अंकुश जाधव एक सामान्य व्यक्ती ते तालुक्याचे सभापती.
अंकुश जाधव यांचा जीवन प्रवास दर्शवणारा अभिष्टचिंतन निमित्त विशेष लेख.
इंदापूर प्रतिनिधी:(५ सप्टेंबर २०२१) इंदापूर तालुक्यातील राजकीय क्षेत्रात अग्रगण्य नाव असणारे निमगाव केतकी येथील अंकुश कोंडीबा जाधव यांचा आज ६५ वा अभिष्टचिंतन दिन. यानिमित्त त्यांना विविध स्तरातून अनेकाकडून शुभेच्छा मिळत आहेत. त्यांच्या अभिष्टचिंतन दिवसानिमित्त त्यांच्या जीवन प्रवासातील प्रेरणादायी यशस्वी घडामोडी.
निमगाव केतकी येथील शेतकरी कुटुंबातील अंकुश कोंडीबा जाधव यांचा जन्म ५ सप्टेंबर १९५६ साली झाला असून यांचे वडिलांचे नाव कोंडीबा व आईचे नाव द्रोपदाबाई असे आहे. त्यांचे तीन भाऊ भिमराव, सर्जेराव आणि देवराज हे असून सर्व जण एकमेकांच्या विचारांनी राहत. वडील कष्टाळू आणि प्रामाणिक स्वभावाचे होते त्यांच्या या स्वभावातून या जाधव कुटुंबातील या भावंडांनी शेती आणि स्वतः कष्ट करून आपला परिवार सक्षम बनवला.
अंकुश जाधव यांचे शिक्षण पाचवी पर्यंत झाले असून त्यांनी शिक्षण सोडल्यानंतर वडिलांबरोबर शेती करीत असताना गवंडी काम करू लागले. हे काम अत्यंत कष्टाचे असूनही जिद्दीने आणि प्रामाणिकपणे ते करीत राहिले व प्लास्टर ,सेंट्रींग या व्यवसायात यशस्वी होत गेले. पुढे त्यांनी स्वतः प्रामाणिक असा बांधकाम व्यवसाय चालू केला. त्यांच्या या वाढत्या कामामुळे त्यांची व्यवसायिक आणि आर्थिक परिस्थिती मध्ये प्रगती होत गेली. आणि त्यांनी प्रथमच जुनी ट्रक खरेदी करून बांधकाम साहित्य वाहतुकीसाठी उपयोगात आणली. अशा या कष्टाळू स्वभावातून यांनी आपल्या जीवनामध्ये प्रगती करण्यास सुरुवात केली व ती सुरुवात त्यांच्या जीवनातील यशस्वी बदल घडवणारी ठरली.
*राजकीय प्रवास*
पुढे हे करीत असताना १९९५ साली त्यांनी प्रथमच ग्रामपंचायत सदस्य पदी निवडणूक लढवून राजकीय जीवनामध्ये प्रवेश केला. ते पाच वर्ष ग्रामपंचायत सदस्य म्हणून कार्यरत राहिले. यानंतर २०००ते २००५ या काळातही ते सरपंच म्हणून निमगाव केतकी च्या विकासामध्ये कार्यरत राहिले. पुढे ते २००३ मध्ये जिल्हा परिषद सदस्य म्हणून कार्यरत होते. त्यानंतर २००७ मध्ये इंदापूर पंचायत समितीचे प्रथम उपसभापती आणि नंतर दीड वर्ष सभापती म्हणून त्यांनी यशस्वीरित्या कार्यभार सांभाळला. या काळातच त्यांनी माजी सहकार व संसदीय कार्यमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या नेतृत्वाखाली इंदापूर तालुक्यातील विकास कामे विविध माध्यमातून केली. त्यांची ओळख निमगाव केतकी व इंदापूर तालुक्यात हर्षवर्धन पाटील यांचे खंदे समर्थक म्हणून आहे. अंकुश जाधव यांनी हर्षवर्धन पाटील यांच्या बरोबर निरा भिमा सहकारी साखर कारखान्याच्या निर्मितीपासून ते दीर्घकाळ संचालक म्हणूनही कार्यभार केला.
असे सामाजिक राजकीय व कष्टमय जीवनातून यशस्वी जीवन घडविणारे अंकुश जाधव यांनी सर्वसामान्य शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी, बांधकाम गवंडी, ठेकेदार, ग्रामपंचायत सदस्य, सरपंच ,जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती उपसभापती, सभापती व साखर कारखान्याचे संचालक इत्यादी स्वरूपाचे विश्वास दर्शक कार्यभार सांभाळणारे अनुभवी, जानकार, कार्यकुशल नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते.
सर्वसामान्य व्यक्ती ते इंदापूर तालुक्याचे सभापती हा जीवन प्रवास हा त्यांच्या जीवनातला एक अनमोल असा ठेवा सर्वसामान्यांना प्रेरणादायी व कुतुहलाचे आहे.
त्यांच्या या अभिष्टचिंतन दिनानिमित्त निमगाव केतकी इंदापूर तालुका व महाराष्ट्रातील त्यांच्या मित्र परिवारातून त्यांना शुभेच्छाचा वर्षाव होत आहे. त्यांना अभिष्टचिंतन दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा.

