेव्हा पोलीस पाटील, तलाठी, फॉरेस्ट गार्ड, सर्कल इन्स्पेक्टर, मामलेदार या सर्वांना सरकारने हुकूम काढून सत्याग्रहींवर सक्त लक्ष ठेवावयास सांगितले. 
दोन्ही सत्याग्रह यशस्वी झाले होते.

आता तिसऱ्या सत्याग्रहासाठी सत्याग्रही समितीचे नेते चिरनेरला पोहोचले होते. स्वातंत्र्य लढ्याचे केंद्र म्हणून चिरनेरचा लौकिक सर्वदूर पसरला होता. समितीत पनवेलचे अण्णासाहेब वेदक हे मार्गदर्शक होते. तर सत्याग्रहाचे नेतृत्व लक्ष्मण चावजी नारंगीकर व धनाजी जोमा म्हात्रे यांच्याकडे सोपविले होते.

सत्याग्रहाची तयारी चालू होती याकडे ब्रिटिश सरकारची पूर्ण लक्ष होते. ब्रिटिशांनी पनवेल वन विभागात नवीन अधिकाऱ्यांच्या नेमणुका केल्या. सत्याग्रहाचा बिमोड करण्यासाठी पोलीस यंत्रणेची जमवाजमव केली. सोलापूरच्या झेंडा सत्याग्रहात जनतेवर अन्याय करणाऱ्या फौजदार रामचंद्र पाटील यांची नेमणूक पनवेल पोलीस स्टेशनला करण्यात आली.  त्याच्या मदतीला सुभेदार बुधाजी लक्ष्‍मण भोसले या सेवानिवृत्त अधिकाऱ्याच्या हाताखाली स्वतंत्र पोलीस पथक केले. यामुळे परिसरात पोलिसांचा दबाव वाढू लागला. ज्याप्रकारे पोलिसांची दडपशाही वाढू लागली तेवढ्याच गतीने सत्याग्रही निर्धार करून सत्याग्रहासाठी तयार झाले. 

दिनांक २५ सप्टेंबर रोजी झाडे तोडण्याचा जंगल सत्याग्रह करण्याचे सत्याग्रह समितीने जाहीर केले होते. या पार्श्वभूमीवर पनवेलचे मामलेदार केशव महादेव जोशी व फौजदार रामचंद्र पाटील यांची बैठक झाली.  या बैठकीत फौजदार रामचंद्र पाटील याने मामलेदार जोशी यांना सुनावले तुम्ही सत्याग्रहाच्या ठिकाणी हजर राहू नये. तथापि मामलेदार जोशी यांनी फौजदार रामचंद्र पाटील यांचे हे म्हणणे मान्य केले नाही व सत्याग्रहाच्या ठिकाणी सुरुवातीपासून हजर रहाणार असल्याचे जाहीर केले.

पनवेलचे मामलेदार हे न्याय बुद्धीने वागणारे अधिकारी होते तर फौजदार रामचंद्र पाटील हा दडपशाही करणारा अधिकारी होता.  फौजदार रामचंद्र पाटील याने मामलेदार जोशी यांना विनंती केली की 'सत्याग्रह हा अत्यंत उग्र स्वरुपाचा होणार आहे तेव्हा प्रसंगी गोळीबार करण्याची परवानगी मिळावी' यावर जोशी यांनी असे सांगितले की, सत्याग्रहाच्या ठिकाणी जी परिस्थिती असेल त्याप्रमाणे त्यावेळी ठरवता येईल. अशा पद्धतीने फौजदार रामचंद्र पाटील यांच्या मनमानी दांडगाईच्या कारभारास मामलेदार जोशी यांनी मुरड घातली.

 सत्याग्रहचे नेते पनवेलचे देशभक्त आप्पासाहेब वेदक यांचे मामलेदार केशव जोशी यांच्याशी सलोख्याचे संबंध होते. मामलेदार केशव जोशी यांनी फौजदार रामचंद्र पाटलाच्या ब्रिटिशधार्जीण्या हुकूमशाही प्रवृत्तीची कल्पना देशभक्त आप्पासाहेब वेदक यांना दिली व काळजी घेण्यास तसेच सावधानता बाळगण्यास सांगितले . त्यानुसार देशभक्त आप्पासाहेबांनी  सत्याग्रहाचे नेतृत्व करणाऱ्या लक्ष्मण चावजी व धनाजी जोमा यांना प्रसंगानुरूप सावधानता बाळगून तशा प्रकारच्या सूचना सत्याग्रहींना करण्याबाबतचा सल्ला दिला. 

२५ सप्टेंबर १९३० रोजी सकाळपासून मुसळधार पाऊस पडत होता त्यामुळे सत्याग्रहास किती सत्याग्रही येतील याबाबत चिंतेचे वातावरण पसरले होते. तथापि अकराच्या सुमारास पाऊस ओसरला तसे सर्वत्र सत्याग्रही जमू लागले. राष्ट्रीय गीते, भजने, घोषणा यांचे आवाज दिशादिशातुन घुमू लागले. ठिकाणाहून सत्याग्रही चिरनेरला पोहोचले. रामाच्या मंदिराजवळ सत्याग्रहींचा मेळा जमला. चिरनेरच्या परिसरातील सुमारे पंचवीस गावची सत्याग्रही मंडळी या मेळ्यात हजर झाली. सत्याग्रहात सहभागी होण्यासाठी पनवेलचे केशव गणेश गुप्ते, शंकर चिंतामणी खरे, तात्यासाहेब बापट, डॉक्टर फडके, शंकर पांडव, मानकामे यासोबत कुमारी विमल गुप्ते व काही महिला सकाळीच पोहोचल्या होत्या. सर्व सत्याग्रहींना सूचना देण्यात आल्या. सत्याग्रहींना सूचना देण्याचे काम खोपटचे देशभक्त गणा म्हात्रे यांचेकडे सोपविले होते. सत्याग्रहाची संपूर्ण जबाबदारी स्थानिक सत्याग्रही समितीवर सोपवण्यात आली होती. सत्याग्रहाच्या ठिकाणी काही घडल्यास औषधोपचार व शुश्रृषा करण्याची जबाबदारी डॉक्टर फडके यांच्या सुश्रूषा पथकाकडे सोपविली होती. सत्याग्रहाच्या ठिकाणी काही गंभीर संकट उभे राहिले तर पुढील देखभालीचे काम करण्यासाठी देशभक्त आप्पासाहेब वेदक व नानासाहेब बेडेकर वकील यांनी तयारीत राहावे असे सत्याग्रहाचे नियोजन होते. चिरनेर गावातून पाऊल वाटेने सत्याग्रहींची दिंडी अकादेवीच्या डोंगराकडे ओढ्याच्या बाजूने निघाली. ओढ्यापासून पूर्वदिशेला तीस मीटर अंतरावर एक विहीर आहे व त्या विहिरीच्या बाजूला पाच पंचवीस माणसे उभी राहतील अशा आकाराचा चबूतरा आहे व त्यापासून पुढे माळरान आहे. जवळच आमराई व  अकादेवीच्या मंदीरापाशी वडाचे मोठे झाड आहे व त्या सभोवताली झाडे झुडपे आणि सागाचे जंगल अशी तेथील भौगोलिक रचना.
 माळरानावर जमाव जमला होता. या जमावाला पोलिसांनी सर्व बाजूने घेरून धरले होते तथापि पोलिसांच्या दहशतीला सत्याग्रही घाबरत नव्हते. त्यांनी घोषणा, गाणी आणि भजने चालू ठेवली होती.

जंगल आमचं असून
सरकार बसलय टपूनं
 झाड तोडण्याची बंदी आम्हाला
 मोठं नवल वाटतं मनाला

 सत्याग्रहींची गाणी ऐकत मामलेदार केशव जोशी उभे होते. सत्याग्रहींची शिस्त पाहून ते प्रभावित झाले होते. त्यांनी फौजदार पाटील यांना बोलावून सांगितले की, 
*'कसलाही अनुचित प्रकार होणार नाही याची काळजी घ्या! आणि जरूर पडल्यास मला समक्ष बोलवा आणि नंतर निर्णयांनी काय ते ठरवू'
सत्याग्रहाच्या अग्रभागी चिरनेरचे वैद्य अंताजी महादेव पोवळे हे होते. ते सत्याग्रहींना सूचना करीत होते.  सत्याग्रही दामाजी गोपाळ मोकल याने वडाच्या पूर्वेस असलेल्या डोंगरावरील एका सागाच्या उंच झाडावर चढून तिरंगा फडकाविला. ते झाड इतके उंच होते की, हा तिरंगा अकादेवीच्या डोंगरापासून दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या खोपटे गावातूनही दिसत होता. मैदानावर सभेला उद्देशून आदेश देण्यात आला की,
'सरकारचा अन्यायी जंगलचा कायदा तोडण्यासाठी शांततेचा वापर करा' बीगुलाचा आवाज घुमला.

सत्याग्रहींचा जमाव सज्ज झाला आणि शांततेने एक एक तुकडी सागाच्या जंगलाच्या दिशेने निघाली. प्रत्येक सत्याग्रही एकेका सागाच्या झाडाजवळ जाऊन उभा राहिला.  पाठोपाठ पोलिसांच्‍या तुकडीने सत्याग्रहींना प्रतिबंध करायला सुरुवात केली. जमावाच्या तुलनेत पोलीसदल तुटपुंजे होते. सर्व सत्याग्रही आडवाटेने जंगलात पसरले होते. अशावेळी पोलिसांनी सत्याग्रहींची धरपकड सुरू केली. सत्याग्रही पोलिसांच्या हाती लागत नव्हते. पोलिसांनी काही सत्याग्रहींना पकडले देखील! काही सत्याग्रहींनी सागाची झाडे तोडण्यास सुरुवात केली. सागाची झाडे तुटू लागली. तिकडे पोलिसांनी सत्याग्रहींना बेड्या घातल्या व पंचनामे करण्यास सुरुवात केली हे पाहून काही सत्याग्रही हातात सागाची लाकडे घेऊन पोलिसांसमोर येऊन उभे राहिले, व म्हणाले '
आम्ही साग तोडले आहेत!आम्ही गुन्हा केलेला आहे, गुन्हा आम्हाला मान्य आहे! हा आमच्याकडील मुद्देमाल आहे.आम्हाला बेड्या घाला! पंचनामा करा!!
 बोल बोलता असंख्य सत्याग्रही निर्धाराने पोलिसांसमोर गुन्हा दाखल करा असे बोलत उभे राहिले. पोलिसांनी काही सत्याग्रहींना मारहाण केली. तेव्हा सत्याग्रही म्हणाले की, आम्ही गुन्हा कबूल केला आहे! आम्ही अटक करून घेण्यास तयार आहोत! आम्हाला मारहाण कशासाठी करता?.

 या प्रश्नाला फौजदार पाटलांकडे काहीच उत्तर नव्हते.अशा प्रश्नांनी फौजदार पाटलाची मानहानी होत होती. याचा राग येऊन पोलीस सत्याग्रहींना अजुन जोराने मारहाण करू लागले. काही पोलीस सत्याग्रहींना लाठीने देखील मारहाण करीत होते. तथापि सत्याग्रही शांत होते. सत्याग्रहींनी फौजदार पाटील व पोलीस यांना घेराव घातला व मारहाण थांबविण्यास सांगितले.  सत्याग्रहींच्या गराड्यात असलेल्या फौजदार  पाटील याने एका शिपायाला मामलेदार साहेबांकडे संदेश घेऊन पाठविले. तेव्हा मामलेदार जोशी यांनी सत्याग्रहींच्या बेड्या काढण्याचा हुकुम केला व सत्याग्रहींना मुद्देमाल जागेवर ठेवून पोलिसांच्या अटकेत राहण्यास सांगितले. मामलेदार जोशींच्या या सरळ स्वभावामुळे सत्याग्रहींचा धीर वाढला. सत्याग्रहींनी जयजयकार केला. अटक असलेले सत्याग्रही पोलिसां समवेत डोंगर उतरू लागले. जयजयकाराचा आवाज ऐकून गावात जमलेला लोकांचा लोंढा सत्याग्रहींकडे धावत येऊ लागला. त्यांना आवरण्यासाठी सत्याग्रहींनी साखळी केली. वडाच्या झाडासमोर हा सर्व प्रकार घडत होता. या घटनेला नंतर ढकलाढकलीचे स्वरूप आले. आणि या ढकलाढकलीतच फौजदार पाटलाचा पटका उडून खाली पडला. तेव्हा अपमानाने अत्यंत क्रोधायमान झालेल्या हवालदाराने 'बुधाजी जान बचाव' अशी बोंब मारत मामलेदार जोशींवर समोरून गोळीबार केला. या धामधुमीत फौजदार पाटलाच्या पाठीमागे असलेल्या सत्याग्रही तानाजी जोमा म्हात्रे याने फौजदार पाटलाच्या पिस्तूल असलेल्या हातावर जोराने फटका मारला.

 त्यासरशी फौजदाराच्या हातातील  पिस्तूल उडाले व जमिनीवर पडले ते घेण्यासाठी फौजदार पाटील धावले मात्र धनाजी जोमा मात्रे याने चपळाईने ते उचलून माया कानू पाटील यांच्या दिशेने फेकले ते घेऊन माया कानू पाटील तेथून पसार झाला. अशाप्रकारे फौजदार पाटील नि:शस्त्र झाला. 
राष्ट्रीय प्रवृत्तीच्या मामलेदार केशव जोशी यांच्यावर फौजदार पाटील यांनी केलेल्या गोळीबारामुळे सत्याग्रहींचा राग अनावर झाला. परिणामी सत्याग्रहींनी फौजदार पाटलाला बेदम मारहाण केली. यात फौजदार अर्धमेला झाला तेव्हा सत्याग्रहींनी त्याला उचलून वडाच्या झाडाखाली आणून ठेवले. गावाकडून जो जमाव डोंगराकडे येत होता त्या जमावाला सामोरे जाऊन सुभेदार बुधाजी भोसले याने जमाव अडवत गोळीबार केला. अशा प्रकारे रणधुमाळी माजली व सत्याग्रही सैरावैरा रानोमाळ पसार झाले. अकादेवीच्या माळावर जखमी सत्याग्रही, पोलीस फौजदार आणि काही हुतात्मे एवढेच राहिले.  पोलिसांनी गोळ्या संपेपर्यंत गोळीबार केला. नंतर ते दबकत दबकत पुढे येत असताना चाळीस-पन्नास पावलावरील एका महिलेने जोराने एक दगड फेकला तो एका पोलिसाच्या डोक्याला जोरात लागला व किंचाळत तो खाली पडला. बाकीचे पोलीस बंदुकीसह गावाकडे पळून गेले. या सत्याग्रहात आठजण जागीच ठार झाले व एक सत्याग्रही दोन दिवसांनी हुतात्मा झाला. चिरनेरच्या सत्याग्रहाचे वृत्त पोलीस चौकीत पोहोचले व ठाण्याहून दीडशे पोलिसांची कुमक चिरनेरला आली. कमळ्या सरडोक गोंधळी व दामा नामा गोंधळी यांना पोलिसांनी पकडून मारहाण सुरू केली. गावात दहशत बसवण्यासाठी मिळेल त्या लहान-थोरांना  पकडून पोलीस मारहाण करीत होते. हे वृत्त पेझारीचे देशभक्त नारायण नागू पाटील यांना समजले तेव्हा ते चिरनेरला आले.  त्यानंतर मारहाण बंद झाली. घटनेची चौकशी करण्यासाठी कलेक्टर चिरनेरला पोहोचले. सरकारी पोलीस व सरकारी अंमलदाराचा अंत्यविधी  पनवेल येथे झाला व सत्याग्रही हुतात्म्यांना मिरवणुकीने मुळेखंडच्या देशभक्त जनार्दनबुवाच्या भजनाच्या निनादात  वाजत गाजत उरण कोटाच्या स्मशानभूमीवर  अंत्यसंस्कार करण्यात आला.

लेखक : चंद्रकांत शहासने.पुणे
(देशभक्तकोशकार).
मो. ९८८१३७३५८५
close