प्रकाश मुंडे | बीड जिल्हा प्रतिनिधी:-
सतत सुरु असलेल्या संततधार व मुसळधार अतिवृष्टीच्या पावसाने वडवणी तालुक्यात सर्वदूर पिकांचे व सार्वजनिक मालमत्तांचे अतोनात नुकसान झाले आहे.
अगोदरच आपल्या शेतमालाला भाव मिळत नसल्याने बळीराजा हतबल झालेला आहे यात परत निसर्गाच्या लहरीपणामुळे तो आणखीच मेटाकुटीला आलेला आहे.
त्यात शासनाने व प्रशासनाने शेतातील पिकांच्या नुकसानीच्या पंचनाम्यांचा फार्स न करता माजलगाव विधानसभा मतदारसंघातील माजलगाव, धारुर व वडवणी या तिन्ही तालुक्यात तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करुन सर्व नुकसानग्रस्त शेतकर्यांना सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये तातडीची मदत द्यावी, वाहून गेलेले रस्ते व पुले यांची दुरुस्ती करावी अशी मागणी भाजपाचे नेते रमेश आडसकर यांनी केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, वडवणी तालुक्यात मागील तीन दिवसांपासून परत एकदा मुसळधार पावसाने थैमान घातले असून याठिकाणी दुसऱ्यांदा ढगफुटीसदृश्य अतिवृष्टी झाल्याने सर्वत्र हाहाकार माजला आहे. तालुक्यातील सर्व नदी, तलाव, धरण ओव्हरफ्लो झाले आहेत तर काही ठिकाणी पुलांवरुन पाणी जावू लागल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे तर काही ठिकाणी रस्ते व पुलेच वाहून गेले आहेत. शेतातून निघालेली कपाशी भिजू लागली आहे. तर अनेक ठिकाणी कपाशीचे बोंड सडण्याचे तसेच काळवंडण्याचे प्रमाण वाढले आहे. काही ठिकाणी शेतात पाणी साचत असल्याने कपाशीची वाढ खुंटली आहे.
सोयाबीनच्या पिकाला बोंड फुटली आहेत तर शेंगा सडून गेल्या आहेत. सतत पाऊस व ढगाळ वातावरण राहात असल्याने व हवेतील आर्द्रतेमुळे विविध रोगांचा राहिलेल्या पिकांवर प्रादुर्भाव दिसून येत आहे. सतत सुरु असलेल्या संततधार व मुसळधार अतिवृष्टीच्या पावसाने वडवणी तालुक्यात सर्वदूर पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. अगोदरच आपल्या शेतमालाला भाव मिळत नसल्याने बळीराजा हतबल झालेला आहे यात परत निसर्गाच्या लहरीपणामुळे तो आणखीच मेटाकुटीला आलेला आहे.
त्यात शासनाने व प्रशासनाने शेतातील पिकांच्या नुकसानीच्या पंचनाम्यांचा फार्स न करता माजलगाव विधानसभा मतदार संघातील माजलगाव, धारुर व वडवणी या तिन्ही तालुक्यात तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करुन सर्व नुकसानग्रस्त शेतकर्यांना सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये तातडीची मदत द्यावी, अतिवृष्टीमुळे तालुक्यातील काही ठिकाणी वाहून गेलेले रस्ते व पुले यांची तात्काळ दुरुस्ती व्हावी अशीही मागणी भाजपाचे नेते रमेश आडसकर यांनी केली आहे.

