भारताचा इंग्लंड दौरा पाचवा कसोटी सामना न खेळता नियोजित कार्यक्रमाच्या अगोदरच संपन्न झाला आणि खेळाडू लगोलग युएईला पोहोचले देखील ! येत्या १९ सप्टेंबर पासून संस्थगित असलेल्या आयपीएल -१३ चा दुसरा भाग युएई मध्ये होणार असल्याने युएई सरकारच्या नियमानुसार बाहेरील देशातून येणाऱ्या नागरिकांना किमान सहा दिवसांचा सक्तीचा व कडक असा कॉरन्टाईन करावा लागतो.
भारताचा इंग्लंड दौरा शेवटचा मॅनचेस्टर कसोटी सामना न खेळताच आटोपला आता हे सर्वश्रूत झाले आहे. कोविडने संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री, गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरूण, क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आर. श्रीधरन व सहाय्यक फिजियो डॉ. योगेश परमार कोरोना संक्रमित आढळले. तर त्यांच्या संपर्कातील प्रमुख फिजियो डॉ. नितिन पटेल सुदैवाने बचावले. परंतु त्यांना सक्तीने आयसोलेशनमध्ये जावे लागले.
भारताचा संघ जैव सुरक्षा कवच (बायो बबल) मध्ये असताना हा कोविडचा विषाणू भारतीय संघाच्या ड्रेसिंग रूम पर्यंत पोहोचला कसा ? त्याला जबाबदार कोण ? या गोष्टींचा शोध घेण्यात बराच काथ्याकूट होऊन गेला.
ही गोष्ट आहे ३१ ऑगष्ट २०२१ ची. भारत व इंग्लंड यांच्यातील ओव्हल येथील चौथा कसोटी सामना सुरू होण्यापूर्वी भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्या " स्टारगेजिंग द प्लेयर्स इन माई लाइफ " या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याचा कार्यक्रम लंडनमध्ये संपन्न झाला. या कार्यक्रमाला भारतीय संघातील सर्व सदस्य व इतरही काही मान्यवर, निमंत्रीत व आगुतंक हजर होते.
सर्व जगभर कोविड १९ व त्यानंतरच्या कोविडच्या इतरही व्हेरिएंटने हाहाकार माजवला असला तरी इंग्लंडमध्ये तेथील सरकारने कोविड संदर्भात असलेले मास्क, सोशल डिस्टन्सस व सॅनिटायझिंग बाबतचे सर्व निर्बंध हटविले आहे. कोणी कुठेही वरील नियम न पाळता बिनधास्त हिंडू फिरू शकते. तेथील सर्व खाजगी, सरकारी कार्यालये व इतर आस्थापने देखील खुलेआम चालू आहे. शिवाय आपण सर्वांनी बघितले आहे की, इंग्लंड मध्ये नुकत्याच झालेल्या युरो चषक फुटबॉल व विम्बल्डन स्पर्धेलाही प्रेक्षक पूर्ण मैदान क्षमतेने हजर होते. इतकेच नाही तर भारत - इंग्लंड कसोटी मालिकेतील चारही सामन्यांना स्टेडीयम प्रेक्षकांनी ओसंडून वाहत होते.
शिवाय इंग्लिश क्रिकेट बोर्डाने या कसोटी मालिकांसाठी बनवलेले बायो बबलही सख्त नव्हते. खेळाडू सहजपणे बाहेर जाऊ शकत होते. बाहेरून जेवणही बबल मध्ये जात होते. शिवाय इंग्लंडने प्रत्येक सामन्यासाठी संघात काही ना काही बदल केले होते. त्यांच्या संघात येणारे नवे खेळाडू बाहेर सुरक्षित वातावरणात खरंच राहात असतील का ?
रवी शास्त्रीने स्वतःच्या पुस्तकाचे आयोजन तेथील स्थानिक जबाबदार अधिकाऱ्यांच्या मदतीनेच केले असणार ? भारतीय संघाच्या व्यवस्थापकांची लिखित नसली तरी मुक संमती असणारच ना ? रवी शास्त्रीने कुणावर बंदूक लावून कार्यक्रमाला याच असा धाकही दाखविला नसणार ? मग या कार्यक्रमाला आलेल्या प्रत्येकाने आपल्या जीवीताची काळजी घेणे ही स्वत:ची जबाबदारी नाही का ? रवी शास्त्रीला वाटत होते का संघातील खेळाडूंना कोविड व्हावा ? रवी शास्त्रीने काय भारतातून कोविड विषाणू नेले होते व नेमक्या त्याच कार्यक्रमात ते बाहेर काढले ? मग अशा वेळी इतर सर्व घटक खास करून ब्रिटीश सरकार, इंग्लिश क्रिकेट बोर्ड या गोष्टीला जबाबदार असताना एकट्या रवी शास्त्रीलाच जबाबदार का धरले जाते ?
शिक्षा करायचीच तर पहिली ब्रिटीश सरकारला करायला हवी. जेमतेम साडेसहा कोटींच्या देशात दररोज ३०-४० हजार कोविड रुग्ण सापडत असताना एवढे सगळे निर्बंध उठविण्याची गरज काय होती ? कशासाठी एवढी सुट दिली ?
हो, रवी शास्त्रीची एक गोष्ट मात्र चुकली. त्यांना पुस्तकाचे प्रकाशन करायचेच होते तर त्यांनी शेवटच्या कसोटी पर्यंत थांबून मॅनचेस्टर कसोटीच्या शेवटच्या दिवशी सामना व मालिका जिकंल्यानंतर हा प्रकाशन सोहळा केला असता तर तो दुग्धशर्करा योग झाला असता. शिवाय आज त्यांच्यावर जी जगभर टिकेची राळ उठली ती ही उठली नसती. पर्यायाने त्यांना कुणी व्हिलनही ठरवू शकले नसते.
लेखक : -
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक.
इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत.
Email: dattavighave@gmail.com


