सण आला पोळ्याचा
अवस असे आगळी
बळीराजाच्या घरात
सजे आमची दिवाळी
बैल ना लेकरे आम्ही
आई आम्हां ओवाळी
अभ्यंग स्नान दिवाळी
जोरात चाले आंघोळी
शिंग अंग सजवलेले
बाशींग छान कपाळी
तो खाई भाकर शिळी
आम्हांस पुरण पोळी
झुल आम्हांस भरजरी
माया त्याची ही भोळी
बायकोच्या अंगावरती
फाटके लुगडे चोळी
कर्जाचा वाढता बोझा
राजाच्या हाती झोळी
तरीही बाप उत्साही
ममता भलती खुळी
- हेमंत मुसरीफ पुणे.
9730306996
www.kavyakusum.com


