shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पर्यावरण जनजागरण (९४) आंबा. Mangifera indica.



पर्यावरण जनजागरणाच्यादृष्टीने नक्षत्रवनाचा विचार केल्यास कुंभ राशीच्या पूर्वाषाढा नक्षत्राचा आराध्य वृक्ष आंबा आहे.

आंब्याचा वृक्ष भारतात सगळीकडे आढळतो. २० ते १०० फुट उंच वाढणारा असा हा सदाहरित वृक्ष, याचे खोड  उंच सरळ वाढते. धार्मिक विधीमध्ये आंब्याचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. समुद्रसपाटीपासून बाराशे मीटर उंचीपर्यंत हा आढळतो. सुमारे साडेसातशे ते पंचवीसशे मिलिमीटर पावसाच्या प्रदेशात ५० डिग्री सेंटीग्रेड पर्यंतच्या तापमानात व उत्तम निचऱ्याची, पोयट्याची, गाळाची, मुरमाड, जांभ्या दगडाची अशा जमिनीत हा चांगला वाढतो.

आंब्याचे फळ शक्तिवर्धक आहे. कोवळ्या पानांचा वापर मधुमेह नियंत्रणासाठी करतात. फुलांची/मोहराची भाजी करतात. कच्चा आंब्याचे मुरंबा, लोणचे, गुळांबा पन्हे करतात. पिकलेल्या आंब्यापासून आंबापोळी करतात. आंब्याच्या आंत बी म्हणजे बाठ्याचे कडक आवरणात  कोय असते. ही औषधी असते. हिचे पीठ करतात. यात सहा ते बारा टक्के फॅटअसते व कॅल्शियम भरपूर असतो. जंत विकार व जुलाब पोटदुखी यासाठी कोयीचे चूर्ण देतात. 

आंब्याच्या चिकाचा वापर थंडीत पाय उकळतात तेव्हा करतात. आंब्याच्या कोवळ्या पानांचा काढा आवाज सुधारण्यासाठी, रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी उपयोगी येतो. आंब्याचे लाकूड हलके चिवट असते याचा वापर इमारती बांधकामासाठी फळ्या, दरवाजे, चौकटी, खिडक्या यासाठी करतात. अंबा हे नगदी उत्पन्न व परकीय चलन मिळवून देणारे राजमान्य फळ आहे.

वृक्ष आणि जीवसृष्टी यांचं घनिष्ट नातं  आहे यातून सुधारणावादी मानवाने बोध घेऊन वृक्ष लागवड, वृक्ष संवर्धन आणि त्यातून पर्यावरणाचे रक्षण करणे ही राष्ट्रभक्ती आहे हे समजून आचरण करणे ही काळाची गरज आहे. 

लेखक : चंद्रकांत शहासने, पुणे
संतवांड़मयाचे विज्ञाननिष्ठनिरुपणकार
मोबाईल क्रमांक : ९८८१३७३५८५

*कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्ट पुणे यांच्यावतीने पर्यावरण जनजागृती  उपक्रमांतर्गत..*
*पर्यावरण दिन ५ जून २०२१पासून वन हुतात्मादिन ११ सप्टेंबर २०२१पर्यंत असे ९९ दिवसांचे पर्यावरण जनजागृती अभियान*
close