shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

भारतीय क्रिकेटमध्ये कोहलीचे वर्चस्व अबाधीत राहणार ?


                     भारताचा सर्वात यशस्वी कसोटी कर्णधार, जगातील नामवंत फलंदाजांपैकी एक प्रतिभावान खेळाडू, आक्रमकपणा हा प्लस पाँईट असलेला विराट कोहली भारतीय क्रिकेटमध्येच नव्हे तर जागतिक क्रिकेटमध्येही मोठी लोकप्रियता मिळवून आहे. त्याच्या याच लोकप्रियतेचा फायदा त्याला आर्थिक दृष्टया सक्षम बनण्यात झाला. जाहीराती, विविध क्षेत्रात ब्रँड अम्बॅसॅडर, मार्केटींग, ऑफिशिएल ब्रँडीग यांच्या आधारे त्याने कोट्यावधींची संपत्ती जमवली. त्याचे वार्षिक उत्पन्न तोंडात बोट घालायला लावणारे असून ते तब्बल ४२५ कोटींच्या घरात आहे.

                       

भारताचं वनडे, टि२० व कसोटी या तीनही प्रारुपांच्या संघाचं नेतृत्व आजही त्याच्याकडे असल्यामुळे व काही वर्षांपूर्वी त्याचा खेळही इतरांपेक्षा सरस ठरत असल्याने त्याच्याकडे अमर्याद अधिकार आले. संघासाठी कोणता कोच हवा, कोणता खेळाडू संघात असावा, कोणाला अंतिम संघात खेळवाचे, कोणाला वगळायचे, वरीलपैकी कोणत्या प्रारूपांसाठी कोण उपकर्णधार असावा हे सर्व तोच ठरवायचा. बीसीसीआय देखील त्याच्या मर्जी नुसार वागत असल्याने त्याचे वर्चस्व वाढतच गेले. संपूर्ण भारतीय संघावर मालकी असल्यासारखे तो वागू लागला. वरिष्ठ खेळाडूंनाही तो त्यांच्या मानाप्रमाणे वागणूक देत नाही. कोणत्याही नवोदित खेळाडूस तो संघात स्थिरावू देत नाही. मनमानी करणे ही त्याची सवयच बनले. इतकेच नाही तर विरोधी संघांना कमी लेखणे हे त्याचे नेहमीचेच झाले. त्याचा फटका भारतीय संघाला सातत्याने बसत आला असून त्याच्याच नेतृत्वाखाली भारताची कसोटीतील निच्चांकी धावसंख्या असून सर्वात मोठे पराभवही त्याच्या कर्णधारपदाच्या कातखंडातच भारताला बघायला मिळाले आहेत.
                       
 त्याची भारतीय क्रिकेटमध्ये एकाधिकार शाही वाढत असून त्याला त्याच्यापेक्षा वरचढ कोणी असूच नये असे दर्शविणारा पुरावा नुकताच एका अधिकृत सुत्राने दिला असून त्यासंबंधीचे वृत्त जवळ जवळ सर्व वृत्तपत्रे, प्रसिद्धी माध्यमे व समाज माध्यमात प्रसिद्ध झाले आहेत.
                           
कोहलीचे कर्णधार म्हणून आयसीसी स्पर्धात अतिशय खराब रेकॉर्ड असून तीच गत आयपीएल स्पर्धात आहे. आयपीएल मध्ये सर्वात यशस्वी कर्णधार व फलंदाज असलेला मुंबईचा रोहीत शर्मा भारताचा सफेद चेंडूच्या खेळात उपकर्णधार आहे. शिवाय कोहलीच्या गैरहजेरीत त्याचे नेतृत्व कोहलीपेक्षाही उजवे ठरले असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट दिसते. शिवाय तो संघाचा तिनही प्रारूपांतील नियमीत व भरवशाचा सलामीवीर आहे. तोच रोहीत कोहलीला संघाचा उपकर्णधार नको होता. त्याला त्याच्या मर्जीतील व त्याच्या शब्दाच्या पुढे जाणार नाही असे केएल राहुल व रिषभ पंत अनुक्रमे वन डे व टि२०च्या उपकर्णधारपदी हवे होते. त्या आशयाची मागणी त्याने बीसीसीआय व निवड समितीकडे केली होती. ती मात्र फेटाळण्यात आली.
                        
कोहलीला फलंदाजी कोच म्हणून राहुल द्रविड, गोलंदाजी कोच झहीर खान, प्रशिक्षक म्हणून अनिल कुंबळे हे भारताचे सर्वात यशस्वी खेळाडू व शिस्तबद्ध प्रशासक नको होते. त्याला त्याच्या सोयीचे रवी शास्त्री, भरत अरूण, आर. श्रीधरन, विक्रम राठोड सारखे प्रशिक्षक संघासाठी निवडले.कोहली संघातील खेळाडूंना सामना संपल्यानंतर सहजासहजी भेटत नाही. खेळाडूंना त्यांच्या संकटसमयी अर्ध्यावरच सोडून देतो. या सारख्या अनेक बाबी सदर वृत्तात प्रसिद्ध झाल्या आहेत. 

                      
कोहलीच्या वाढत्या अरेरावी, मनमानी व एकाधिकारशाहीच्या बाबी बीसीसीआय पर्यंत पोहोचल्याने मागील सहा महिन्यांपासून बीसीसीआयही त्यांचे पंख छाटण्याचे ठरवून होते. त्याचाच एक भाग म्हणून बीसीसीआयने माजी विश्वविजेता कर्णधार महेंद्रसिंग धोनीला आगामी टि२० वर्ल्ड कपसाठी संघाचा मेंटॉर म्हणून नियुक्त केले व संघ निवड करताना युएईतील परिस्थितीला अनुकूल असा संघ निवडला.
                        
आपले नेतृत्व काढून घेतले जाणार असल्याची कुणकुण लागलेल्या कोहलीने त्याच्या आधीच टि२० वर्ल्ड कप नंतर टि२० चे नेतृत्व सोडणार असल्याचे जाहीर करून स्वतःच गुगली टाकली.
मात्र कोहलीच्या वनडे संघाच्या कर्णधार पदावरही गंडांतर येण्याची शक्यता असून कसोटीत त्याचे नेतृत्व अबाधीत राहू शकते परंतु तेथेही प्रशिक्षक म्हणून अनिल कुंबळेची पुन्हा नियुक्ती होण्याची शक्यता असून कोहलीच्या एकाधिकारशाहीला शह देण्याचे कामही बीसीसीआय ईमानेइतबारे करणार असल्याचे संकेत मिळाले आहे.
लेखक : -  
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक. 
इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत. 
Email:  dattavighave@gmail.com
close