shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

त्यागीच्या अचूकतेपुढे ठरले पंजाब कमजोर ..!



                       तेराव्या आयपीएल सत्राचे दुसरे पर्व सुरू होऊन तिन दिवस झाले. मात्र या तिनही दिवशी प्रेक्षकांना अनपेक्षित निकाल बघायला मिळाले. या पर्वातील पहिल्या सामन्यात चेन्नईने गतविजेत्या मुंबई इंडियन्सला चकीत केल. दुसऱ्या सामन्यात आरसीबीचा केकेआरने एकतर्फी खुर्दा उडविला. तर तिसऱ्या दिवशी गुणतालिकेत सहाव्या -सातव्या स्थानावर असलेल्या पंजाब राजस्थान यांच्यात शेवटच्या चेंडूपर्यंत एक रंगतदार लढत झाली. सामना संपेपर्यंत पंजाबच जिंकेल असे वाटत असताना राजस्थानचा तरणाबांड जलदगती गोलंदाज कार्तिक त्यागीने केवळ चार धावांच संरक्षण करताना पंजाबने जवळ जवळ जिंकलेला सामना अक्षरशः खेचून घेतला. हा थराराक सामना राजस्थानने दोन धावांनी जिंकून गुणतालिकेत आठ सामन्यात आठ गुण मिळवून पाचवे स्थान गाठून आपले आव्हान कायम ठेवले.

                       राजस्थानने दिलेले १८६ धावांचे लक्ष गाठताना पंजाबचे सलामीवीर कर्णधार केएल राहुल व मयंक अग्रवालने ७१ चेंडूत १२० धावांची सलामी दिली. राहुलने ४९ तर मयंकने ६७ धावांच योगदान देत आपले कर्तव्य योग्यरित्या पार पाडले. त्यानंतर निकोलस पुरन ३२ व एडन मार्करम नाबाद २६ यांनी पंजाबला विजयाकडे नेले. मात्र शेवटच्या षटकात दोघेही अव्वल दर्जाचे फलंदाज मैदानात असूनही विजय मिळविण्यात कमी पडले. या दोघांची ५७ धावांची भागीदारी देखील निष्फळ ठरली.
                       कार्तिक त्यागीने टाकलेले अंतिम षटक खऱ्या अर्थाने निर्णायक ठरले. नजर बसलेले निकोलस पुरन व एडन मार्करम यांना शह देण्यात त्यागी यशस्वी ठरला. त्या षटकाचा पहिला चेंडू निर्धाव गेला. दुसऱ्या चेंडूूवर एक धाव निघाली. तिसऱ्या चेंडूवर पूरन बाद झाला. चौथा चेंडू निर्धाव गेला तर पाचव्या चेंडूवर दिपक हुडा शुन्यावरच परतला. शेवटच्या चेंडूवर तीन धावा काढण्याचे लक्ष दबाव वाढल्याने पंजाबला साध्य न करता आल्याने राजस्थान दोन धावांनी विजयी झाले. याच बरोबर आयपीएलमध्ये जवळ जवळ जिंकलेले सामने कसे हरायचे याचे विनामूल्य प्रात्यक्षिकच जणू पंजाबने सादर केले !
                       तत्पूर्वी नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करावी लागलेल्या राजस्थानची सुरुवात चांगली झाली. आरआरकडून आपला पहिलाच सामना खेळणाऱ्या विंडीजच्या एर्विन लुईस व तरूण तडफदार मुंबईच्या यशस्वी जयस्वालने ३६ धावांची पायाभरणी केली. आपला पहिलाच आयपीएल सामना खेळणाऱ्या ईशान पोरेलच्या गोलंदाजीवर सलग चार चौकार ठोकून लुईसने झकास सुरुवात केली मात्र अर्शदिपच्या गोलंदाजीवर तो बाद झाला. परंतु दुसऱ्या बाजूने जयस्वालने आपली यशस्वी झुंज सुरूच ठेवली. इंग्लंडच्या लियाम लिव्हींगस्टोनने छोटेखानी पण झंझावाती २५ धावा बनविल्या.
                       यशस्वी जयस्वालने ३६ चेंडून ४ चौकार व दोन षटकार ठोकून ४९ धावांवर बाद झाला. त्यानंतर रियान पराग चार धावांवरच झाला. मात्र त्यानंतर आलेल्या महिपाल लोमरोरने केवळ १७ चेंडूत ४३ धावा बुलकावत राजस्थानची धावगती कायम ठेवली. या खेळीत त्याने दोन चौकार व चार षटकार तडकावले. त्यानंतर मात्र राजस्थानचे शेवटचे सहा खेळाडू दोन अंकी धावसंख्या सुधा गाठू न शकल्याने राजस्थानला १८५ धावांवरच समाधान मानावे लागले. त्यामध्ये राहुल तेवतीया २, सर्वात महागडा खेळाडू ख्रिस मॉरिस ५, चेतन साकरीया ७ व कार्तिक त्यागी एक धाव यांचा समावेश होता. पंजाबकडून अर्शदिप सिंगने ३२ धावात पाच बळी घेत आपली वैयक्तीक सर्वोत्तम आयपीएल कामगिरी नोंदविली. त्याचबरोबर मोहम्मद शमीनेही ३ बळी घेत आपला दरारा कायम ठेवला. हरप्रित ब्रारनेही दोन फलंदाज माघारी धाडण्यात यश मिळविले.
                         आयपीएल मध्ये केएल राहुल व मयंक अग्रवालची ही पाचवी शतकी सलामी भागिदारी होती, मात्र त्यात ४ वेळा पंजाब पराभूत झाल्याने त्यांच्या भागीदारीला कोणताही अर्थ उरत नाही. या दोघां व्यतिरिक्त इतर फलंदाज जबाबदारीने खेळत नसल्याने पंजाबला जिंकलेली बाजी गमवावी लागत आहे. यासाठी त्यांना काळजीपूर्वक काम करावे लागेल. 
                         दुसरी महत्वाची बाब म्हणजे केएल राहुलला भारताचा भावी कर्णधार म्हणून बघितले जात असल्याने त्याला स्वतःच्या नेतृत्व गुणात अमूलाग्र बदल करावा लागणार आहे कारण सामने जिंकण्याऐवजी हरण्याचे अवगुण त्याच्याकडे सध्या जास्त असल्याने भारतीय संघासाठी ते चांगले नसणार !     

लेखक : -  
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक. 
इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत. 
Email:  dattavighave@gmail.com
close