आज सर्व मानवजात कोरोना सारख्या आजाराशी सामना करून नुकतीच सावरत आहे.कोरोनाशी दोन हात करण्यासाठी संपूर्ण मानवजात सक्षम व्हावी म्हूणन जगभरासह आपल्या देशात आणी महाराष्ट्रात युद्धपातळीवर कोविड लसीकरण सुरु आहे.
सद्या लसीचा पुरवठा वाढल्या कारणाने गावोगावी लसीकरणाचा वेग वाढावावा लागत आहे.अशा परिस्थिती मध्ये कोविड लसीकरण करतांना पूर्ण दिवस लसीकरणामध्ये व्यस्त असल्या कारणाने इतर कामे करतांना कर्मचाऱ्यांची दमछाक होत आहे.अशा बिकट परिस्थिती मध्ये मात्र अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील आरोग्यवर्धिनी उपकेंद्र वऱ्हाच्या आरोग्य सेविका श्रीमती.वैशाली कांबळे मात्र मानवतेची सेवा या भावनेने प्रेरित होऊन आपल्या कार्यक्षेत्रात उल्लेखनीय काम करत आहेत.
वऱ्हा ग्रामस्थांमध्ये सुरवातीला कोविड लसीकरण बाबत उदासीनता होती परंतु श्रीमती.कांबळे यांच्या लसीकरण जनजागृतीमुळे व गावातील लहानथोरांप्रति असणाऱ्या समन्वयामुळे 5000 लोकसंख्या असलेल्या वऱ्हा गावात कोविड लसीकरणाचे 3300 लक्ष्य असतांना 2500 ग्रामस्थांनी लसीकरणाचा लाभ घेऊन पूर्ण गावाच्या 75% लसीकरण आज रोजी पूर्ण झाले आहे.
लसीकरण सोबत इतर कामामध्ये देखील त्यांचे कार्य उल्लेखनीय असून आज वऱ्हा येथे कोविड लसीकरणाचे 150 डोजेज पूर्ण झाल्यानंतर श्रीमती.कांबळे यांनी माळेगाव येथील अशा वर्कर श्रीमती.हिंगमिरे यांना सोबत घेऊन सायंकाळी कुटुंबनियोजन शस्त्रक्रिये साठी लाभार्थ्यांना प्रवृत्त करण्यासाठी माळेगाव गावापासून शेतात / जंगलात एक मैल दूर असणाऱ्या जेथे कुठलेही वाहन जात नाही अशा धनगर बेड्यावर चिकलात पायी जाऊन तेथील महिलेला कुटुंबनियोजन शस्त्रक्रियेसाठी प्रवृत्त करून त्या कुटुंबातील इतर सदस्यांना कोविड लस घेण्यासाठी प्रवृत्त करून एक मानवतेचा वसा जपला.
जणसामान्याना ह्रदयस्पर्शी आरोग्य सेवा देऊन श्रीमती.कांबळे यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व ग्रामस्थांच्या मनात आदराचे स्थान निर्माण केल्यामुळे त्यांच्या मध्ये फ्लॉरेन्स नाइटिंगेल या महान परिचारिकेची छबी निदर्शनास येत आहे.

