अहमदनगर । प्रतिनिधी (राधेश्याम कुसमुडे):
महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी अंतर्गत असलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कृषी महाविद्यालय हाळगाव, ता. जामखेड, जिल्हा.अहमदनगर या कृषी महाविद्यालयचा विद्यार्थी कृषीदूत संदेश दिलीप ससाणे याने ग्रामीण कृषी जागरूकता आणि कृषी औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रमा अंतर्गत राहुरी तालुक्यातील वांबोरी येथे असलेल्या पारंपरिक बैलाच्या लाकडी तेल घाण्यातुन तेल काढून प्रात्यक्षिक करत खाद्य तेलाबद्दल जनजागृती केली.
बी एस सी (ऑनर्स ) ऍग्रीकलचर या अभ्यासक्रमात ग्रामीण कृषी जागृती आणि कृषी औद्योगिक कार्यानुभव अंतर्गत प्रात्यक्षिक शिक्षणावर भर दिला जातो.
पूर्वी गावागावात घाणे असायचे, शेतात पिकणारा भुईमूग, करडई, सूर्यफुलापासून तेल काढून तेच वापरले जाई. त्यामुळे आजारांना फारसा थारा नसायचा. काळ बदलला तसा घाणाही मागे पडत गेला आणि घरगुती तेलही. घरोघरी रिफाईन्ड केलेले तेलाचे डब्बे येऊ लागले. स्वस्त आणि मस्त म्हणून वापरही वाढला. याचे व्हायचे तसेच दुष्परिणाम होऊ लागले. स्थुलता वाढली, हृदयविकारासारख्या अनेक आजारांनी घरोघरी ठाण मांडले.
आर्थिक नुकसान होऊन मानसिक त्रास होत गेला. यातच सध्या कोरोनाने थैमान घातलेले आहे म्हणून पुन्हा जुन्या काळातील पाककृतीचे महत्त्व वाढू लागले.कृषीदुताने रिफाइंड तेलाचे आरोग्यावर होणारे हानिकारक दुष्परिणाम आणि लाकडी घाण्यावर काढलेल्या शुद्ध तेलाचे फायदे शेतकऱ्यांशी संवाद साधताना सांगितले.
यावेळी वांबोरी गावचे नवनिर्वाचित सरपंच किरणजी ससाणे, वांबोरी कृषी सहाय्यक कापसे, योगेशजी (बंटी)वेताळ, दिलीपजी ससाणे आणि शेतकरी उपस्थित होते.

