shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

नगरचा विशाल गणेश आठशे वर्षांहूनही जुना..!!

नगर : शहराचं ग्रामदैवत व अवघ्या नगरकरांचे आराध्यदैवत असलेला माळीवाड्यातील श्री विशाल गणेश किमान आठशे वर्षांपासून अस्तित्वात आहे. तेराव्या शतकातील त्याच्या अस्तित्वाचे पुरावे मोडी लिपीत मिळाले आहेत. पण, या गणेशाच्या अस्तित्वाचे धागेदोरे त्यापेक्षाही जुने म्हणजे हजार वर्षांपर्यंत जात असल्याची माहिती ही कागदपत्रे उघड करणारे नगरमधील उद्योजक व हॉटेल व्यावसायिक विनायक नामदेवराव कोके पाटील यांनी "शिर्डी एक्सप्रेस"शी बोलताना व्यक्त केली.


पुरातत्त्व विभागाने आधुनिक पद्धतीने या भव्य गणेश मूर्तीचे आयुर्मान शोधावं, अशी मागणीही त्यांनी केली आहे. या आधी विशाल गणेशाचा इतिहास दीडशे वर्षांपर्यंतच जात होता. आता तो थेट आठशे वर्षांहून अधिक जुना असल्याचं कागदपत्रांच्या आधारे स्पष्ट होत असल्यानं नगरकरांचं आराध्य दैवत आता नगरकरांसाठी प्राचीन मौल्यवान ठेवाही ठरला आहे.

मोडीतील कागपत्रांचं केलं रूपांतर

कोके पाटील यांना आपल्या घरात मोडी लिपीतील काही कागदपत्रं १९९२ मध्ये सापडली. ती त्यांनी दोनच दिवसांपूर्वी मोडीचे जाणकार असलेले ऐतिहासिक वस्तु संग्रहालयातील नारायण आव्हाड यांच्याकडून देवनागरी लिपीत करवून घेतली. त्यानंतर हा सर्व उलगडा झाला. विशाल गणेशाच्या इतिहासाचा इतका जुना इतिहास पाहून ते आश्चर्यचकित झाले. माळीवाड्यात राहणाऱ्या कोके पाटील घराण्याचा इतिहास सुमारे ८३० वर्षांपासूनचा आहे. सन ११९१ पासूनच्या या घराण्याच्या इतिहासाची माहिती त्यांच्याकडे कागदपत्रांसह उपलब्ध आहे. त्यातच विशाल गणपती मंदिरासंदर्भातील कागदपत्रंही आहेत.

मंदिर खर्चाच्या कागदपत्रांमुळे झालं प्राचिनत्व उघड

ही कागदपत्रं या गणेशाच्या पूजा-अर्चा व दिवाबत्तीसाठी लागणाऱ्या खर्चाची तरतूद म्हणून देण्यात आलेल्या दहा बिघे (साडेसात एकर) इनामी जमिनीसंदर्भातील आहेत. या कागपत्रांतील सर्वात जुना उल्लेख सन १२२७ मधील आहे. त्या कादगदपत्रांनुसार या जमिनीचा संपादनकर्ता कोण, याची माहिती त्यावेळी अस्तित्वात नाही. म्हणजेच विशाल गणेश त्याआधीपासून अस्तित्वात असल्याचा हा पुरावा आहे. त्यावेळचे या जमिनीचे वहिवाटदार धोंडो भवानी हे पुजारी आहेत. त्यावेळचा माळीवाड्याचा उल्लेखही मौजे मालीवाडा असा आहे. याच कागदपत्रांत सन १२२७ मध्ये ही जमीन मन भट बीन राधो भट करीत असल्याचा उल्लेख आहे. त्या जमिनीचा मूळ मालक कोण, त्याच्याशी मन भट याचं नातं काय, हे माहिती नसल्याचंही कागदपत्रांत म्हटलं आहे. ही कागदपत्र ८ मार्च १८५४ रोजी तयार करण्यात आल्याचाही उल्लेख त्यात आहे. ही कागदपत्रे तयार करणाऱ्यानं नगरचा उल्लेख नगर हवेली असाही केला आहे.

निजामशाहीपेक्षाही शेकडो वर्षे मूर्ती जुनी

तशी नगर शहराची स्थापना अहमद निजामशहाने सन १४९० मध्ये केली असली, तरी  त्याच्याही आधी चार-पाचशे वर्षांपासून विशाल गणेशाचं अस्तित्व होतं. त्यानंतर निजामशाही व त्यानंतर ब्रिटिश सरकार आलं. त्याआधीपासून विशाल गणेशाचं कृपाछत्र नगर शहरावर होतं, हे या कागदपत्रांवरून स्पष्ट होतं. त्यांत या गणेशाची स्थापना कोणी केली? त्याचं मंदिर कसं होतं, याबद्दल कोणतीही माहिती मिळत नाही.

उजव्या सोंडेचा श्री विशाल गणेश

नगरचा श्री विशाल गणेश सव्वा अकरा फूट उंच व सुमारे सात फूट रुंद आहे. पूर्ण एका पाशाणात घडवलेल्या या मूर्तीचं खरं रेखीव स्वरूप काही वर्षांपूर्वी त्याचा शेंदूर काढल्यानंतर उघड झालं. विशाल गणेशाचं जुनं मंदिर बैठं होतं. त्यावर कळस नव्हता. आता जे विशाल मंदिर उभारण्यात आलं आहे, त्याची कळसापर्यंतची उंची ७५ फूट आहे. या नवीन मंदिराचं काम अजून सुरू आहे. पूर्वाभिमुखी, चतुर्भुज, तसेच उजव्या सोंडेचा असलेल्या या गणपतीने बेंबीत आत्मलिंग व त्यावर नागफणी धारण केलेली आहे. उजव्या सोंडेची गणेशमूर्ती तंत्रविद्येसाठी पूजली जाते. त्यामुळे हे स्थान जागृत असल्याचं भाविकांचा अनुभव आहे. नगरमधील हजारो भाविक असे आहेत, की ते दिवसाची सुरुवात विशाल गणेशाचं दर्शन केल्याशिवाय करीत नाहीत. या मूर्तीचं वैशिष्ट्य म्हणजे, डाव्या हातात मोदक व उर्वरित तीनही हात आशीर्वाद स्थितीत आहेत. एकाच वेळी तीन हातांनी आशीर्वाद देणारी अशी दुर्मिळ मूर्ती अन्य कोठेही नाही. मूर्तीच्या डोक्यावर त्रिशूळ आहे. हीही बाब वैशिष्ट्यपूर्ण आहे. जागृत देवस्थान म्हणून श्री विशाल गणेश प्रसिद्ध आहे. त्याची प्रचिती भाविकांना नेहमी येत असल्याचे अनुभव ते सांगत असतात.  

नाथ पंथीय पूजेची परंपरा

श्री विशाल गणेशाची नाथपंथीय पूजापरंपरा आहे. अशी परंपरा असलेलं गणेश मंदिर कदाचित देशात एकमेव असावं. आता मंदिराचे पुजारी म्हणून संगमनाथ महाराज काम पाहत आहेत. त्यांचे गुरू (स्व.) गेंडानाथ महाराजांच्या आधीपासूनच गणेशाच्या पूजेची नाथपंथीय परंपरा चालत आली आहे. नाथ परंपरे नुसार गणपती हा नवनाथांन पैकीच सहावा नाथ असल्याचे मानले जाते. त्या मुळेच नाथपंथीय मंत्रोच्चारानुसार रोज सकाळी व संध्याकाळी श्री विशाल गणेशाची पूजा केली जाते. या विशाल गणेश मूर्तीच्या खाली नाथसंप्रदायाची समाधीही आहे.

कोके पाटील मोडीतील कागपत्रं देणार मंदिराला

कोके पाटील यांच्याकडे त्यांच्या पूर्वजांनी माळीवाड्यातील लक्ष्मीआई मंदिरासाठी अर्धा बिघा जमीन (१५ गुठे) बक्षीस म्हणून दिल्याचीही कागदपत्रं आहेत. गणेशासंदर्भात मोडी लिपीतील मूळ कागदपत्रे व देवनागरीत रूपांतर केलेली कागदपत्रं विनायक कोके पाटील गणेशोत्सवात श्री विशाल गणेश मंदिराचे पुजारी संगमनाथ महाराजांकडे विधीवत सुपूर्द करणार आहेत. ही कागदपत्रे पाहण्याची इच्छा असणाऱ्यांनी वाडियापार्क येथे विनायक कोके पाटील (फोन 
नंबर – ९९२२६६३४९३) आणि प्रसाद कोके पाटील (फोन नंबर- ९९२२१४१००१) यांच्याशी संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
close