भारत व इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांची मालिका पाचवा सामना सुरू होण्यापूर्वीच रद्द करण्यात आला. तत्पूर्वी भारत मालिकेत २-१ असे आघाडीवर होते. त्यामुळे पाचवा कसोटी सामना भारताला सामना जिंकणे अथवा अनिर्णित राखणे एवढेच गरजेचे होते. तसेच इंग्लंडला सामना जिंकून मालिका बरोबरीत राखण्याची संधी होती.
सदर मालिका दुसऱ्या विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा भाग असल्याने या मालिकेत मिळणारे गुण दोन्ही संघासाठी तितकेच महत्वाचे आहेत. त्यामुळे खास करून पिछाडीवर असलेल्या इंग्लंडच्या दृष्टीने सामना रद्द होणे नुकसान दायकच आहे. कारण पहिल्या डब्ल्यूटीसी चँपियनशिप स्पर्धेत केवळ एका विजयामुळे इंग्लंडला अंतिम फेरीला मुकावे लागले होते. मात्र आयसीसीने अधिकृतपणे या सामन्याचा निकाल अद्यापही जाहीर न केल्यामुळे अनिश्चिततेचे वातावरण आहे. परंतु दोन्ही देशाच्या क्रिकेट मंडळांनी सदर सामना रद्द होण्याचे मुख्य कारण असलेल्या कोविड-१९ च्या संक्रमणामुळे सामना रद्द करण्यास सहमती दर्शवली आहे.
भारत व इंग्लंड यांच्यातील ओव्हल येथील चौथा कसोटी सामना सुरू होण्यापूर्वी भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्या "स्टारगेजिंग द प्लेयर्स इन माई लाइफ " चा पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याचा कार्यक्रम या सर्व उद्योगाचे प्रमुख कारण आहे.इंग्लंडमध्ये कोविड-१९ संदर्भात पाळले जाणारे मास्क, सोशल डिस्टन्स, सॅनीटाईझिंग वगैरे कुठलेही नियम पाळले जात नाहीत. शिवाय दोन्ही संघासाठी बायो बबल सिरीयसली अवलंबिले जात नाही. त्यामुळे रवी शास्त्रींने पुढील धोक्याची कोणतीही पर्वा न करता सदर प्रकाशन सोहळ्यासाठी सर्व भारतीय खेळाडू व इतर स्टाफ मेंबर्सला घेवून खुलेआम पुस्तक प्रकाशन सोहळा पार पाडला.
मात्र हाच प्रकाशन सोहळा नंतर घडलेल्या सर्व गोंधळाचे मुख्य कारण ठरले. मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री या कार्यक्रमानंतर कोरोना बाधीत झाले. त्याच बरोबर त्यांचा अति निकट असलेले गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरूण, क्षेत्ररक्षण प्रशिक्षण आर. श्रीधरन व फिजिओ डॉ. नितीन पटेल यांना आयसोलेशन मध्ये हरविण्यात आले. हे सर्व घडले ते ओव्हल कसोटीच्या चौथ्या दिवशी. सुदैवाने बॅटींग कोच विक्रम राठोड सुखरूप राहील्याने संघाला महत्वाच्या व निर्णायक क्षणी आधार देण्यास उपलब्ध होते. त्यामुळे भारताला इंग्लंडला हरविण्यात विशेष संघर्ष करावा लागला नाही.
वास्तविक पहाता रवी शास्त्रीचा पुस्तक प्रकाशन सोहळा दौरा सुरू असताना आयोजित करणे अजिबात गरजेचे नव्हते. कारण इंग्लंड मध्ये कोविड संदर्भातील नियम पाळले जात नसले तरी तेथे रुग्णांची संख्या वाढतच आहे. इंग्लंड दौऱ्यावर भारतीय संघ क्रिकेट खेळण्यास गेला आहे. खाजगी कार्यक्रम व मौजमजेसाठी नाही. डब्ल्यूटीसी फायनल नंतरही खेळाडूंना २१ दिवसांची सुट्टी दिली होती. तेंव्हाही रिषभ पंत व इतर ४ जण कोविड पॉझिटीव्ह आढळले होते. एवढया मोठया संकटाला टाळल्यानंतरही संघाच्या मुख्य प्रशिक्षक व कर्णधाराला शहाणपण येऊ नये यासारखा मुर्खपणा दुसरा कोणताही असू शकत नाही.
मँचेस्टरचा पाचवा व महत्वाचा सामना सुरू होण्यापूर्वी एकमेव सहाय्यक प्रशिक्षक डॉ. योगेश परमारही कोरोना बाधित आढळले व त्यांच्या संपर्कात संघातील रोहीत शर्मा, रवींद्र जडेजा, चेतेश्वर पुजारा, मोहम्मद शमी, ईशांत शर्मा व इतर काही खेळाडू असल्याने सर्वच संघाचे धाबे दणाणले त्यामुळे भिती पोटी खेळाडू कसोटी खेळण्यास तयार नव्हते.या सामन्यानंतर लगेच युएईत आयपीएलचे आयोजन असल्याने खेळाडू, फ्रँचाईसीज व बीसीसीआय संभ्रमात सापडले. शेवटी कसोटी सामना न खेळण्याचा निर्णय घ्यावा लागला.
आता आयसीसी काय निर्णय घ्यायचा तो घेईल पण भारतीय संघाने सर्वच प्रकारे दक्षता घेणे गरजेचे आहे. कारण इंग्लंडमध्ये दोनदा व श्रीलंकेत जुलै महिन्यात दोनदा वाईट अनुभव भारतीय खेळाडूंना आला आहे. तेव्हा नियम धाब्यावर बसविणे जीवावर सुद्धा बेतू शकते. म्हणून संकटाशी खेळणे टाळणे हेच योग्य ठरेल.
लेखक : -
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक.
इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत.
Email: dattavighave@gmail.com

