शिर्डी येथील वसंतदादा मल्टिस्टेट संस्थेने अल्पावधीतच बँकिंग क्षेत्रात गरुडझेप घेतली असून उद्या श्री गणेश चतुर्थी च्या शुभ मुहूर्तावर तिसऱ्या कोपरगाव शाखेचे उदघाटन संत, महंत व अनेक प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत होणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष मुकुंद शहाराम सिनगर यांनी दिली. कोविड काळातही आपल्या सभासदांना उत्कृष्ट बँकिंग सेवा देत डिजिटल आणि ऑनलाईन पेमेंट प्रणालीचा वापर करून घरपोहच सेवा देणारी संस्था म्हणून नावलौकिक मिळवत असल्याने आपल्या सभासदांच्या विश्वासास पात्र ठरत आहे.
उद्या होऊ घातलेल्या वसंतदादा मल्टिस्टेट संस्थेच्या कोपरगाव शाखेचे उद्घाटन परम पूजनीय महंत ओंकारसिंह बापू (श्री क्षेत्र मेथी) यांच्या शुभहस्ते होणार असून श्री सत्यनारायण महापूजेचे मानकरी म्हणून निवड झालेले संस्थेचे सभासद सौ.व श्री. भीमा सोमनाथ संवत्सरकर यांच्या शुभहस्ते विधिवत पूजनाने शाखेच्या कामकाजास सुरुवात होणार आहे.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी येवला मतदार संघाचे आमदार मा.नरेंद्र भाऊ दराडे असणार असून प्रमुख उपस्थितीत कोपरगावचे मा.नगराध्यक्ष आदरणीय राजाभाऊ झावरे, लोकनियुक्त नगराध्यक्ष मा. विजय भाऊ वहाडणे, माजी नगराध्यक्ष मा.जगन्नाथ पाटील आढाव, जिल्हा बँकेचे संचालक आदरणीय विकी दादा कोल्हे, जिल्हा बँकेच्या संचालिका सौ.चैताली ताई काळे, मुंबई येथील प्रसिध्द उद्योगपती, संस्थेचे व्हा. चेअरमन मा.राजेश जी धमेजानी, अकोले तालुका शिवसेनेचे युवा नेते, संस्थेचे जेष्ठ संचालक मा.सतिश दादा भांगरे, शिवसेनेचे तालुकाप्रमुख शिवाजी राजे ठाकरे, कलविंदर डडीयाल, रविंद्र कथले आदीसह सर्व शाखांचे स्थानिक संचालक मंडळ प्रमुख मान्यवर म्हणून उपस्थित राहणार आहेत. यावेळी संस्थेच्या वतीने कोविड काळात मदतीचा हाथ देत संस्थेच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणाऱ्या सभासदांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात येणार आहे.
वसंतदादा मल्टिस्टेट संस्थेची अद्यावत ऑनलाईन कोअर बँकिंग प्रणाली असून आपल्या सभासदांना मोबाईल बँकिंग सुविधा व व्यावसायिक सभासदांना QR कोड सुविधा देणारी आपल्या पंचक्रोशीतील एकमेव सहकारी संस्था आहे. संस्थेचा आय.एफ.एस.सी.कोड असल्याने रिअल टाईम पेमेंट ट्रान्सफर करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सहकारी संस्था ह्या फक्त ठेवी स्वीकारणे व कर्जवाटप करणे या चौकटीत न राहता आपल्या सभासदांना आपण अधिक काय देऊ शकतो.
या विचारधारेतून काम करणारे मा.संचालक मंडळ संस्थेच्या पाठीशी भक्कमपणे उभे असल्याने आम्ही प्रामाणिक व तत्पर अर्थसेवा देऊ शकत असल्याची प्रतिक्रिया संस्थेचे सरव्यवस्थापक मा.गणेश वाळुंज यांनी दिली. यावेळी कोविड साथ रोगाबाबत सर्व खबरदारी घेऊन सर्व सभासदांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.

